पोटाच्या तक्रारी, दोष लक्षण आणि ऋतू यांप्रमाणे पथ्यकर पदार्थ !
पचनाच्या तक्रारी, आम्लपित्त असलेल्या रुग्णांकडून ‘तुम्ही तर सगळेच खाऊ नका म्हणता. मिरची नको, पनीर, मैदा, रवा, पोहे, बेकरी, ब्रेड, बटाटा मग खाऊ तरी काय ?’, असा प्रश्न बर्याचदा विचारला जातो. खाली काही पथ्यकर आणि चालू शकणार्या पदार्थांची सूची येथे देत आहे. हे सगळे पदार्थ मिरची, कांदा-लसूण न वापरता करता येतील आणि सणाच्या दिवसांमध्येही घरातील रुग्णाला देता येतील. तरीही प्रत्येकाच्या पोटाच्या तक्रारीप्रमाणे, दोष लक्षण आणि ऋतू यांप्रमाणे थोडेफार पालट करून खालील काही पदार्थ वापरता येतील.
वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.
१. न्याहरी पदार्थ
शिरा, गव्हाचा उपमा, तांदूळ भाजून रवा करून त्याचा उपमा, तांदळाच्या शेवयांचा उपमा, मूग आणि तांदूळ भिजवून मिक्सरमधून काढून त्याची धिरडी, तांदूळ-नारळ यांचा वापर करून नीर डोसा, तांदूळ धिरडी, धपाटा; रताळी, कांदा, गाजर यांचे कटलेट, भाज्यांचे पराठे, ताज्या भाताचा फोडणीचा भात, नाचणी आंबील, नाचणी डोसा, उकड काढून भाकरी, चटणी.
२. कोरडे पदार्थ
ज्वारी/साळी यांच्या लाह्या चिवडा, खाकरा, मखाणे, लाडू, राजगिरा लाह्या परतून, लाह्यांचे पीठ दूध, मनुका, डाळिंब, अंजीर.
३. जेवणातील पदार्थ
दुधी भोपळा भाजी (मूग डाळ/नारळ/ नुसती कोथिंबीर घालून), ताकातील पालेभाजी, पडवळ (डाळ घालून / मूग डाळ आणि पीठ पेरून, नारळाचे वाटण घालून), भेंडी, दोडका, मूग, मसूर, मुळा, गाजर, लाल भोपळा, तांदुळजा, माठ, भात-वरण, पुलाव तूप, लोणी, फुलका, भाकरी.
४. पिण्यासाठी
सुंठ पाणी, ओवा पाणी, लाह्यांचे पाणी, मनुका पाणी, ताकात जिरे आणि सैंधव घालून, पाणी, फळभाज्या सूप, मूग कढण, आमटी, फळभाजी सूप, कुळीथ पिठले (व्यक्तीच्या अवस्थानुरुप), मूग डाळीचे पीठ किंवा ज्वारी पीठ लावून कढी.
५. मसाले
आले, लसूण, जिरे / मिरे/धने पावडर; जिरे, धणे, तीळ यांचा मसाला; लिंबू, कोथिंबीर, ओले वाटण घालून मसाला.
६. पोटाचे विकार वाढण्यामागील कारण
पोटाचे विकार चिकट असतात; कारण
अ. ते अनेक दिवस अंगावर काढलेले असतात.
आ. सगळे सांभाळून आहार नियम पालनाकडे थोडे दुर्लक्ष होते.
इ. मानसिक ताणाचा पचनावर परिणाम हे मोठे कारण सगळ्यांमध्ये दिसते.
ई. बरे होण्यासाठी पोट पूर्ण बंद ठेवता येत नाही, सतत चालू असते.
थोडीशी सबुरी आणि जीभेवर ताबा, विशेषकरून पचन तक्रारी कायमसाठी दूर करायला पुष्कळ आवश्यक आहे. त्यातही थोडी कल्पकता वापरून आपापल्या लक्षणांप्रमाणे, तसेच जुने दुखणे असता वैद्यकीय सल्ल्याने वरील पदार्थांचा विचार करता येईल हे महत्त्वाचे ! (५.९.२०२४)
(वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये यांच्या फेसबुकवरून साभार)