परात्पर गुरु (कै.) कालिदास देशपांडेकाका यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
भाद्रपद कृष्ण प्रतिपदा (१८.९.२०२४) या दिवशी यवतमाळ येथील सनातनचे परात्पर गुरु प.पू. कालिदास देशपांडे यांची १४ वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…
परात्पर गुरु (कै.) कालिदास देशपांडेकाका यांच्या चरणी त्यांच्या १४ व्या पुण्यतिथीनिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
‘वर्ष २००७ पासून दीड वर्ष मला परात्पर गुरु (कै.) कालिदास देशपांडेकाकांचा सत्संग लाभला. त्या वेळी मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. साधनेची आवड निर्माण करणे
मी परात्पर गुरु कालिदास देशपांडेकाकांमुळे साधनेत आले आणि त्यांनीच माझ्यात साधनेची आवड निर्माण केली. वर्ष २००६ मध्ये माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर माझी साधनेतील आवड न्यून झाली. वर्ष २००७ मध्ये मला परात्पर गुरु काकांनी नागपूर येथील सेवाकेंद्रात बोलावून घेतले. तेथे ८ दिवस मी नामजपादी उपाय केले. त्यानंतर माझ्यामध्ये साधनेची आवड निर्माण झाली. तेव्हा ‘साधना केल्याने प्रारब्ध संपवता येते’, हे मला शिकायला मिळाले.
२. प्रेमभाव
परात्पर गुरु काका आम्हाला अत्यंत प्रेमाने समजावून सांगायचे, उदा. आश्रमात कसे रहायचे ? गुरूंचे सूक्ष्मातील अस्तित्व कसे टिकवून ठेवायचे ? साधकांच्या समवेत कसे बोलायचे आणि भाव कसा ठेवायचा ? स्वभावदोष कसे शोधायचे ? गुरूंप्रती कृतज्ञ कसे रहायचे ?
३. ‘सर्व साधकांवर गुरूंचे लक्ष असते आणि गुरु साधकांचे प्रारब्ध संपवतात’, हे परात्पर गुरु देशपांडेकाकांकडून ऐकल्यावर भावजागृती होणे
एकदा मी सेवा करण्यासाठी बाहेर गेले होते. तिथे काही मुले क्रिकेट खेळत होती. त्यांचा चेंडू माझ्या डोळ्याला लागला आणि डोळ्यातून पुष्कळ पाणी येऊन डोळा दुखू लागला. तेव्हा मी श्री गुरूंना प्रार्थना केली, ‘माझा त्रास दूर करा आणि माझ्याकडून सेवा करून घ्या.’ त्यानंतर मला बरे वाटले. मी सेवा पूर्ण करून सेवाकेंद्रात परत गेले. मी परात्पर गुरु काकांना माझा डोळा दुखू लागल्याविषयीचा प्रसंग सांगितला. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘गुरूंचे सर्व साधकांवर लक्ष असते. या लहान प्रसंगातून गुरूंनी तुझे मोठे प्रारब्ध संपवले.’’ तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती झाली.
४. कठोर शब्दांत चुकीची जाणीव करून देणे
एकदा समाजातील लोकांसाठी सत्संग आयोजित केला होता. त्या वेळी माझ्याकडे व्यासपिठाची सेवा होती. परात्पर गुरु काका मला काहीतरी सांगण्यासाठी खुणावून बोलावत होते; पण ते माझ्या लक्षात आले नाही. त्यानंतर परात्पर गुरु काकांनी माझी चूक कठोर शब्दांत सांगितली. तेव्हा परात्पर गुरु काकांनी मला बोलावून सांगितले, ‘‘गुरुसेवेत आपण तत्पर असायला हवे. त्यामुळेच आपण गुरुकृपेस पात्र होतो.’’
५. अनुभूती
५ अ. परात्पर गुरु देशपांडेकाकांच्या संतत्वाविषयी पूर्वसूचना मिळणे : एकदा दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘साधकांनी परात्पर गुरु काकांची गुणवैशिष्ट्ये लिहून द्यावीत’, अशी सूचना आली होती. त्यांची गुणवैशिष्ट्ये लिहून देतांना ‘आपण काकांना केवळ काका न म्हणता आदरार्थी उपमा द्यावी’, असे मला वाटले; पण कोणती उपमा द्यावी हे मला कळत नव्हते. ८.८.२००७ या दिवशी काका संतपदी आरूढ झाल्याचे मला कळले. तेव्हा त्यांचा मला सत्संग मिळाल्याबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटली.
