Sanjay Gaikwad On Rahul Gandhi : राहुल गांधी यांची जीभ छाटणार्यास ११ लाख रुपयांचे पारितोषिक ! – आमदार संजय गायकवाड, शिवसेना
आरक्षण संपवण्याच्या सूत्रावर संतप्त
बुलढाणा – आरक्षण रहित करण्याची भाषा करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जीभ कापणार्यास ११ लाख रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे येथील आमदार संजय गायकवाड यांनी १६ सप्टेंबर या दिवशी माध्यमांशी बोलतांना केली.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौर्यात आरक्षणाच्या सूत्रावर स्वत:चे मत व्यक्त केले होते. ‘देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील, तेव्हा काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणण्याच्या सूत्रावर विचार करील; पण सध्या भारतात अशी कोणतीही परिस्थिती नाही’, असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर आरक्षण संपवण्याची भाषा करण्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांची जीभ छाटणार्यास ११ लाख रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा केली आहे.
आमदार संजय गायकवाड पुढे म्हणाले की, महाराष्ट्र आणि देशात आरक्षणाच्या मागणीवरून आग लागली आहे. मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीने उभे करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी आणि इतर प्रवर्ग यांना आरक्षणाचे प्रावधान केले. असे असतांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याचे विधान केले. या माध्यमातून त्यांनी काँग्रेसचा खरा चेहरा आणि पोटातील मळमळ ओकून दाखवली. आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करत आहेत. याचा अर्थ त्यांना सर्वच मागासवर्गीय, आदिवासी, दलित आणि इतरांचे आरक्षण संपवायचे आहे. त्यामुळे मीही घोषणा केली आहे.