सांगली जिल्ह्यात ७९ गावांत ‘एक गाव एक गणपति’ !

  • ६१७ गावांची उपक्रमाकडे पाठ !

  • तंटामुक्ती स्पर्धा संपल्याचा परिणाम !

  • सांगली जिल्ह्याला वर्ष २००८-०९ मध्ये पुरस्कार मिळाला ! 

म. गांधी तंटामुक्त अभियानात सांगली जिल्ह्याने वर्ष २००८ – ०९ मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्या वेळी तब्बल ३३४ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपति’ हा उपक्रम राबवण्यात आला होता. पारितोषिकाच्या रकमेच्या आशेने स्पर्धेचे निकष पूर्ण करण्याकडे अनेक गावांचा कल होता; परंतु कालांतराने त्यामध्ये घट झाली. मागील वर्षी जिल्ह्यातील केवळ ५७ गावांनी उपक्रमात सहभाग घेतला होता. यंदा त्यामध्ये २२ गावांची भर पडली आहे.

श्री. सचिन कौलकर, सांगली.

‘एक गाव एक गणपति’

सांगली – जिल्ह्यातील गावांमध्ये एकोपा आणि ऐक्याचे वातावरण रहावे यासाठी जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपति’ उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबवण्यात येत आहे; मात्र प्रतिवर्षी या उपक्रमात सहभागी होणार्‍या गावांची संख्या अल्प होत आहे. तंटामुक्ती अभियान मोहिमेला पूर्णविराम मिळाल्यापासून ‘एक गाव एक गणपति’ उपक्रमास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. गतवर्षी या उपक्रमात १२० गावांत ‘एक गाव एक गणपति’ हा उपक्रम राबवण्यात आला होता. यंदाच्या वर्षी ही संख्या घटून पोलिसांनी अथक प्रयत्न केल्यावर जिल्ह्यातील ६९६ पैकी केवळ ७९ गावांनी त्यास प्रतिसाद दिला.

सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष यांचा सहभाग महत्त्वाचा !

वर्ष २००८ मध्ये सांगली जिल्ह्यात ३३४ गावांत ‘एक गाव एक गणपति’ उपक्रमाअंतर्गत श्री गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होत होती. त्याच जिल्ह्यात यंदा पोलिसांनी अथक प्रयत्न केल्यावर ६९६ पैकी केवळ ७९ गावांनी त्यास प्रतिसाद दिला.

तंटामुक्ती अभियानाला ‘ब्रेक’ बसल्याने ‘एक गाव एक गणपति’ उपक्रमाला अल्प प्रतिसाद !

राज्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत आर्.आर्. पाटील यांनी १५ ऑगस्ट २००७ मध्ये तंटामुक्ती अभियानाचा प्रारंभ केला. या योजनेत गावांना पारितोषिक दिले जात होते. त्यामध्ये ‘एक गाव एक गणपति’ उपक्रम राबवणार्‍या गावांना अधिक गुण मिळत होते. प्रारंभी जिल्ह्यातील ७३४ पैकी निम्मी गावे उपक्रमात सहभागी होत होती; परंतु नंतरच्या काळात उपक्रमाला प्रतिसाद अल्प मिळत गेला. तंटामुक्ती अभियान स्पर्धेत विजेते होण्यासाठी शासनाने घालून दिलेले निकष पाळणे आवश्यक होते. मिळणारी रक्कम लाखो रुपयांत असल्याने त्याचा उपयोग गावाच्या विकासासाठी होत होता. अभियान चालू असेपर्यंत ग्रामीण भागातून उपक्रमास मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक होता; परंतु अभियानाला ‘ब्रेक’ बसल्यामुळे ग्रामस्थांचाही उत्साह मावळला. यंदा पोलीस अधीक्षकांनी या उपक्रमाचे दायित्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाणे प्रभारी यांच्यावर सोपवले होते. त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले; परंतु त्यांना अन्य संघटना, तसेच राजकीय पक्ष यांची कृतीरूप साथ मिळाली नाही. गावात एकोपा आणि शांतता ठेवल्याविषयी प्रोत्साहनपर अनुदान किंवा कौतुकाची थाप हवी होती; परंतु त्यामध्ये उदासीनता दाखवली गेली.

गणेशोत्सवातील अनुचित प्रकार रोखण्यासाठी ‘एक गाव एक गणपति’ उपक्रम आवश्यक !

अधिकाधिक गावांत एकाच सार्वजनिक श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी हा म. गांधी तंटामुक्ती अभियानाचा एक हेतू होता. ‘एक गाव एक गणपति’ उपक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण गाव संघटित होऊन विधायक कार्यक्रमांचा चालना मिळेल, अशी त्यामागे भावना होती. गाव म्हटले की राजकारण आणि गट-तट आलेच. श्री गणेश आगमन आणि विसर्जनाची गावातून एक मिरवणूक निघाली, तर हेवेदाव्यांना मुठमाती मिळून पोलिसांवरील ताण अल्प होण्यास साहाय्य होत होते. ग्रामीण भागात पोलीस ठाण्यापासून अनुमाने ३० किलोमीटरच्या आत गावे वसली आहेत. गणेशोत्सवात एखादा अनुचित प्रकार घडला, तर पोलिसांना घटनास्थळी पोचण्यासाठी किमान अर्धा घंटा तरी लागतो. त्याला प्रतिबंध बसावा यासाठीही या उपक्रमाचे महत्त्व होते.

