सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेची सातत्याने अनुभूती घेणार्या सांगली येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुलभा दत्तात्रय कुलकर्णी (वय ७५ वर्षे) !
भाद्रपद शुक्ल चतुर्दशी (अनंत चतुर्दशी) (१७.९.२०२४) या दिवशी सांगली येथील सौ. सुलभा दत्तात्रय कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांचा ७५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास पुढे दिला आहे.
(सौ. सुलभा दत्तात्रय कुलकर्णी यांना ७५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून शुभेच्छा !
१. बालपणीचे घरातील आध्यात्मिक वातावरण
‘कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी हे माझे माहेर आहे. बालपणापासूनच माझ्यावर अध्यात्माचे संस्कार होत होते.
२. यजमानांना अध्यात्माची आवड असल्याने साधनेसाठी त्यांनी विरोध न करणे
माझा विवाह सांगली येथील श्री. दत्तात्रय कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ८० वर्षे) यांच्याशी झाला. ‘यजमानांनाही अध्यात्माची आवड असावी’, अशी माझी सुप्त इच्छा होती. ती ईश्वराने पूर्ण केली. त्यांनी मला साधनेसाठी कधीच विरोध केला नाही.
३. कीर्तने, प्रवचने यांच्या माध्यमातून आध्यात्मिक वातावरणात रहाता येणे
यजमानांच्या चाकरीनिमित्त आम्ही जत येथे रहाण्यास गेलो. तिथेही ‘जेथे जातो, तेथे तू माझा सांगाती’ याप्रमाणे मला आध्यात्मिक वातावरण लाभले. तिथे गुरुवारी स्वामी स्वरूपानंदांचा संप्रदायाचा सत्संग असे. तसेच तिथे मी गीता आश्रम येथे जात होते. मिरजेचे विश्वेश बोडस यांच्याकडून गीता शिकण्यास, तसेच त्यावरील प्रवचनांचा लाभ मिळत असे. एकूण सर्व आनंदी वातावरण होते. आम्ही तिथे १५ वर्षे वास्तव्य केले. तिथेच तीन सुकन्या होऊन त्यांचे बालपण चांगले गेले. सर्वांनाच अध्यात्माची आवड आहे.
४. पूर्वसुकृताची जोडी म्हणुनी सनातन आवडी ।
वर्ष १९८५ मध्ये आमचे सांगली येथे स्थानांतर झाले. तिथेही प्रवचने, कीर्तने या माध्यमातून आध्यात्मिक वातावरण मिळत गेले. फेब्रुवारी १९९७ मधे आमच्या घराजवळ असलेल्या राममंदिरामध्ये ‘अध्यात्माचे प्रवचन आहे’, असा निरोप घरासमोरील एका काकूंनी दिला. मी प्रवचनास गेले. आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांचे तिथे प्रवचन होते. त्या वेळी मी त्यांच्याकडे पहातच बसले. त्यांचा हसतमुख चेहरा डोळ्यांसमोरून जात नव्हता. तेव्हाच माझी नाळ सनातन संस्थेशी जोडली गेली. त्याच वेळी आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत, वैद्या माया पाटील यांचाही सत्संग लाभला.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे प्रथमदर्शन आणि साधनेला मिळालेली कलाटणी
प.पू. डॉक्टरांचे पहिले व्याख्यान सांगली येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झाले. व्याख्यान झाल्यानंतर आम्ही अजून साधनेकडे वळलो. वर्ष १९९७ पासून लगेचच आम्ही कुलदेवी आणि दत्त यांचा जप चालू केला. नियमित सत्संगाला जाऊ लागलो. सत्सेवा लगेच चालू केली. मिळेल ती सेवा जीव ओतून केली. गुरुपौर्णिमेपूर्वी छोटी छोटी प्रवचने घेऊ लागले. मला सोलापूरला गुरुपौर्णिमेचे प्रवचन घेण्याची संधी मिळाली. प्रवचनाची सिद्धता सौ. नंदिनी सामंत यांनी करून घेतली होती. सर्वांनी ‘प्रवचन चांगले झाले’, असे सांगितले. तेव्हा ‘भाव म्हणजे काय ? अनुभूती म्हणजे काय ?’, हे लक्षात येत नव्हते. आता लक्षात येत आहे की, गुरु साधना शिकवतात, करून घेतात आणि अनुभूतीही देतात.
