(म्हणे) ‘हनुमान चालीसाचा आवाज न्यून करावा’
नाशिक येथील कार्यक्रमात छगन भुजबळ यांचा पोलिसांना आदेश
मुंबई – नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ प्रसारित झाला. त्यात मध्येच ‘हनुमान चालीसा’ चालू झाल्याने त्यांनी तिचा आवाज न्यून करण्यास पोलिसांना सांगितले आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे भाषण पूर्ण केले.
भुजबळ पोलिसांना म्हणाले, ‘‘बजरंगबलीला सांगा, बोल बजरंगबली तोड दुश्मन की नली. जरा आवाज न्यून करा, मी सुद्धा बजरंगबलीचा भक्त आहे बाबा. त्यांच्याच आशीर्वादाने हे सर्व काम चालू आहे. काय कुठे मंदिर आहे. केवढा आवाज आहे !’’
हनुमान चालीसा चालू होताच व्यासपिठावरील कार्यकर्ता भुजबळांना म्हणाला, ‘‘बजरंगबलीसुद्धा धावून आले तुमच्यासाठी.’’ यावर भुजबळ म्हणाले, ‘‘बजरंग बलीच्या हाती सगळे आहे.’’
याविषयी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले, ‘‘अमरावतीतील हनुमान चालीसावाल्या ज्या बाई आहेत, त्या बाई नाशिकला पोचल्या पाहिजेत. त्यांनी भुजबळ फार्मवर जाऊन हनुमान चालिसा वाचायला हवी. आहे का तुमचे धाडस ? कारण भुजबळ तुमच्या पक्षाशी संबंधित आहेत.’’
संपादकीय भूमिका :अन्य धर्मियांच्या संदर्भात अशी घटना घडली असती, तर भुजबळ यांनी आवाज न्यून करण्यास सांगण्याचे धाडस केले असते का ? |