राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठीचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे !
श्रेणी मूल्यांकन सवलत वर्ष २०२५-२६ पासून संपुष्टात !
पुणे – राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय आणि खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे करण्यात आले आहे. या अधिनियमाची कार्यवाही प्रभावीपणे करणे बंधनकारक आहे. इयत्ता ११ वी आणि १२ वीसाठी मराठीचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे करण्यात आले आहे, तसेच मराठी विषयाची परीक्षा गुणांकनाची न ठेवता श्रेणी स्वरूपात मूल्यांकन करण्याची सवलत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून संपुष्टात येत आहे.
राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन १ एप्रिल २०२० पासून सक्तीचे करण्यात येत असल्याचा अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाची कार्यवाही टप्प्याटप्प्याने करण्यात आली. तरीही राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय आणि खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे आहे. सवलतीचा चुकीचा अर्थ लावून मराठी भाषा पुरेशी गांभीर्याने शिकवली जात नसल्याचे काही ठिकाणी दिसून आल्याने या अध्यादेशाची कार्यवाही सक्तीची करण्यात आली आहे. याविषयीचे निर्देश सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.