गणेशोत्सव मिरवणुकीत ध्वनीप्रदूषण करणार्या सांगली शहरातील २७ गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे नोंद !
सांगली, १७ सप्टेंबर (वार्ता.) – शहरात कर्णकर्कश आवाजात ध्वनीक्षेपकाचा वापर करून ध्वनीप्रदूषण करत मिरवणूक काढणार्या शहरातील २७ गणेशोत्सव मंडळांवर पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीतील दणदणाटाच्या नोंदी घेण्यात आल्या असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवापूर्वी घेतलेल्या बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गणेशोत्सव मंडळांना पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, तसेच लेसरचा वापर करू नका, असे आवाहन केले होते, तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावरही मंडळांच्या बैठकीत कर्णकर्कश ध्वनीक्षेपक, लेसरच्या वापरावर प्रतिबंध आणण्याचे आवाहन केले होते;
परंतु काही अतीउत्साही गणेशोत्सव मंडळांनी आगमनाच्या दिवशीच दणदणाट चालू केला. मिरवणुकीत लेसरचा वापर केला. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी विसर्जन मिरवणुकीत मंडळांच्या ध्वनीक्षेपकाच्या आवाजाच्या नोंदी घेऊन कारवाईचे आदेश दिल्याचे सांगितले. पोलिसांनी आवाजाची क्षमता मोजणार्या यंत्रणेवर नोंदी घेतल्या.