अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबई प्रशासनाची सिद्धता पूर्ण !

मुंबई – अनंत चतुर्दशीनिमित्त १७ सप्टेंबर या दिवशी ११ दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्या दृष्टीने मुंबई महापालिका प्रशासनाची सिद्धता पूर्ण झाली आहे.

१. विसर्जन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी महानगरपालिकेचे १२ सहस्र अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असतील.

२. ७१ नियंत्रण कक्ष, ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळांसह २०४ कृत्रिम तलाव, तसेच अन्य विविध सोयीसुविधांची सिद्धता करण्यात आली आहे.

३. महानगरपालिकेच्या विविध खात्यांतील कर्मचार्‍यांमध्ये समन्वय साधण्यासाठी मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १९२ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ६६ निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. विविध ठिकाणी ७२ स्वागत कक्ष निर्माण करण्यात आले आहेत.

४. गिरगाव चौपाटी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागाच्या माध्यमातून भाविकांसाठी विविध नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी या ठिकाणी भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पहाणी केली.

५. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी येणारी वाहने चौपाटीवरील वाळूत अडकू नयेत, यासाठी किनार्‍यांवर ४७८ स्टील प्लेट, तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी ४३ जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ७६१ जीवरक्षकांसह ४८ मोटरबोटी तैनात केल्या आहेत.

६. विसर्जनापूर्वी भाविकांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी १६३ निर्माल्य कलशांसह २७४ निर्माल्य वाहनांचीही सोय करण्यात आली आहे.

७. आरोग्य विभागाकडून ७५ प्रथमोपचार केंद्रांसह ६७ रुग्णवाहिका सिद्ध ठेवण्यात आल्या आहेत.

८. प्रभावी प्रकाश योजनेसाठी ‘बेस्ट’च्या सहकार्याने खांबांवर आणि उंच जागी सुमारे १ सहस्र ९७ ‘फ्लडलाईट’ आणि २७ ‘सर्चलाईट’ लावले आहेत.

९. विसर्जनासाठी येणार्‍या नागरिकांच्या सोयीसाठी १२७ फिरती प्रसाधनगृहे सिद्ध ठेवण्यात आली आहेत.

१०. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहित प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.

११. महानगरपालिकेने यंदा तब्बल २०४ कृत्रिम तलाव सिद्ध केले आहेत.