पितृपक्ष : महालय श्राद्ध आणि पितरांपर्यंत कव्यभाग (अन्न) पोचण्याची पद्धत
आज ‘महालयारंभ’ होत आहे. त्या निमित्ताने…
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करून ‘पितृपक्ष’ याविषयी थोडी माहिती जाणून घेऊ. ‘श्रद्धेने जे केले जाते, त्याला श्राद्ध’, अशी संज्ञा शास्त्रकारांनी दिली आहे. (भाग १)
१. ‘सांवत्सरिक’ आणि ‘महालय श्राद्ध’ यांतील भेद
मृत व्यक्तींच्या उद्देशाने प्रतिवर्षी जे करतो, त्याला ‘सांवत्सरिक श्राद्ध’, तर पितृपक्षात जे श्राद्ध करतात, त्याला ‘महालय श्राद्ध’ अशी संज्ञा आहे. आपले आकाश हे ३६० अंश कल्पलेले असून सूर्य हा सहाव्या राशीत, म्हणजे ‘कन्या’ राशीत गेल्यानंतर तो वृश्चिक राशीत जाण्यापर्यंतचा काळ जो जवळपास २ मास असतो, तोपर्यंत महालय श्राद्ध करता येते. ‘भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या या कृष्णपक्षात महालय श्राद्ध प्रतिदिन करावे’, असे वचन आहे. सांप्रत सलग १५ दिवस श्राद्ध करणे, हे व्यावहारिकदृष्ट्या थोडे कठीण असल्याने वडिलांच्या निधन तिथीस किंवा अमावास्येला ‘महालय श्राद्ध’ एकदाच केले जाते. हाही पक्ष मान्य आहे.
सांवत्सरिक श्राद्धात त्रयीलाच उद्देशून (आई, आजी, पणजी किंवा वडील, आजोबा, पणजोबा) पिंडदान केले जाते; परंतु महालय श्राद्धात सर्व नातेवाइकांना पिंडदान केले जाते.
२. कुणाचे पिंडदान करू शकतो ?
अ. पितृत्रयी – वडिल, आजोबा, पणजोबा
आ. मातृत्रयी – आई, आजी, पणजी
इ. मातामहत्रयी – आईचे वडिल, आजोबा, पणजोबा
ई. मातामहित्रयी – आईची आई, आजी, पणजी
उ. सापत्न मातु: – सावत्र आई
ऊ. पत्नी – पत्नी निवर्तली (निधन) असेल तर
ए. पुत्र – उपनयन झालेला पुत्र गेला असेल तर
ऐ. दुहिता – विवाहित कन्या निवर्तली असेल तर
ओ. पितृव्य – सख्खे काका (काकू गेली असेल, तर ‘सपत्नीक’ असा उल्लेख करावा. चुलत भाऊ गेला असेल, तर ‘ससूत’ असा सोबत उल्लेख करावा.)
औ. मातुल – सख्खा मामा (मामी गेली असेल, तर ‘सपत्नीक’ आणि मामेभाऊ गेला असेल, तर ‘ससूत’ असा उल्लेख करावा.)
अं. भ्रातु: – सख्खा भाऊ (भावजय गेली असेल, तर ‘सपत्नीक’ असा उल्लेख करावा.)
क. पितृभगिनी – सख्खी आत्या (आत्याचे यजमान गेले असतील, तर ‘सभर्तृ’ असा उल्लेख करावा आणि आतेभाऊ गेला असेल, तर ‘ससूत’ असे म्हणावे.)
ख. मातृभगिनी – सख्खी मावशी (यजमान गेले असतील, तर ‘सभर्तृ’ आणि मावसभाऊ गेला असेल, तर ‘ससूत’ असा उल्लेख करावा.)
ग. आत्मभगिनी – सख्खी बहीण (तिचे यजमानही निवर्तले असतील, तर ‘सभर्तृ’ असे संबोधावे.)
घ. श्वशुर – सासरे (सासूबाई निवर्तल्या असतील, तर ‘सपत्नीक’ असे म्हणावे.)
च. गुरु – ज्यांनी गायत्री उपदेश केला, ते (वडिलांनी मुंज लावली असेल, तर वडील अथवा अन्य कुणी मुंज लावली असेल ते गुरु.)
