श्री गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज !
पुणे – श्री गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. १७ सप्टेंबरला सकाळी १० वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला आरंभ होणार आहे. यंदाही मानाच्या आणि प्रमुख मंडळांनी विसर्जनाची जय्यत सिद्धता केली आहे. ढोल-ताशा पथक, बँड, ध्वजपथक, तसेच विविध संस्था आणि संघटना यांचा सहभाग आहे. सर्व गोष्टींचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे.
….अशी आहे मानाच्या ५ आणि प्रमुख मंडळांच्या विसर्जनाची सिद्धता
१. मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची मिरवणूक सकाळी १० वाजता मंडई येथून चालू होणार आहे. पारंपरिक पद्धतीने चांदीच्या पालखीतून ही मिरवणूक निघेल.
२. मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपति सकाळी ९ वाजता श्री जोगेश्वरी चौकातील मांडवातून श्रींचे पालखीत विराजमान होऊन प्रस्थान सोहळा चालू होईल. सकाळी १०.३० वाजता टिळक पुतळा (महात्मा फुले मंडई) येथून मुख्य विसर्जन मिरवणुकीत ही पालखी सहभागी होईल.
३. मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपतीची सकाळी १०.३० वाजता लोकमान्य टिळक पुतळ्यापासून अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते आरती होऊन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे.
४. मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपति सकाळी १०.३० वाजता टिळक पुतळा मंडई येथून पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदींच्या उपस्थितीत श्रींच्या मिरवणुकीस आरंभ होईल.
५. महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानाच्या पाचव्या केसरीवाडा श्री गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला आरंभ होणार आहे. परंपरेप्रमाणे फुलांनी सजवलेल्या पालखीत गणराय विराजमान होणार आहेत.
६. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने श्री गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक दुपारी ४ वाजता निघणार आहे. श्री उमांगमलज रथामध्ये दगडूशेठचे बाप्पा विराजमान होणार आहेत.
७. अनंतचतुर्दशीच्या दिवशी सकाळी ७.३० वाजता श्रीरामजन्मभूमी, अयोध्याचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची पूजा होईल. सकाळी ८.३० वाजता भव्य रथातून विसर्जन मिरवणुकीसाठी मूर्तीचे प्रस्थान होईल.