६. स्थुलातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा मिळालेला दैवी सहवास
६ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या समवेत दौर्यासाठी जाण्याची संधी मिळणे : संसार चालू असतांना ‘सुवर्णाक्षरांनी लिहावे’, असे क्षण मला अनुभवता आले. संत नामदेव महाराजांना जसा ‘देव जेवला हो देव जेवला । या या डोळ्यांनी मी पाहिला ।’, असे अनुभवता आले. मलाही तशीच संधी मिळाली. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची ५ जाहीर प्रवचने सांगली जिल्ह्यामध्ये होती. तेव्हा प.पू. डॉक्टरांच्या गाडीत, म्हणजे देवाच्या रथात बसून सर्वत्र जाण्याची संधी मला आणि सांगलीच्या सौ. गौरी खिलारे यांना मिळाली. सर्वत्र आम्हाला श्री अन्नपूर्णामातेची सेवा करण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्या वेळी खरंच पुष्कळ चुका होत होत्या; पण आनंदही मिळत होता.
६ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनुभवलेली अपार प्रीती : दौर्यामध्ये कराड येथील वडणगेकर यांच्या घरी गुरुदेवांच्या समोरच्या खोलीत आमचा मुक्काम होता. तेव्हा अनुभवलेले गुरूंच्या प्रीतीचे क्षणमोती येथे दिले आहेत.
१. सभागृहात सत्संग चालू असेल, तर ते आम्हाला स्वयंपाकघरातून बाहेर येऊन बसायला सांगत. ते सौ. गौरी खिलारे यांना म्हणाले, ‘‘तुम्ही स्वयंपाकघरात काय करता ? तुम्हाला धर्मरक्षणाचे कार्य करायचे आहे.’’
२. आमचा कोयनानगरमध्ये मुक्काम होता. तेव्हा तेथील सौ. कणसेवहिनी आमच्यासाठी डबा घेऊन आल्या होत्या. तेव्हा प.पू. डॉक्टर बाहेर शतपावली घालत होते. त्या परत जाण्यासाठी निघाल्या. तेव्हा थंडी असल्याने गुरुदेवांनी त्यांच्या अंगावर पांघरण्यासाठी शाल दिली. तो क्षण आठवला की, आजही डोळे भरून येतात. याला ‘प्रीती’ म्हणतात, हे आज कळत आहे.
७. विविध सेवांच्या माध्यमातून आनंद मिळणे
७ अ. अध्यात्मप्रसाराची सेवा करणे : त्यानंतर सनातन संस्थेकडून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू झाले. त्या सेवेसाठी आम्ही ओरोस, जिल्हा सिंधुदुर्ग येथे गेलो होतो. त्यानंतर सत्संग घेणे, गुरुपौर्णिमा, जाहीर प्रवचने, धर्मसभा या निमित्ताने प्रसार करणे, आसपासच्या गावांत ‘सनातन प्रभात’ वितरण करणे, विज्ञापने आणि अर्पण गोळा करणे, ग्रंथप्रदर्शन लावणे अशा विविध सेवा करता आल्या.
७ आ. कोणताही अनुभव नसतांना गुरुकृपेने वार्ताहर म्हणून सेवा करता येणे : काही दिवसांनी मला वार्ताहर म्हणून बातम्या लिहिणे, ही सेवा मिळाली. त्या वेळी धावपळ व्हायची; पण दैनिकात आलेली बातमी वाचली की, पुष्कळ आनंद व्हायचा.
७ इ. सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून सेवा करता येणे : नंतर वयोमानानुसार बाहेर पडता येत नसल्याने घरी बसून विविध सेवा मिळाल्या. त्यात सामाजिक माध्यमांद्वारे अध्यात्मप्रसाराची संधी मिळाली. ती सेवा शिकून ती घरबसल्या करता येत आहे.
७ ई. ‘ऑनलाईन’ साधना सत्संग घेण्याची संधी मिळणे : कोरोना महामारीच्या काळात आणि नंतर ‘ऑनलाईन’ साधना सत्संग चालू झाले. ते घेण्याची संधी मिळाली. तसेच साधकांचे व्यष्टी साधनेचे आढावेही घेता येत आहेत.
८. अनेक कठीण प्रसंगांना गुरुकृपेने सामोरे जाता येणे
हे सर्व चालू असतांना संसारामध्ये अनेक प्रसंग घडत होते. माझ्या यजमानांचे वर्ष २००० मध्ये हृदयाचे शस्त्रकर्म झाले. तेव्हा मला गुरुदेवांनी स्थिर ठेवले.
९. स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवल्याने आध्यात्मिक प्रगती होणे
९ अ. इतरांच्या चुकांऐवजी स्वतःच्या दोषांकडे लक्ष जाऊन स्वभावदोष घालवण्यासाठी प्रयत्न चालू होणे : वर्ष २००३ पासून सनातन संस्थेत स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया चालू झाली. त्यामुळे खर्या अर्थाने साधनेस प्रारंभ झाला. एकदा बैठकीत सांगितले गेले की, तुमच्या देहबोलीतून अहंकार दिसतो. तेव्हा माझे डोळे उघडले आणि स्वभावदोषांची तीव्रतेने जाणीव होऊ लागली.
९ आ. स्वयंसूचना आणि कृतीच्या स्तरावर प्रयत्न केल्याने पालट दिसू लागणे : मध्यंतरीच्या काळात गावभाग, सांगली येथील श्रीमती मधुरा तोफखाने यांच्याकडे आमचा आढावा होता. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता येत होते. त्यामुळे प्रक्रिया मनामध्ये रुजली, तसेच तात्काळ स्वयंसूचना दिल्याने आणि कृतीच्या स्तरावर प्रयत्न केल्याने पालट दिसू लागले.
माझ्या या साधनाप्रवासामध्ये अनेक साधकांनी मला पथदर्शन केले. या सर्वांची मी ऋणी आहे. शेवटी ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’ म्हणजे ‘गुरुकृपा शिष्याचे परम कल्याण करते.’
वर्ष १९९७ पासून साधनेला प्रारंभ होऊन आता जवळजवळ २७ वर्षे पूर्ण होत आहेत. वर्ष २०१९ मधे माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के घोषित करून प.पू. डॉक्टरांनी मला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त केले. हा साधनाप्रवास मी गुरूंच्या कृपेमुळेच लिहू शकले. हा साधनाप्रवास त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने समर्पित करते आणि मागणे मागते.
आर्त भाक घाली देवा ।
एकमेव तुज लागून ।
मागणे न काही रामा ।
तव चरणा वाचुनी ।।
– श्री गुरूंची चरणरज,
सौ. सुलभा दत्तात्रय कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ७५ वर्षे), गावभाग, सांगली. (२६.८.२०२४)
धीरोदात्तपणे सर्व कठीण प्रसंगांना गुरुकृपेने सामोरे जाणार्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्या सांगली येथील सौ. सुलभा दत्तात्रय कुलकर्णी (वय ७५ वर्षे)‘माझी आई सौ. सुलभा दत्तात्रय कुलकर्णी ही व्यवहारात, तसेच अध्यात्मात चिकाटीने सर्व प्रसंग हाताळते. साधना करतांना बोलतांना होणार्या चुका अल्प करण्याचा ती प्रयत्न करत आहे. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने तिची आध्यात्मिक प्रगतीही शीघ्र गतीने होत आहे. याबद्दल प.पू. डॉक्टर यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता ! ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘तिची अशीच आध्यात्मिक प्रगती होत राहो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’ – सौ. कविता बेलसरे (सौ. सुलभा कुलकर्णी यांची मोठी मुलगी), कुडाळ, सिंधुदुर्ग. (६.९.२०२४) |