ईदमुळे पूर्वनियोजित श्री गणेशमूर्तीच्या विसर्जन मिरवणुकींच्या दिनांकात पालट करण्याचा धारावी पोलीस ठाण्याचा फतवा !
मुंबई – १८ सप्टेंबर या दिवशी ईद आल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवांच्या पूर्वनियोजित मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकींच्या दिनांकात पालट करावा, असा फतवा धारावी पोलीस ठाण्याकडून काढण्यात आला आहे. धारावी पोलीस ठाण्याच्या परिसरातील ज्या गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुका १८ सप्टेंबर या दिवशी होत्या, त्या सर्व मंडळांना याविषयीचा ‘व्हॉट्सॲप’ संदेश पोलिसांकडून संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांना पाठवण्यात आला आहे. पोलिसांच्या या बोटचेप्या धोरणाविषयी सर्व धर्मप्रेमी हिंदूंकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. (हे पोलीस भारतात आहेत कि पाकिस्तानात ! – संपादक)
श्री अनंतचतुर्दशीच्या दिवशी मूर्तीविसर्जनाला गर्दी असल्यामुळे धारावी परिसरातील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे दुसर्या दिवशी विसर्जन मिरवणूक काढतात. त्यानुसार या वर्षी १८ सप्टेंबर या दिवशी विसर्जन मिरवणूक काढण्याविषयीची पत्रे संबंधित गणेशोत्सव मंडळांकडून धारावी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहेत.
सरकारने घोषित केलेल्या सुट्यांनुसार यापूर्वी १६ सप्टेंबर या दिवशी ‘ईद’ होती; मात्र चंद्रोदय १८ सप्टेंबर या दिवशी असल्यामुळे अचानक ईदची सुटीही १६ सप्टेंबरऐवजी १८ सप्टेंबर या दिवशी करण्यात आली. त्यामुळे १८ सप्टेंबर या दिवशी धारावी परिसरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकींची अनुमती पोलिसांकडून नाकारण्यात आली आहे. याविषयी पोलीस ठाण्याकडून गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांना पाठवण्यात आलेल्या संदेशामध्ये ‘श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या पूर्वनियोजित दिनांकामध्ये पोलीस ठाण्यात येऊन पालट करावा. त्याऐवजी १७ किंवा १९ सप्टेंबर या दिवशी मिरवणूक काढावी’, असा सल्ला देण्यात आला आहे. हा संदेश धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांच्या नावे पाठवण्यात आला आहे.
(म्हणे) ‘कायदा आणि सुव्यवस्था यांसाठी ईदच्या दिवशी अनुमती नाही !’
या संदेशाची सत्यता पडताळण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने धारावी पोलीस ठाण्यात दूरध्वनीद्वारे संपर्क केला. या वेळी पोलिसांकडून आम्ही अनंतचतुर्दशीच्या दिवशी (१७ सप्टेंबर) श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीला अनुमती नाकारलेली नाही; मात्र ईदच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ईदच्या दिवशी (१८ सप्टेंबर) विसर्जन मिरवणुकीला अनुमती नाकारण्यात आली आहे, असे सांगण्यात आले.
संपादकीय भूमिका :कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण होतो ? याचा विचार न करता हिंदूंना नमते घ्यायला लावणारे हिंदुद्रोही पोलीस ! |