संस्कृती नष्ट करण्याचा ‘अजेंडा’ !
‘रिॲलिटी शो’च्या नावाखाली ‘बिग बॉस’मधून अत्यंत विकृती आणि अश्लीलता पसरवली जात आहे. यात कलाकारांना अतिशय बीभत्स अन् किळसवाणी कृत्ये करतांना दाखवले जाते. विविध क्षेत्रांतील, तसेच काही प्रसिद्ध लोक एका ठराविक कालावधीसाठी घरात बंद असतात आणि त्यांचे वर्तन कॅमेर्यांद्वारे पाहिले जाते. जो सर्वोत्तम वागतो तो विजेता ठरतो. त्याला मोठी रक्कम मिळते. या ‘शो’च्या ‘टी.आर्.पी.’चे खरे कारण, म्हणजे मारामारी, वाद, खळबळजनक खुलासे आणि त्यानंतर होणारा अनावश्यक आवाज अन् शिवीगाळ. स्पर्धा, द्वेष, मत्सर, विकृती, अश्लीलता हे या ‘शो’चे विशेष आहे. या गोष्टी लक्षात घेऊनच केवळ वादग्रस्त पार्श्वभूमी किंवा वृत्ती असलेल्या लोकांनाच या कार्यक्रमात घेतले जाते. हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारुकी, ‘पॉर्न स्टार’ सनी लिओनी, राखी सावंत आदींसारख्या कलाकारांना घेऊन संस्कृती नष्ट करण्याचा बिग बॉसचा छुपा ‘अजेंडा’ (लक्ष्य) आहे.
आपल्या देशात चित्रपटांच्या माध्यमातून हिंदु संस्कृतीला विकृत स्वरूपात मांडण्याचा खेळ प्रदीर्घ काळापासून चालू आहे. त्यामध्ये आता ‘बिग बॉस’सारख्या बीभत्स कार्यक्रमाची भर पडली आहे. ‘बिग बॉस’सारखे कार्यक्रम हे भारतातील कुटुंबव्यवस्थेवर थेट आक्रमण करणारे आहेत. स्वामी ओम या ‘बिग बॉस’मधील वादग्रस्त स्पर्धकाला लैंगिक टिप्पण्या आणि विचित्र वर्तन यांमुळे कार्यक्रमामधून बाहेर काढण्यात आले. त्यांनी त्याचे सहकारी स्पर्धक बानी जे आणि रोहन मेहरा यांच्यावर लघवी फेकली होती. हे केवळ एक उदाहरण आहे. अशा प्रकारे अत्यंत विकृतीने भरलेला हा कार्यक्रम सर्वांनाच सहजपणे अधोगतीकडे नेत आहे. चिंतेची गोष्ट, म्हणजे हा कार्यक्रम संस्कारक्षम मनाची लहान मुलेही बघतात, त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल ? याची कल्पनाही करवत नाही. मारामारी, लैंगिक संबंध आणि गैरवर्तन यांतून ते काय शिकतील ? विवाहाचे पवित्र नाते ही संकल्पनाही यामुळे नष्ट होत आहे. ‘बिग बॉस’मध्ये कुमारी मुलींना भोगवस्तू म्हणून सादर केले जात आहे. त्यांना अनोळखी मुलांसमवेत पलंगावर झोपायला लावले जात आहे. संपूर्ण देश हे पहात आहे. त्यामुळे तरुणांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. अशा कार्यक्रमामुळे बलात्कार, हत्या, अश्लीलता यांना प्रोत्साहन मिळत आहे. पूर्णपणे पाश्चात्त्य विकृतीवर आधारित या कार्यक्रमातून भारतीय संस्कृती आणि महिला यांचा सन्मान नष्ट करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. हा ‘शो’ पूर्णतः पूर्वनियोजित असतो. इथे लव्ह जिहादही कार्यरत आहे. गुन्हेगार आणि चारित्र्यहीन यांना नायक केले आहे. एकदा यातील पाकिस्तानी एजाज खानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘चोर’ म्हणून उल्लेख केला. अत्यंत घाणेरड्या अशा कार्यक्रमातील विकृती सांगव्या तेवढ्या अल्पच. देशाच्या संस्कृतीवर आघात करणारा हा कार्यक्रम तातडीने बंद करायला हवा !
– सौ . अर्पणा जगताप, पुणे