ठाणे येथील वृद्धेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
ठाणे – अटक वॉरंट बजावण्यात आल्याचे सांगून ठाण्यातील ६१ वर्षीय महिलेची ३ कोटी ४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. वृद्ध महिलेला संपर्क करून कुरिअर आस्थापनातून बोलत असल्याचे सांगत काही प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले. त्यानंतर महिलेला त्यांचे लॅपटॉप, ४ किलो कपडे, तसेच इतर काही साहित्य सीमाशुल्क विभागाने जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले; परंतु असे कोणतेही साहित्य मागवले नसल्याने महिलेने त्यांना टाळले. त्यानंतर ‘मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण शाखेसोबत संपर्क करून देतो’, अशी भीती त्याने महिलेला घातली. तिला व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉल करण्यात आला. त्यामध्ये एका व्यक्तीने पोलीस असल्याचे सांगून त्यांची वैयक्तिक माहिती मागितली.
काही वेळाने त्या व्यक्तीने ‘केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीबीआय) अधिकारी संपर्क साधतील’, असे सांगितले. त्यानंतर महिलेला आणखी एका व्यक्तीने संपर्क साधत तिच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहार, मानव तस्करी आणि अमली पदार्थ तस्करीचे गुन्हे नोंद असल्याची बतावणी केली. तसेच ‘तिच्याविरोधात अटक वॉरंट काढले’, आहे असेही सांगितले. त्यानंतर त्या महिलेला अधिकोषाच्या खात्यातील रकमचे परीक्षण करण्यासाठी तिच्या बँकेतील रक्कम वळती करण्यास सांगितली. त्यामुळे महिलेने घाबरून टप्प्याटप्प्याने ३ कोटी ४ लाख रुपये वळते केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्याआधारे गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाअशांना पोलिसांनी तत्परतेने पकडून कठोर शिक्षा करावी ! |