मिरवणूक सात्त्विक आणि प्रबोधनात्मक करा !

गणेशोत्सव विशेष…

भाद्रपद मासातील चतुर्थीचे पवित्र व्रत, म्हणजे श्री सिद्धिविनायकाचे व्रत ! ‘गणपति बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ असे म्हणत बाप्पांना घरी आणतो आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’, असे म्हणत भावाश्रूंनी बाप्पांना निरोप देतो. अत्यंत श्रद्धेने बाप्पांच्या मंगलमय मूर्तीची घरी प्राणप्रतिष्ठापना केली जाते. साक्षात् भगवंत घरी विराजमान होऊन सर्वांना आनंद देतो. गणपति बाप्पांचे आगमन आणि विसर्जन यांच्यातील समान धागा म्हणजे मिरवणूक !

प्राणप्रतिष्ठा करतांना गणरायाच्या विश्वव्यापी तत्त्वाचे मूर्तीमध्ये आवाहन केले आहे, याचा विसर मिरवणुकीच्या वेळी झालेला दिसतो. मोठमोठ्या आवाजातील हृदयाचा ठोका चुकवणारी ध्वनीक्षेपक यंत्रणा, त्यावर लावण्यात येणारी अश्लील अन् रज-तम गुण प्रक्षेपित करणारी चित्रपट गीते, महिला आणि पुरुष यांचे बेभान होऊन विचित्र अंगविक्षेप करत केला जाणारे ‘डान्स’, मद्यप्राशन करून मद्यपींकडून केले जाणारे असभ्य वर्तन, महिलांची काढली जाणारी छेड, अवाजवी रोषणाई, चमकीचे कागद उडवणे असे मिरवणुकीचे स्वरूप असते. सामाजिक स्वास्थ्याचे किंचितही भान आयोजक आणि सहभाग घेणारे यांना नसते. अशा वर्तणुकीमुळे बाप्पाची अवकृपा ओढावून घेतली जाते. लोकमान्य टिळक यांनी चालू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा हेतू अशा प्रकारच्या मिरवणुकांतून कुठेही साध्य होत नाही.

बाप्पाचे स्वागत निसर्गही करतो. वारा सनईचा सूर धरतो, ढग ढोलाप्रमाणे गडगडतात, वीज ताशांप्रमाणे कडाडते आणि गणरायाचे आगमन होते. पंचतत्त्व जिथे बाप्पांचे जोरदार स्वागत करतात, विसर्जनालाही उपस्थित असतात, तिथे मानवाने काढलेल्या मिरवणुकीचे काय ? बाप्पाच्या या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी प्रत्येक कृती अधिकाधिक सात्त्विक करण्याकडे लक्ष देणे भाग आहे. मंजूळ स्वरात टाळ आणि टाळ्या वाजवत, मुखाने गणपति बाप्पाचा जयघोष, नामजप करत त्याला आणले पाहिजे आणि तसाच निरोपही दिला पाहिजे. अशा पद्धतीने केल्याने आपल्यालाच एक वेगळ्या प्रकारे आत्मिक शांतीची अनुभूती येईल आणि बाप्पाचे तत्त्व खर्‍या अर्थाने अनुभवू शकू.

सध्याचा काळ पहाता राष्ट्र आणि हिंदु धर्म यांवर सर्व स्तरांतून आक्रमणे होत आहेत, द्रष्टे संत सांगत असलेला आपत्काळही वेगाने समीप येत आहे. काळानुसार संघटनाचीही आवश्यकता आहे. अशा वेळी राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात समाजासमोर आणणे, आघात आणि आपत्काळ यांना तोंड देण्यासाठी करावयाची सिद्धता यांची माहिती देणार्‍या विविध पथकांचा समावेश करू शकतो. अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म अग्रस्थानी ठेवून काढलेल्या मिरवणुकांमुळे श्री गणेशाची कृपा हिंदूंना निश्चितच संपादन करता येईल !

– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी