सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पू. दातेआजींसाठी नामजपादी उपाय करतांना पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांना शिकायला मिळालेली सूत्रे !
‘७.६.२०२४ या दिवसापासून पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (सनातनच्या ४८ व्या संत, वय ९१ वर्षे) रुग्णाईत आहेत. तेव्हापासून पू. आजींची शुद्ध हरपलेली आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार आध्यात्मिक उपाय चालू केले. त्यानंतर पू. आजींच्या स्थितीत पालट होऊ लागले. परात्पर गुरुदेवांची संकल्पशक्ती आणि नवीन उपायपद्धत यांच्या संदर्भात श्री गुरुकृपेने शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. परात्पर गुरुदेव खोलीत प्रवेश करत असतांना पू. दातेआजींच्या शरिराची हालचाल होणे
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नामजपादी उपाय करण्यासाठी पू. निर्मला दातेआजींच्या खोलीत प्रवेश करत असतांना पू. आजी शरिराची अधिक हालचाल करू लागल्या. ‘परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व आणि त्यांचे चैतन्य यांचा परिणाम आहे’, हे मला प्रत्यक्ष अनुभवता आले.
२. परात्पर गुरुदेवांच्या आध्यात्मिक उपायांमुळे पू. आजींचा जलद गतीने होणारा श्वास संथपणे चालू होणे
त्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी उपाय करायला आरंभ केला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींच्या चरणांपासून गळ्यापर्यंत काही अंतरावरून हाताचा तळवा फिरवल्यावर त्यांच्या शारीरिक संवेदनांमध्ये वाढ झाली. पू. आजींचा श्वास जलद गतीने होत होता. जेव्हा परात्पर गुरुदेवांनी पू. आजींच्या पोटाच्या काही अंतरावरून हाताचा तळवा नेला, तेव्हा पू. आजींचा जलद गतीने होणारा श्वास संथपणे चालू झाला.
३. परात्पर गुरुदेवांनी ‘आजी’, अशी हाक मारल्यावर पू. आजींनी डोळे उघडणे, त्यांच्या डोळ्यांत स्थिरता आणि शांती जाणवणे अन् ‘परात्पर गुरुदेव उपायांच्या माध्यमातून पू. आजींना जीवनदान देऊन अध्यात्माच्या एका उच्च स्थितीला नेत आहेत’, असे वाटणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘‘आजी’’, असे म्हटल्यावर पू. आजींनी डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यांमध्ये स्थिरता आणि शांती जाणवत होती. त्यांचा चेहरा पुष्कळ आनंदी दिसत होता. ‘आपण बोलत असलेले सर्व पू. आजींना कळत आहे’, असे मला वाटत होते आणि त्या तसा प्रतिसाद देण्याचा प्रयत्नही करत होत्या. जणू काही ‘आता त्या बोलणारच आहेत’, असे मला वाटत होते. पू. आजींची पाय आणि गुडघे येथील हालचाल अधिक वाढली होती. ‘त्या आता उठूनच बसणार’, असे वाटत होते. परात्पर गुरुदेवांना स्वतःला शारीरिक थकवा पुष्कळ आहे, तरी ‘त्यांनी नामजपादी उपायांच्या माध्यमातून पू. आजींना जीवनदान दिले आणि त्यांना अध्यात्माच्या एका उच्च स्थितीला (शांती) नेले आणि नेत आहेत’, असे मला जाणवले.
४. पू. दातेआजींसाठी उपाय करण्यासाठी परात्पर गुरुदेवांनी त्यांच्या कुटुंबियांना चैतन्य देणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार उपाय कसे करायचे ?’, हे पू. दातेआजींच्या कुटंबियांना शिकवले आहे. त्या पद्धतीनुसार पू. आजींचे कुटुंबीय पू. आजींसाठी उपाय करतात. त्यासाठी ‘परात्पर गुरुदेवांनी त्यांना शक्ती, ऊर्जा आणि चैतन्य दिले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचीही प्रगती होत आहे’, असे मला वाटले.
५. ‘औषधांविना पू. दातेआजींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे’, हे पाहून आध्यात्मिक उपायांमधील सामर्थ्य लक्षात येणे आणि ‘ईश्वरस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर यांच्या कृपेमुळेच सर्व होत आहे’, याची प्रचीती येणे
पू. आजींच्या नाडीचे ठोके आधी पुष्कळ वाढले होते. नंतर ते न्यून झाले. त्यांचा रक्तदाब वाढला होता. तोही सर्वसाधारण (‘नॉर्मल’) झाला. त्यांच्या श्वासाची गती पुष्कळ होती आणि त्या नाकाने श्वास घेऊ शकत नव्हत्या. त्यामुळे त्या तोंडाने श्वास घेत होत्या; पण उपायांनी त्यांच्या श्वासाची गती संथ झाली. ‘औषधांविना पू. दातेआजींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे’, हे पाहून ‘आध्यात्मिक स्तरावरील उपायांमध्ये किती सामर्थ्य आहे’, हे माझ्या लक्षात आले. या अनुभवातून ‘परात्पर गुरुदेव ईश्वर आहेत आणि ईश्वराच्या कृपेमुळेच सर्व होत आहे’, याची मला प्रचीती आली.
६. परात्पर गुरुदेव पू. आजींसाठी उपाय करत असतांना मला माझ्या शरिरावरही सूक्ष्म संवेदना जाणवत होत्या.
७. परात्पर गुरुदेवांनी ‘प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार उपाय कसे करायचे ?’, हे साधकांना शिकवण्यासाठी ईश्वराने ‘पू. आजींचा मृत्यूयोग पुढे ढकलला’, असे वाटणे
परात्पर गुरुदेव ‘प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार उपाय कसे करायचे ?’, हे साधकांना शिकवत आहेत. हे उपाय शिकवण्यासाठी ईश्वराने ‘पू. आजींचा मृत्यूयोग पुढे ढकलला आहे’, असे मला वाटले. ‘भाव’, ‘शक्ती’, ‘आनंद’, ‘चैतन्य’ आणि ‘शांती’ यांच्याही पुढच्या स्थितीला जाण्यासाठी परात्पर गुरुदेवांचा संकल्प असून त्यासाठी ‘सतत शिकत राहून प्रयत्न वाढवायला हवेत’, असे माझ्या लक्षात आले.
८. आपत्काळात प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार केलेल्या उपायांचा अधिक लाभ होणार असल्याने ‘परात्पर गुरुदेव ही प्रत्यक्ष शिकवत आहेत’, असे लक्षात येणे
आम्ही पू. आजींशी बोलत असतांना ‘त्या बोलण्याला प्रतिसाद देत आहेत’, असे मला वाटत होते. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मला ही नवीन उपायपद्धत शिकता आली आणि मला त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘आपत्काळात प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार केलेल्या उपायांचा अधिक लाभ होणार आहे’, असे मला वाटले. ‘शरिराच्या पोट, पाय, डोके, छाती इत्यादी कोणत्या भागावर दाब, त्रास किंवा अडथळा जाणवतो ?’ ‘नामजप किंवा अंक आणि बीजाक्षरे यांचा जप देवाला विचारून कसा करायचा ?’, याविषयी परात्पर गुरुदेवांनी आम्हाला प्रत्यक्ष शिकवले. परात्पर गुरुदेवांची शारीरिक स्थिती नसतांनाही ‘प्रत्येक जिवाने शिकावे’, यांसाठी ते किती प्रयत्न करतात’, हे त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून शिकता आले.
प्रार्थना : ‘हे गुरुदेवा, आम्हाला ही उपायपद्धत शिकवून आमच्याकडून अशी कृती करून घ्या, आम्हाला पू. आजींप्रमाणे शांतीच्या स्थितीला घेऊन जा, तसेच शेवटच्या श्वासापर्यंत आपली चरणसेवा घडू द्या’, हीच आपल्या चरणी अनन्य शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (सनातनच्या ११९ व्या संत, वय ६० वर्षे), फोंडा, गोवा. (१५.८.२०२४)
|