साधिकांची पितृवत् काळजी घेणारे आणि आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणारे परात्पर गुरु (कै.) कालिदास देशपांडेकाका !
‘परात्पर गुरु (कै.) कालिदास देशपांडेकाकांकडे विदर्भाच्या अध्यात्मप्रसाराचे दायित्व होते. तेव्हा मला त्यांचा सत्संग मिळत असे. मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. परात्पर गुरु (कै.) कालिदास देशपांडेकाकांनी साधिकेच्या आध्यात्मिक त्रासांविषयी तिच्या वडिलांना सांगणे आणि साधिका सेवेसाठी जाऊ शकणे
परात्पर गुरु (कै.) कालिदास देशपांडेकाका माझ्या आई-वडिलांना संपर्क करण्यासाठी येत असत. त्या कालावधीत मी सेवा करत असे. माझे वडील आणि परात्पर गुरु काका यांची पुष्कळ जवळीक अन् प्रेम होते. माझे वडील परात्पर गुरु काकांना म्हणाले, ‘‘मुलगी इतकी सेवा आणि नामजप करते; परंतु तिच्या चेहर्यावर आनंद दिसत नाही. ती नेहमी थकलेली दिसते. तिच्या चेहर्यावर साधनेचे तेज का जाणवत नाही ?’’ तेव्हा ते वडिलांना म्हणाले, ‘‘हे अधिकोषातील खात्याप्रमाणे आहे. आपण खात्यात पैसे जमा करतो; पण ते काढून व्यय करत राहिलो, तर खात्यात पैसे साठणार नाहीत. तसेच हे आहे. ती साधना करते; पण तिची साधना अनिष्ट शक्तींच्या त्रासांमुळे व्यय होते. तिच्या त्रासाची तीव्रता न्यून झाल्यावर तुम्हालाच नाही, तर जगाला तिचे तेज दिसेल. तिच्याकडे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे लक्ष आहे. तुम्ही तिची काळजी करू नका.’’ त्यानंतर परात्पर गुरु काका सांगतील, तेव्हा माझे वडील मला सेवेला पाठवायचे.
२. प्रेमभाव
२ अ. वडिलांप्रमाणे साधिकांची काळजी घेणे : परात्पर गुरु काका मला अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांतील प्रसार दौर्याच्या वेळी शिकण्यासाठी समवेत घेऊन जात असत. तेव्हा ते माझी वडिलांप्रमाणे पुष्कळ काळजी घेत असत, उदा. महाप्रसाद घेणे, निवासाची व्यवस्था करणे, नामजपाचा आढावा घेणे. मी, सौ. वेदश्री येळणे (पूर्वाश्रमीची कु. स्वाती निखार), कु. प्रगती काळे आणि श्री. श्रीकांत पिसोळकर नागपूर सेवाकेंद्रात रहात होतो. परात्पर गुरु काकाही आमच्या समवेत बर्याच कालावधीसाठी तेथे रहात होते. आम्हा तिघींनाही तीव्र आध्यात्मिक त्रास होता. परात्पर गुरु काकांनी आम्हाला घडवल्यामुळे आम्हा तिघींमधेही पुष्कळ प्रेम निर्माण झाले होते. आम्ही सेवाकेंद्रात रहाण्यास आरंभ केला. तेव्हा तेथे दूरभाष नव्हता; म्हणून परात्पर गुरु काकांनी आमच्यासाठी दूरभाष घेतला. त्यांचे आमच्या सुखसुविधांकडे लक्ष असायचे.
२ आ. साधिकांना पौर्णिमेच्या दिवशी आध्यात्मिक त्रास होऊ नये, याकडे परात्पर गुरु काकांचे लक्ष असणे : एकदा आम्ही तिन्ही साधिका आणि पिसोळकरकाका परात्पर गुरु काकांच्या समवेत सत्संगाला गेलो होतो. आम्ही ग्रंथकक्षावर सेवेला होतो. त्या सत्संगात परात्पर गुरु काकांचे मार्गदर्शन होते. आमची सेवा झाल्यावर त्यांनी आम्हाला बोलावून घेतले आणि आमची विचारपूस केली. ते आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही छान सेवा केली. तुम्हाला कुठला त्रास झाला नाही ना ?’’ यावरून ‘त्या दिवशी पौर्णिमा असूनही त्यांनी आम्हाला कुठलाही त्रास होऊ दिला नाही’, हे आमच्या लक्षात आले.
३. अनुभूती
३ अ. परात्पर गुरु देशपांडेकाका आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या समवेत गाडीने प्रवास करत असतांना भावजागृती होणे : एकदा अकोला येथे परात्पर गुरु पांडे महाराज यांचे साधकांसाठी मार्गदर्शन होते. तेव्हा परात्पर गुरु काका आणि परात्पर गुरु पांडे महाराज चारचाकी गाडीने जाणार होते. ती गाडी आमच्या घराच्या बाजूच्या रस्त्यावरून जाणार होती. ते आमच्या घरी मला घेण्यासाठी आले. तेव्हा माझ्या आई-वडिलांनी त्यांना भावपूर्ण नमस्कार केला. ते पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली. तसेच गाडीतून जात असतांना त्या अर्ध्या घंट्याच्या प्रवासात माझा सतत नामजप होत होता आणि माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वहात होते.
३ आ. परात्पर गुरु काकांच्या माध्यमातून प.पू. डॉक्टरांचे प्रेम अनुभवणे : ज्या वेळी आम्ही परात्पर गुरु काकांच्या सहवासात होतो, तेव्हा ‘ते ऋषि आहेत’, याची आम्हाला कल्पना नव्हती. याविषयी आम्हाला काही दिवसांनी कळले. आम्ही प.पू. डॉक्टरांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) सगुण सेवा किंवा त्यांच्या समवेत सेवा केली नाही; पण परात्पर गुरु काकांच्या माध्यमातून आम्ही प.पू. डॉक्टरांचे प्रेम अनुभवले.
प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच आम्हाला परात्पर गुरु कालिदास देशपांडेकाका यांचा सहवास लाभला. त्यांचे चैतन्य, आनंद आणि प्रेम अनुभवायला मिळाले. त्याबद्दल प.पू. डॉक्टर आणि परात्पर गुरु कालिदास देशपांडेकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. प्रार्थना प्रसाद देव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.७.२०२४)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |