साधकांना अभ्यास करण्याची सवय लावून त्यांना परिपूर्णतेकडे नेणारे सद्गुरु नीलेश सिंगबाळ !
हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा आज भाद्रपद पौर्णिमा (१८.९.२०२४) या दिवशी ५८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त वाराणसी येथील साधिका कु. जया सिंह यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी त्यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त साधकांकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
सद्गुरुमाऊली, कृपेची सावली।
सद्गुरुमाऊली, कृपेची सावली।
वाराणसी येथे मजला शिकवले पुष्कळ काही।। १।।
माझ्यावर अज्ञान आणि अहं यांचे जाळे होते घनदाट।
त्यात मी अंध होऊनी हरवलो होतो वाट।। २।।
मजवरी केली करुणा आपल्या सोबतीची।
तेथेच अनुभवली स्थिरता अन् माझ्या दोषी मनाची।। ३।।
माझ्यामध्ये होते पर्वताएवढे स्वयंशिस्तीचे दोष।
प्रेम आणि वात्सल्याने दाविला मार्ग तुम्ही, करावया संघर्ष।। ४।।
साधा पलंगपोस मजला न येई घालता नीट।
वेळातूनी वेळ काढूनी, मज दावली योग्य पद्धत।। ५।।
वस्तूवर वस्तू होती मांडणीत अव्यवस्थितपणे।
स्वतः आवरून मज सांगितले पहाण्यास स्पंदने।। ६।।
आपले रहाणे असते आम्हासाठी आदर्श।
मात्र आपण कौतुक करता आमुचे सहर्ष।। ७।।
अशा आमुच्या सद्गुरु दादांनी दिला आम्हास आनंद।
अहंकार नष्ट होऊनी गुरुकृपा व्हावी, अशी करतो प्रार्थना।। ८।।
या अशा शिकवणीसाठी करू किती कृतज्ञता व्यक्त।
‘जीवन माझे उद्धरा’, ही प्रार्थना करतो, त्रयीचरणी (टीप १)
हा भक्त।। ९।।
टीप १ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु नीलेश सिंगबाळ.
– श्री. हृषीकेश गुर्जर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. प्रेमभाव
‘सद्गुरु नीलेशदादांना साधकांप्रती वात्सल्य आणि प्रीती आहे. ते सर्व साधकांची नेहमी प्रेमाने विचारपूस करतात.
२. ‘सेवाकेंद्रातील प्रत्येक वस्तू परात्पर गुरु डॉक्टरांची असल्याने ती चांगल्या प्रकारे जपली पाहिजे’, अशी शिकवण साधकांना देणारे सद्गुरु नीलेशदादा !
सद्गुरु दादांचे प्रत्येक वस्तूकडे लक्ष असते. ते धर्मप्रचाराची सेवा करून सेवाकेंद्रात आल्यावर ‘कुठे कुठे अव्यवस्थितपणा आहे ? कोणत्या ठिकाणाची स्वच्छता होणे आवश्यक आहे ?’, याचे निरीक्षण करून त्यानुसार साधकांना सांगतात. ‘पावसाळ्यात एखादी वस्तू बाहेर पावसात भिजून ओली होत नाही ना ?’, याकडेही ते लक्ष देतात. ‘प्रत्येक वस्तू गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉक्टरांची) आहे आणि ती योग्य प्रकारे जपली पाहिजे’, हा भाव ठेवून ‘सेवाकेंद्रात अन् सेवाकेंद्राच्या परिसरात एखादी वस्तू खराब होत नाही ना ?’, हे पाहिले पाहिजे’, अशी त्यांची शिकवण असते.
३. स्वतः परिपूर्ण सेवा करून साधकांकडून चुकांविरहित आणि अभ्यासपूर्ण सेवा करून घेणे
सद्गुरु दादा प्रत्येक सेवेचे चांगले निरीक्षण करतात. त्यांच्यात ‘सेवा परिपूर्ण करणे’ हा गुण असल्याने ते आमच्या चुका सहजतेने सांगतात आणि आमच्याकडून चुकांविरहित सेवा करवून घेतात.
सद्गुरु दादा प्रत्येक गोष्टीचा स्वतः अभ्यास करतात आणि आम्हालाही तसे करायला सांगतात. एकदा मी त्यांना विचारले, ‘‘मला सेवेचा ताण आला आहे. सेवेचा अभ्यास करण्यात माझा वेळ जातो. ‘अभ्यास करून काय फलनिष्पत्ती मिळते ?’, हेही मला समजत नाही, तर इतका अभ्यास कशाला करायचा ?’, असे मला वाटते.’’ यावर सद्गुरु दादांनी सांगितले, ‘‘कोणताही अभ्यास व्यर्थ जात नाही. अभ्यास हाच आपला अनुभव बनतो आणि तो सेवेमधील एकरूपता वाढवतो. त्यामुळे प्रत्येक सेवेचा अभ्यास करायला हवा !’’
४. व्यापक दृष्टीकोन असणे आणि तत्त्वनिष्ठ राहून मार्गदर्शन करणे
सद्गुरु दादांचे दृष्टीकोन व्यापक असतात. ते तत्त्वनिष्ठतेने मार्गदर्शन करतात. त्यांना एखाद्या सूत्राविषयी थोडक्यात सांगितले, तरी ते सूत्र पूर्ण समजून घेऊन त्यावर योग्य मार्गदर्शन करतात.
५. साधनेतील अडचणींकडे पहाण्याचा सद्गुरु नीलेशदादांनी दिलेला दृष्टीकोन !
अनेक वेळा माझ्यातील स्वभावदोषांमुळे सेवेतील अडचणी पाहून मी सेवा करण्याचे टाळते. त्या वेळी सद्गुरु दादा मला सांगतात, ‘‘अडचणी येणारच. साधना करतांना चढ-उतार असणारच; परंतु आपले ध्येय निश्चित असले पाहिजे. ‘आलेली अडचण ही माझ्या साधनेला पूरक आहे’, असे समजून त्या दृष्टीने प्रयत्न कर.’’ हे ऐकून मला कृतज्ञता वाटते आणि माझे तसे प्रयत्न चालू होतात.
६. सद्गुरु नीलेशदादांना प्रार्थना केल्यावर सूक्ष्मातून त्यांचे मार्गदर्शन मिळणे आणि त्यांनी ‘मी केवळ स्थूल रूपाने बाहेर जातो; परंतु मनाने सेवाकेंद्रातच असतो’, असे सांगणे
एखाद्या प्रसंगात माझ्या मनाचा संघर्ष होतो. तेव्हा सद्गुरु दादा सेवाकेंद्रात नसतील, तर मी त्यांना ‘या प्रसंगात योग्य काय असायला हवे ?’, अशी प्रार्थना करते. त्या वेळी ते मला सूक्ष्मातून मार्गदर्शन करतात आणि अचूक उपाय सुचवतात. तेव्हा मला कृतज्ञता वाटते. ते सेवाकेंद्रात नसतांनाही मला त्यांचे अस्तित्व अनेक वेळा अनुभवता येते. याविषयी मी त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘मी केवळ स्थूल रूपाने बाहेर जातो; परंतु मनाने सेवाकेंद्रातच असतो.’’
‘सूक्ष्मातून संतांचे असे अस्तित्व मला अनुभवायला देत आहात’, याबद्दल परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. जया सिंह (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय २३ वर्षे), वाराणसी सेवाकेंद्र (७.७.२०२२)
|