Supreme leader Ali Khamenei : (म्हणे) ‘भारत, गाझा आणि म्यानमार येथे मुसलमानांवर अत्याचार होत आहेत !’ – इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी
|
तेहरान (इराण) – इस्लामच्या शत्रूंनी अनेकदा आपल्याला इस्लामी राष्ट्र म्हणून मान्यता देण्यात उदासीनता दाखवली आहे. जर आपण म्यानमार, गाझा, भारत किंवा जगातील इतर देशात मुसलमानांवर होणार्या अत्याचारांविषयी अनभिज्ञ असू, तर आपण स्वत: मुसलमान म्हणवून घेऊ शकत नाही, असा फुकाचा आरोप इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी केले. खामेनी यांच्या या आरोपाला भारताने प्रत्युत्तर दिले आहे. ‘इराणच्या सर्वोच्च नेत्याने केलेले विधान अमान्य असून त्यांच्या या विधानाचा आम्ही निषेध करतो’, अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त रणधीर जैस्वाल यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, इराणच्या सर्वोच्च नेत्याने भारतातील अल्पसंख्यांकांविषयी केलेल्या विधानाचा आम्ही निषेध करतो. त्यांचे हे विधान चुकीच्या माहितीवर आधारित आहे. त्यांचे विधान आम्हाला मान्य नाही. जे देश भारतातील अल्पसंख्यांकांवर टीपणी करतात, त्यांनी आधी स्वत:कडे बघावे, त्यानंतर दुसर्यांवर टीपणी करावी.
खामेनी, तुम्ही तुमच्याच लोकांचे खुनी आणि अत्याचारी आहात ! – इस्रायल
इस्रायलचे भारतातील नवे राजदूत रेउवेन अझर यांनी खामेनी यांना ‘एक्स’वर टॅग केले आणि लिहिले, ‘खामेनी, तुम्ही तुमच्याच लोकांचे खुनी आणि अत्याचारी आहात. इस्रायल, भारत आणि लोकशाही असणार्या देशांतील मुसलमानांना मिळते तितके स्वातंत्र्य इराणमध्ये मिळत नाही. मला आशा आहे की, इराणचे लोकही लवकरच मुक्त होतील.
अयातुल्ला अली खामेनी यांनी यापूर्वी भारतविरोधी केलेली विधाने
१. मार्च २०२० मध्ये देहलीत झालेल्या दंगलीच्या वेळी ‘भारतात मुसलमानांचा नरसंहार झाला आहे. जगभरातील मुसलमान या वेळी शोकसागरात बुडाले आहेत. भारत सरकारने धर्मांध हिंदूंवर कठोर कारवाई करावी. सरकारला मुसलमानांचा होणारा नरसंहार थांबवावा लागेल, अन्यथा इस्लामी जग भारताची साथ सोडेल’, असे खामेनी यांनी म्हटले होते.
२. वर्ष २०१७ मध्ये खामेनी यांनी काश्मीरची तुलना गाझा आणि येमेन यांच्याशी केली होती.
३. कलम ३७० रहित केल्यानंतर ‘आम्हाला काश्मीरमधील मुसलमानांच्या परिस्थितीबद्दल चिंता आहे. आमचे भारताशी चांगले संबंध आहेत. अशा परिस्थितीत आम्हाला आशा आहे की, भारत काश्मीरमधील मुसलमानांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आवश्यक पावले उचलेल’, असे त्यांनी म्हटले होते.
संपादकीय भूमिका
|