छ. आचार्यगुरु – ज्यांनी विद्या आणि शिक्षण दिले, मोक्षगुरु
ज. शिष्य – आपला विद्यार्थी
झ. आप्त – वरील नावांमध्ये ज्यांचा उल्लेख नाही; परंतु ज्यांचे आपल्याशी आपुलकीचे संबध होते आणि ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत, या सर्वांना ‘आप्त’ या संज्ञेत पिंडदान करू शकतो.
सर्व मृत नातेवाइकांची नावे आणि गोत्रासहित एका वहीत नोंद ठेवावी, तसेच पुरोहितांच्या सल्ल्यानुसार वरीलप्रमाणे सुसूत्रीत सूची बनवावी.
३. महालयात केले जाणारे ४ धर्मपिंड
याखेरीज ४ धर्मपिंडांची योजना महालयात केली आहे.
अ. मित्र, सखा, पशू, वृक्ष; जाणतेपणी अजाणतेपणी ज्यांनी आपल्यावर उपकार केले, जे आपल्याकडे आश्रित होते, त्यांच्याकरताही धर्मपिंड आहे.
आ. मातृ, पितृ, गुरु यांच्या वंशात किंवा आप्तबांधवात ज्यांना संतती नसल्याने पिंडदान होत नाही, त्यांच्याकरता ज्यांचे क्रियाकर्म झाले नाही.
इ. जे जन्मतःच अंध, पंगू जन्मले ते आणि विरूप यांच्याकरताही धर्मपिंड आहे.
ई. जे ‘कुंभीपाक’ नामक नरकात पाप कर्मामुळे खितपत पडले आहेत, त्यांच्याकरताही धर्मपिंड आहे.
असे ४ धर्मपिंड महालयात दिले जातात.
४. महालय श्राद्ध किती प्रकारांत करता येईल ?
कारण अनेक श्रद्धावान आस्तिक असतात; परंतु नोकरीमुळे किंवा अन्य धावपळीमुळे त्यांना काही वेळा महालय श्राद्ध करणे थोडे कठीण होते त्यांच्याकरता –
अ. २ किंवा ५ ब्राह्मण किंवा चटावर दर्भबटू ब्राह्मण योजना करून, श्राद्ध स्वयंपाक करून सपिंडक महालय.
आ. आमान्न, म्हणजे शिधासामुग्री योजना करून आमश्राद्ध.
इ. दूध, केळ, अल्पोपहार यांची योजना करून हिरण्यश्राद्ध. यात पिंडदान नसते.
ई. ब्रह्मार्पण : २, ५ ब्राह्मण आणि सवाष्ण (सुवासिनी) कुणी गेली असेल, तर सवाष्ण पूजन करून अन्नसंतर्पण. यात पिंडदान नसते.
उ. एखाद्याची आर्थिक स्थिती नसेल किंवा मनुष्यबळ वयोमानानुसार अल्प असेल, तर ‘शमीपत्रा’ एवढा पिंड दिलेलाही शास्त्रसंमत आहे. शमीपत्र हे भाताच्या शिताएवढेच असते.
ऊ. या प्रकारातील काहीच जमत नसल्यास घोर वनात जाऊन दक्षिणेकडे तोंड करून उभे राहून स्वतःच्या दोन्ही काखा वर करून ‘माझी आर्थिक स्थिती नसल्याने मी पिंडदान किंवा पितरांचे श्राद्ध करू शकत नाही, याविषयी क्षमायाचना करून पितरांचे स्मरण केले’, तरी श्राद्ध होते.
५. श्राद्धाच्या महालयात दिले जाणारे भाग
श्राद्धात विकीर आणि प्रकीर असे २ भाग दिले जातात. अग्नीदाह झालेले किंवा अग्नीदग्ध न झालेले, गर्भस्रावात मृत झालेले, ज्यांना रूपही प्राप्त न झालेले या सर्वांनाही एक भाग श्राद्धात महालयात दिला जातो. ज्या देवतांना सोमभाग मिळत नाही, त्यांनाही एक भाग श्राद्धात दिला जातो. ‘प्रभु रामचंद्रांनी वनात असतांना दशरथ राजाला कंदमुळाचे पिंड दिले होते’, असाही उल्लेख रामायणात आहे.