उपक्रमावर विधानसभेसह इतर निवडणुकांचा परिणाम !

आगामी विधानसभा निवडणुकांसह जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांची सिद्धता इच्छुकांनी चालू ठेवली आहे. काही नेते मंडळींनी गावांतील गणेशोत्सव मंडळांना वर्गणी दिली आहे. वर्गणी मिळाल्यामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांनी ‘एक गाव एक गणपति’ उपक्रमाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे गावांची संख्या घटली आहे. एकंदरीत निवडणुकांचा या उपक्रमावर परिणाम झाला आहे.

समाजाची सात्त्विकता दिवसेंदिवस अल्प होत असल्यामुळे उत्सवांमधील गैरप्रकार वाढत आहेत. समाजाला  ‘एक गाव एक गणपति’ ही संकल्पना समजण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक !

पोलिसांच्या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षता !

‘एक गाव एक गणपति’ बसवण्याविषयी पोलिसांनी केलेल्या आवाहनाला गावांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. जिल्हा पोलीस दलाने गणेशोत्सवापूर्वी मंडळांच्या बैठकीत ‘एक गाव एक गणपति’ आणि शहरात ‘एक प्रभाग एक गणपति’ संकल्पना राबवण्याचे आवाहन केले; मात्र यंदा ७९ गावांनीच हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. पोलीस ठाण्याच्या स्तरावर ‘एक गाव एक गणपति’सह पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आवाहन करण्यात आले; परंतु या उपक्रमाला थंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ७९ गावे वगळून इतर गावांमध्ये पोलिसांना मिरवणुकांमध्ये बंदोबस्त ठेवावा लागेल.

‘एक गाव, एक गणपति’ उपक्रमास संमिश्र प्रतिसाद !

पुणे – ‘एक गाव, एक गणपति’ या उपक्रमामुळे गावामध्ये एकोपा वाढतो, वायफळ व्ययांमध्ये बचत होते आणि जमलेल्या निधींतून विधायक विकासकामे करता येतात. या संकल्पनेतून ‘एक गाव, एक गणपति’ राबवण्यात येत असतो; परंतु यंदाच्या वर्षी मावळ तालुक्यातील केवळ २५ गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला आहे. दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील ३३ गावांपैकी केवळ ७ गावांमध्ये हा उपक्रम राबवला आहे.

राज्यशासनाने चालू केलेल्या या उपक्रमास प्रारंभी भरपूर प्रतिसाद मिळाला; परंतु प्रतिवर्षी अपेक्षित असे प्रयत्न न झाल्याने आणि गावा-गावांमध्ये श्री गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढत असल्याने या उपक्रमाला प्रतिसाद मिळत नाही. श्री गणेशोत्सव मंडळांमध्ये आपल्या मंडळाचा सोहळा चांगला झाला पाहिजे, अशी स्पर्धा लागलेली असल्यामुळे उपक्रमास प्रतिसाद अल्प आहे.

अकोला – अकोला जिल्ह्यात सुमारे १ सहस्र ७३२ गणपतींची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये ३०२ ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’चा समावेश आहे.

बीड – ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने प्रत्येक वर्षी जास्तीतजास्त गावांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा, यासाठी प्रयत्न केले जातात. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७० गावे असून ५५ गावांत श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात येते. या वर्षी ४५ गावांत ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना जोपासली आहे. मागील वर्षी या हद्दीतील ३४ गावांत ही संकल्पना राबवण्यात आली होती.

पंढरपूर – येथे दुष्काळाचे सावट असतांना विघ्नहर्ता गणरायाचे पंढरपुरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. शहर आणि तालुक्यांमध्ये सुमारे ३५० गणेशोत्सव मंडळांत सार्वजनिक गणपति तसेच घरगुती गणपति विराजमान झाले. १५ गावांत ‘एक गाव एक गणपति’ ही संकल्पना राबवली जात आहे.

बुलढाणा – या वर्षी ३०८ गावांत एकाच गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. एकट्या बुलढाणा पोलीस उपविभागातच ८२ गावांतील गावकर्‍यांनी हा उपक्रम राबवून एकजूट दाखवली. जिल्ह्यात यंदा १ सहस्र ४५ गणेशोत्सव मंडळांची स्थापना करण्यात आली आहे.

धुळे – येथे ७४ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपति’ या संकल्पनेनुसार प्रत्येक गावात एकच गणपति बसवण्यात आला आहे. दुष्काळाचे सावट असले तरी श्री गणेशभक्त आणि गणेशोत्सव मंडळांचा उत्साह कायम आहे. काही मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी यंदा आरासावरील व्यय अल्प केला असला तरी इतर समाजोपयोगी कार्यक्रमांवर भर दिला आहे.