पुराणकाळातील संदर्भांमागील सत्य-असत्य !
पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
१३ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतीय स्वातंत्र्याचा सत्य इतिहास प्रकाशित न होणे आणि त्यामागील कारणांचा मागोवा, आर्य कोण अन् कुठले ?, रामायणकाळ, आद्यशंकराचार्य आणि वास्तव’ हा भाग वाचला. आज पुढचा भाग येथे देत आहोत. (भाग ५२)
भाग ५१ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/833655.html
प्रकरण ९
३. आर्यांविषयीची थाप
‘आर्यांच्या टोळ्या उत्तरेकडून आल्या आणि नंतर भारतात स्थिरावल्या, त्यांनीच वेद रचले’, ही अशीच एक थाप आहे. तथाकथित टोळ्या म्हणे जवळजवळ रानटी होत्या. वेदांसारखे अद्वितीय, सैद्धांतिक, बुद्धीला खाद्य असणारे वाङ्मय जे आधुनिक वैज्ञानिक सिद्धांतानीही खोटे ठरवलेले नाही, अशा सिद्धांतांनी बहरलेले, हे त्याचे रूपच दुर्लक्षित करून जणू ‘निसर्गाच्या चमत्कारांनी चकित होऊन केलेली काव्ये’ असे ठरवण्यात आले. या दिव्य ग्रंथांची रचना म्हणे रानटी टोळ्यांनी केली !
४. भारतीय शास्त्रे आणि विद्या या ग्रीक-रोम या देशांत जाणे
महाभारतानंतर चंद्रगुप्त मौर्य यांच्यापर्यंत मधल्या काळात आधुनिक इतिहासकार कोणताही इतिहास सांगत नाही. याच कालखंडात क्षत्रिय विरांनी भारताबाहेर जाऊन अनेक प्रदेश जिंकले. ही गोष्ट आम्हालाही (?) ठाऊक नाही. अनेक भारतीय शास्त्रे आणि विद्या तेव्हाच ग्रीक-रोम इत्यादी देशांत गेल्या.
५. युरोपियनांच्या दिनदर्शिकेमधील महिन्यांची नावे आणि त्यांचे अर्थ यांत गोंधळ कशामुळे ?
अ. डिसेंबर यातील डेसी म्हणजे दश, म्हणजे हा दहावा मास.
आ. नोव्हेंबर, म्हणजे नव म्हणजे नऊ हा नववा मास असायला हवा.
इ. ऑक्टोबर म्हणजे अष्ट, हा आठवा मास हवा.
ई. सप्टेंबर, म्हणजे सप्त म्हणजे सात, हा सातवा मास हवा.
सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ही नावे अनुक्रमे ७ वा,८ वा, ९ वा, १० वा महिना अशीच आहेत. असेच आपण मागे गेलो, तर मार्च हा पहिला महिना येतो. मार्च म्हणजे स्टार्ट, म्हणजे पूर्वी त्यांचे वर्ष १० महिन्यांचे होते. मग जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने भारतीय वर्षगणना समजल्यानंतर त्यांच्या वर्षाला जोडले गेले.
हिंदु संस्कृती आणि इस्लामी राजवट !
१. हिंदु संस्कृती आणि परंपरा यांच्या पाऊलखुणा जगभर पसरल्या !
भारतीय इतिहासाचा प्राचीन काळ अत्यंत पराक्रम आणि विश्वविजय यांचा आहे. आता गणपतीची मूर्ती आणि मंदिरे जवळ जवळ अमेरिकेसह सर्व देशांत आहेत. शिवलिंगाची पूजा दक्षिण अमेरिकेपासून सर्वत्र आढळते. काबा हे शिवलिंग असून मक्केचे प्राचीन नाव ‘मखेश्वर’ होते. अजूनही मक्केला जाणारे हाजी काब्याला प्रदक्षिणा घालतात. मुसलमानी धर्माच्या स्थापनेपूर्वी सध्याची इस्लामी राज्ये ही भारतीय संस्कृतीची आणि वैदिक मतानुयायी राज्येच होती. इंडोनेशियाची ‘गरुडा’ एअरलाइन्स, राजाचे नाव ‘राम’, राणीचे नाव ‘सीता’ असण्याची परंपरा आजही त्या मुसलमानी राज्यात हिंदु परंपरांच्या खुणा जागवत आहेत.
कांबोजमध्ये आजही उभे असलेले ‘अंकोर वट’ हे प्रसिद्ध हिंदु मंदिर जगातील सर्वांत मोठे हिंदु मंदिर आहे. तेथे ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या विराट मूर्ती आहेत. बाली बेट आजही हिंदु असून तेथे प्राचीन परंपरेनुसार वर्णाश्रम प्रथा सुरक्षित आहे. कांबोजच्या काही राजांची नावे सूर्यवर्मा, जयवर्मा अशी होती. मलाया ते कोरियापर्यंत सर्वत्र भारतीय शिल्प आणि स्थापत्यकला यांचे नमुने अजूनही आढळतात. अशी सुंदर चित्रे आणि त्यांची माहिती ब्रह्मचारी कैलासम् यांच्या पुस्तकात दिली आहे.
२. भारतीय संस्कृती अन् धर्म यांच्या प्रसारकांमुळे हिंदु संस्कृतीचे जगभरात पालन
सम्राट विक्रमादित्याच्या काळात आणि त्यापूर्वीही देशोदेशी भारतीय संस्कृती अन् धर्म यांचे प्रसारक गेले होते. त्यामुळेच हिंदु संस्कृतीच्या खुणा जगभर सर्वत्र आहेत.
अ. राज्याभिषेक, विवाहसमारंभ इत्यादी विधीविधाने
आ. लग्नानंतर पत्नीने पतीकडे कायमचे रहायला जाणे.
इ. ईश्वर सर्वशक्तीमान, सर्वव्यापी आणि सर्वांतर्यामी आहे, हीच कल्पना सर्वांची आहे.
ई. भक्तीने देवाची कृपा प्राप्त होते, हा विचार सर्वत्र आहे.
उ. जपासाठी माळ घेण्याची पद्धत हिंदूंप्रमाणेच ख्रिस्ती, मुसलमान, पारशी, जैन, बौद्ध अशा सर्वांमध्ये आहे.
(क्रमशः)
– भारताचार्य अन् धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
भाग ५३. वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/835757.html
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)