६. पितरांना दिलेला कव्यभाग (अन्न भाग) पितरांपर्यंत पोचण्याची पद्धत
कन्या राशीत सूर्य गेल्यावर तूळ राशीत सूर्य असेपर्यंत तो पृथ्वीच्या बराच जवळ असतो. पितृगणांकरता दिलेले कव्य (अन्न भाग) हा सर्वप्रथम सूर्यमंडलात जातो, तेथून तो चंद्रमंडलात जातो. चंद्रमंडल हे स्वयंप्रकाशित नसून सूर्यनारायणांची सुषुम्ना नाडी या चंद्र मंडलाला प्रकाशित करते. प्रत्येक मासाच्या अमावास्येला चंद्रमंडल आणि सूर्यमंडल एकत्र येत असते. त्यामुळे अमावास्येला पितरांना दिलेले अन्न अधिक जलद गतीने त्यांना प्राप्त होते. कन्या राशीच्या १० अंशापासून ते तूळ राशीच्या १० अंशापर्यंतच्या काळात सूर्य आणि पृथ्वी यामधील अंतर सर्वांत अल्प असते. त्यामुळे पितरांना दिलेला कव्यभाग (अन्न) पितरांपर्यंत लवकर पोचते.
श्राद्ध ही व्यवस्था ‘मनीऑर्डर’प्रमाणे जाणूया. उदाहरणार्थ मी वेंगुर्ला येथील टपाल कार्यालयामध्ये ५०० रुपयाची एक नोट मुंबईला भावाकडे पाठवली, तर माझ्या भावाला मुंबईत तीच नोट मिळेल का ? नाही. त्याला त्या टपाल कार्यालयात उपलब्ध असलेले ५०० रुपये मूल्याचे चलन मिळेल (१०० रुपयाच्या ५ नोटा मिळतील किंवा ५० रुपयाच्या १० नोटा मिळतील); पण तेवढेच रुपये मिळतील. तद्वत आपण जे अन्न पितरांच्या उद्देशाने देतो, त्याच वेळी तेवढेच अन्न आपल्या पूर्वजांनी ज्या योनीत जन्म घेतला असेल, त्या योनीला आवश्यक जो आहार असेल, त्या रूपाने त्यांना मिळतो.
७. श्राद्धात पितर खरेच जेवतात का ?
‘श्राद्धात पितर खरेच जेवतात का ?’, हा सध्याचा फार मोठा प्रश्न आहे. आपण जेव्हा श्राद्धान्न जेवतो, तेव्हा ते कितीही अल्प जेवले, तरी शरिराला एक प्रकारची सुस्ती आणि जडपणा अनुभवता येतो; परंतु एखाद्या यज्ञाच्या वेळी किंवा मंदिरात कितीही पोटभरून प्रसाद ग्रहण केला, तरी तसे जाणवत नाही. मंदिरातील प्रसादात कांदा-लसूण, गरम मसाले वगैरे काही नसले, तरी तो चवीला सुमधुरच लागतो; कारण त्या अन्नावर भगवंताची कृपा असते आणि श्राद्धान्नावर पितरांची ‘आसक्ती’ असते. त्यामुळे शरिराला जडत्व येते. एरव्ही खीर आणि वडे खाल्ले, तर सुस्ती येत नाही. हा अनुभव घ्यायला हरकत नसावी.
८. पितृपक्षात घरी स्वयंपाक करण्यामागील कारण
स्वयंपाक हा घरीच केलेला असावा. पुष्कळ पदार्थ केले नाहीत, तरी चालतील; परंतु सात्त्विकपणे आपल्या पूर्वजांना स्वतःच्या हातचे दिलेले अन्न हे अधिक प्रिय असते. त्यातील आपुलकी आणि कृतज्ञता उपाहारगृह किंवा केटरींगच्या अन्नाला कधीच येणार नाही. सून आणि मुलगी यांनी केलेला वरणभात हा आई-वडिलांना पंचपक्वानांपेक्षा अधिक प्रिय असतो, हे सदैव ध्यानात ठेवावे. पितृपक्षात आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करून आणि त्यांना संतुष्ट करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला , सिंधुदुर्ग. (क्रमश:)
या लेखातील पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/835395.html