सिंधुदुर्गातील ४ रेल्वेस्थानकांच्या परिसराचे सुशोभिकरण; मात्र फलाटावर असुविधा !
सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील ४ रेल्वेस्थानकांच्या प्रवेशद्वारासह परिसराचे कोट्यवधी रुपये खर्च करून सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानकांना बाहेरून विमानतळासारखे प्रेक्षणीय रूप (एअरपोर्ट लूक) आले असले, तरी प्रवाशांना रेल्वेस्थानकांवर असुविधांना सामारे जावे लागत असल्याने रेल्वेस्थानक परिसराच्या सुशोभिकरणाबरोबरच प्रवाशांना रेल्वे फलाटावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य द्यावे, अशी मागणी प्रवाशांसह जनतेतून केली जात आहे.
कोकणात पर्यटनास चालना देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील कोकण रेल्वेच्या स्थानकांना जोडणार्या रस्त्यांची दुरुस्ती अन् स्थानकांच्या प्रवेशद्वारासह परिसराचे सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या तीनही जिल्ह्यांत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. त्यांपैकी पर्यटनदृृष्ट्या महत्त्वाची आणि प्रवाशांची सातत्याने वर्दळ असणारी रायगड जिल्ह्यातील वीर, माणगाव आणि कोलाड; रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर अन् खेड, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी या १२ स्थानकांच्या कामांना राज्यशासनाने मान्यता देऊन त्यासाठी ५६ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारही स्थानकांचे बाहेरून सुशोभिकरण पूर्ण होऊन त्याचे लोकार्पणही करण्यात आले आहे. यामध्ये रेल्वेस्थानकांपर्यंत येणार्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, महिला आणि पुरुष प्रवाशांकरता स्वतंत्र स्वच्छतागृहाची बांधणी, स्थानक परिसरात बसथांबे, येणार्या-जाणार्या प्रवाशांसाठी प्रवेश अन् बाहेर पडण्याकरता प्रशस्त मार्ग, दुचाकी, चारचाकी, बस आणि रिक्शा यांसाठी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच प्रवेशद्वाराचा परिसर आकर्षकरित्या सजवण्यात आला आहे. असे असले, तरी संपूर्ण रेल्वे फलाटावर छत नाही. त्यामुळे प्रवाशांना ऊन आणि पाऊस असतांना त्रास सहन करावा लागतो. सध्या पावसाळा असल्याने गाडी आल्यावर भिजतच गाडीत प्रवास करावा लागतो, असे सध्याचे चित्र आहे.
गणेशोत्सव हा जिल्ह्यातील सर्वांत मोठा सण. यासाठी लाखो गणेशभक्त जिल्ह्यात आले. परंपरेनुसार दीड, पाच, सात दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करून आता गणेशभक्त परतीच्या मार्गावर आहेत. अशा वेळी गाड्याही पुष्कळ विलंबाने धावत असून फलटांवर छत नसल्याने त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. यासह फलाटांवर अन्य सुविधाही देण्यावर प्रशासनाने भर द्यावा, अशी मागणी प्रवासी, तसेच जनतेतून केली जात आहे.
याविषयी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी, ‘रेल्वेस्थानकांच्या बाहेरील भागाचे सुशोभिकरण करण्यास अनुमती मिळाली आहे, त्याप्रमाणे रेल्वे फलाटावरही काम करण्यास रेल्वे प्रशासनाने अनुमती दिली, तर तेथेही काम करू’, असे सांगितले आहे.