५ आ. सद्गुरु देशपांडेकाकांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अनुभवणे : मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) जवळून पाहिले किंवा अनुभवले नव्हते. ‘ते कसे असतील ?’, याची मला जिज्ञासा होती. ‘गुरु कसे असावेत ?’, याविषयी मी सद्गुरु काकांच्या माध्यमातून अनुभवले, उदा. साधकांना स्वतःच्या मुलांप्रमाणे समजून घेणे, साधकांना प्रेम देणे, कुणाचे चुकल्यास पुन्हा तशी चूक होऊ नये; म्हणून रागावून चुकीची जाणीव करून देणे, कुठलीच अपेक्षा न करणे, साधनेविषयी मार्गदर्शन करणे इत्यादी.
५ इ. परात्पर गुरु देशपांडेकाकांनी साधिकेला पडलेल्या वाईट स्वप्नासंदर्भात मार्गदर्शन करून धीर देणे आणि तेव्हा ‘गुरुदेवच बोलत आहेत’, असे जाणवणे : मला माझ्या वडिलांच्या संदर्भात पुष्कळ वाईट स्वप्ने पडायची. स्वप्नामध्ये ‘कुणीतरी माझ्या वडिलांना पुष्कळ त्रास देत आहेत, मारत आहेत आणि त्यामुळे वडिलांना पुष्कळ त्रास होत आहे’, असे मला दिसायचे. हे पाहून मलाही त्रास व्हायचा. याविषयी मी परात्पर गुरु काकांना सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तुझे तुझ्या वडिलांवर पुष्कळ प्रेम आहे. साधकांच्या जवळच्या व्यक्तीला अनिष्ट शक्ती त्रास देतात आणि साधकांच्या साधनेत अडथळा आणतात. तू काळजी करू नकोस. तुझ्या वडिलांना काहीच होणार नाही. गुरुदेव आपले सर्व त्रास दूर करायला समर्थ आहेत ! तू साधनेकडे लक्ष दे.’’ तेव्हा ‘साक्षात् गुरुच माझ्याशी बोलत आहेत’, असे मला जाणवले आणि माझी भावजागृती झाली.
५ ई. परात्पर गुरु देशपांडेकाकांनी स्वप्नात येऊन दर्शन देणे : परात्पर गुरु काकांनी देहत्याग केल्यावरही ते मला स्वप्नात दिसतात. मी पहिल्यांदा गर्भवती असतांना मला परात्पर गुरु देशपांडेकाका, सद्गुरु नंदकुमार जाधव आणि सद्गुरु सत्यवान कदम स्वप्नात दिसले. ते तिघे माझ्या बाळाचे पुष्कळ लाड करत होते. आताही मधेमधे मला परात्पर गुरु देशपांडेकाकांचे स्वप्नात दर्शन होते आणि माझी भावजागृती होऊन मला आनंद मिळतो.
मला असे जाणवते, ‘जेव्हा मी फार काळजीत असते, तेव्हा मला कदाचित् जाणीव करून द्यायला परात्पर गुरु देशपांडेकाका माझ्या स्वप्नात येतात. ते मला सांगतात, ‘तू काळजी करू नको. गुरुदेव आणि मी तुझ्याकडे लक्ष द्यायला आहोत.’ कृपया या स्वप्नाविषयी मार्गदर्शन करावे.
(‘जे साधना करतात, नामजप करतात त्यांची देव काळजी वाहतो. साधकाचे देवाशी अनुसंधान असल्यास देव साधकाचे रक्षण नाही का करणार ! साधकाला आश्वस्त करण्यासाठीच देव त्याची श्रद्धा असलेल्या गुरूंच्या रूपात त्याच्या स्वप्नात येतो आणि त्याला अनुभूती देतो.’ – संकलक)
‘गुरुदेव, माझ्यावर अशीच अखंड कृपा असू द्या. आपण माझ्याकडून ही सर्व सूत्रे लिहून घेतली, त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. वेदश्री येळणे (पूर्वाश्रमीची कु. स्वाती निखार), पुलगाव, जिल्हा वर्धा. (६.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |