पुणे येथे भवानी पेठेतील श्री गणेशोत्सवामध्ये १० दिवस ‘कीर्तन महोत्सव’!
वायफळ व्यय टाळला, आध्यात्मिक संस्कारांवर भर !
पुणे – भव्य खर्चिक देखावे, विद्युत् रोषणाई, ध्वनीक्षेपक आणि लेझर दिव्यांवरील भरमसाठ व्यय बंद करून श्री गणेशोत्सवामध्ये सलग १० दिवस कीर्तन महोत्सवाचे आयोजन करत भवानी पेठेतील ‘नवकिरण तरुण मंडळा’ने अभिनव उपक्रम राबवला आहे. राज्याच्या विविध भागांतील नामवंत कीर्तनकार, महिला आणि बाल कीर्तनकार यांना या महोत्सवात आमंत्रित करण्यात आले होते. या अभिनव कीर्तन महोत्सवाला श्री गणेशभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असे मंडळांकडून सांगण्यात येत आहे.
भवानी पेठेतील रामोशी गेटजवळ ‘नवकिरण तरुण मंडळा’चे श्री गणेशोत्सवाचे हे १०८ वे वर्ष आहे. आतापर्यंत मंडळ हालते देखावे, जिवंत देखावे, विद्युत् रोषणाईची सजावट करत होते; परंतु नव्या पिढीवर आध्यात्मिक संस्कार होण्यासाठी गेल्या वर्षीपासून ‘कीर्तन महोत्सवा’चे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या १० दिवसांमध्ये काकड भजन, आरती, श्री ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, भजन, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जीवन चरित्रावर हरिपाठ, कीर्तन घेण्यात येते.
देखाव्यांवरील वायफळ व्यय टाळून तरुण पिढीला व्यसनातून मुक्त करून त्यांच्यावर आध्यात्मिक संस्कार व्हावेत, असे मंडळातील कार्यकर्त्यांना वाटले. त्यामुळे कीर्तन महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला, असे मंडळाचे अध्यक्ष सनी कदम, सचिव ओंकार कांबळे आणि उपाध्यक्ष शुभम जगदाळे यांनी सांगितले.