दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : रायगडावर जाणार्या पर्यटकांचा अपघात !; चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील १ ठार !
रायगडावर जाणार्या पर्यटकांचा अपघात !
महाड – नवी मुंबईच्या पर्यटकांना रायगडावर घेऊन आलेली खासगी आराम बसगाडी रायगडाजवळील कोझर घाटात कोसळली. शेवटच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ३० फूट खोल दरीत गेली. या बसगाडीत ४४ प्रवासी होते. अपघातामध्ये कुणीही गंभीर घायाळ झाले नाही. अपघातानंतर या बसगाडीतील प्रवाशांना पुन्हा ऐरोली, नवी मुंबई येथे जाण्यासाठी महाड एस्.टी. आगाराकडून बसगाडीची व्यवस्था करण्यात आली.
चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील १ ठार !
मुंबई – दहिसर पूर्व येथील पश्चिम द्रुतगती मार्गावरील पुलाखाली जात असतांना एका चारचाकी चालकाने ‘हॉर्न’ न वाजवता दुचाकीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दुचाकीला धडक बसली अन् दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात दुचाकीवर मागे बसलेल्या आदित्य वेलणकर (वय १७ वर्षे) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दहिसर पोलिसांनी चारचाकी चालकावर गुन्हा नोंदवून शोध चालू केला आहे.
४ लाख रुपयांचे जनावरांचे मांस जप्त !
डोंबिवली – शिळफाटा रस्त्यावरील शिळ गावातील एका जागरूक नागरिकाच्या सतर्कतेमुळे आणि मानपाडा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे गोळवली गावाजवळ जनावरांच्या मांसाची अवैध तस्करी करणारी दोन वाहने पोलिसांनी जप्त केली. या वाहनांमधून पोलिसांनी ४ लाख रुपयांचे जनावरांचे मांस जप्त केले. या दोन्ही वाहनांमधील चालक पोलिसांना पाहून पळून गेले.
शेजार्याकडून ४ वर्षीय मुलीवर अत्याचार !
मुंबई – शेजार्याच्या घरी खेळायला गेलेल्या ४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. गोरेगावच्या प्रेमनगर येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी २९ वर्षीय नराधमाला पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
संपादकीय भूमिका : अशा वासनांधांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी !
पिस्तुलांची विक्री करणारे सराईत गुन्हेगार अटकेत !
पिंपरी (पुणे) – चिंचवडमध्ये पिस्तुलांची विक्री करणारा सराईत गुन्हेगार नवल झामरे आणि त्याचे ४ साथीदार यांना अटक केली आहे. मध्यप्रदेशातून आणलेली पिस्तुले झामरे हा पिंपरी-चिंचवडमध्ये आणून त्याची विक्री करत होता. त्याच्याकडून ७ पिस्तुले, १४ जिवंत काडतुसांसह १६ लाख ६५ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.