गोंयची चवथ ! (गोव्यातील श्री गणेशचतुर्थी)
‘चवथ’, म्हणजे कोकणातील श्री गणेशचतुर्थी ! गोवा मुक्तीपूर्वीच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवाची पद्धत गोव्यात नव्हती. मुक्तीनंतरच्या काळात प्रामुख्याने शहरात आणि गेल्या ५० वर्षांत ग्रामीण भागातही सार्वजनिक गणेशोत्सवाची पद्धत चालू झाली आहे. वैयक्तिक पातळीवर गोव्यातील श्री गणेशचतुर्थीचे स्वरूप कोकणातील इतर ठिकाणच्या श्री गणेशचतुर्थीप्रमाणेच आहे. गौरी-गणपतीसाठी मुलांमध्ये सजावट आणि ‘फोग’ (फटाके) यांची स्पर्धा चालू होते. ऋषीपंचमीच्या दिवशी कंदमुळे आणि वडे यांचा खास नैवेद्य गणपतीसाठी असतो. चतुर्थीच्या दिवशी उकडीचे मोदक आणि हळदीच्या पानांत उकडलेल्या पातोळ्या यांचा नैवेद्य बर्याच ठिकाणी असतो. गणपतीपूजन खास मढवलेल्या मखरात, म्हणजे लाकडाच्या घुमटीत करतात. गणपतीसमोर बांधलेल्या माटोळीत आंब्याचे टाळे आणि अनेक प्रकारची फळे-फुले असतात. या भागातील उत्सवाचे खरे वैशिष्ट्य, म्हणजे खास घुमट वाद्यावर वाजवल्या जाणार्या आरत्या ! घुमट म्हणजे मातीच्या मडक्याच्या आकाराच्या भांड्यावर एका बाजूला घोरपडीचे कातडे चढवून सिद्ध केलेले वाद्य ! त्याला समवेत ‘शामेळ’ हे ताशासारखे २ छोट्या बांबूच्या काठ्या घेऊन वाजवायचे वाद्य असते. नेहमीच्याच आरत्या; पण वेगळ्या चालीने या वाद्यांच्या साथीने म्हणायची चढाओढ वेगवेगळ्या गटांत लागते. आरत्या बहुधा बसून केल्या जातात; कारण या वाद्यांवर म्हटल्या जाणार्या आरत्यांचा वेळ दीड ते २ घंटे असतो.
पोर्तुगिजांच्या काळातील जुन्या काबीजादीतील (पणजी, म्हापसा आणि मडगाव येथील) काही थोड्या घरांतून मातीच्या मूर्तीऐवजी कागदावर चितारलेल्या गणपतीची पूजा करण्याची प्रथा आहे. धर्मच्छळाच्या वेळी जे लोक त्यांची घरेदारे न सोडता त्याच परिसरात राहिले, त्यांच्यावर तत्कालीन पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी लादलेल्या बंधनात या प्रथेचे मूळ सापडते. आता या प्रथेला केवळ ऐतिहासिक महत्त्व राहिले आहे.
१. फर्मागुढी येथील गोपाळ गणपति मंदिरातील गणेशोत्सव !
फर्मागुढी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गणपतीचे लहानसे मंदिर आहे. या गणपतीला गोपाळ गणपति म्हणतात. ‘राखणे’ म्हणजे पूर्वी गुराख्यांचा गणपति असल्यामुळे त्याला ‘गोपाळ गणपति’, असे संबोधित असावे. या मंदिराचा जीर्णोद्धार गोव्याचे पहिले मुख्यमंत्री कै. भाऊसाहेब बांदोडकर यांनी केला. या मंदिरात सार्वजनिक गणपतीचे पूजन होते. अर्थात् पूजन आत मंदिरात होत असल्यामुळे मूर्ती प्रमाणबद्ध असते. गोव्यात सार्वजनिक उत्सवातील गणपतीची मूर्ती क्वचितच अवाढव्य आणि विराट असते. इतर गणेशोत्सव मंडळांप्रमाणे येथे उर्वरित ८ दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. अकराव्या दिवशी गणपति विसर्जनाचे स्वरूप मात्र पहाण्यासारखे असते.
२. गणपति विसर्जनाचे स्वरूप !
सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गणपतीची उत्तरपूजा होते. पूजेच्या वेळी घुमट आणि शामेळ वाद्यांच्या आधारे आरत्या मोठ्या आवाजात होतात. त्यानंतर भाविकांनी देवाला अर्पण केलेली फळे आणि भाज्या (भेंडी, दोडकी, पडवळ, नारळ, सुपारी) आदींची पावणी, म्हणजे लिलाव होतो. निधी जमवण्याचा हा एक चांगला प्रकार गोव्यात इतर प्रसंगीही आढळतो. उत्तरपूजेनंतर गणपतीची मूर्ती देवळाच्या चौकात ठेवली जाते. मग भाविक गणपतीला लाह्या आणि दूध अर्पण करतात. फटाके आणि इतर दारूकामाची आतषबाजी सौम्य प्रमाणात चालू असते. त्यात कुठचाही अतिरेक नसतो. त्यानंतर गणपतीची लालखीसदृश (लालखी ही पालखीसारखीच असते.) मिरवणूक चालू होते. गणपतीला खास गोंड्यांच्या माळांनी सजवलेल्या मखरात बसवले जाते. ढोल, ताशा आणि झांज एवढीच वाद्ये सोबतीला असतात.
गणपति विसर्जन अनुमाने ३ किलोमीटर दूर असलेल्या सुप्रसिद्ध नागेश देवालयाच्या तळ्यात होते. ३ किलोमीटर अंतर श्रींची मूर्ती खांद्यावर घेऊन मिरवणुकीने पायी चालत जातात. सोबत ना असतो कर्णकर्कश ध्वनीक्षेपक, ना विद्युत् रोषणाई ! सर्वत्र अंधार असल्यामुळे उजेडासाठी ५-६ ‘पेट्रोमॅक्स’ दिवे आणि शास्त्र म्हणून पेटवलेला पलिता ! वाटेत ठिकठिकाणी थांबून आजूबाजूच्या घरांतून देवासाठी पंचारत आणि कापूर दाखवला जातो. आजूबाजूंच्या लोकांमध्ये
आगुस्तीन या ख्रिस्ती बांधवांकडून देवाला कर्पुरारती भक्तीभावाने अर्पण केली जाते. गणपतीचे भक्तगणही मोठ्या उत्साहाने ते काम करतात. फर्मागुढीत नागेशीचा रस्ता उतरणीचा असल्यामुळे लालखी सांभाळणे तसे कठीणच काम ! परंतु ‘भोयांची’ अदलाबदल करत मोठ्या उत्साहाने श्रींची मिरवणूक श्री सौंदेकर (पूर्वीचे राजे) यांच्या वाड्यासमोर येते. येथे फटाक्यांच्या आतषबाजीला उधाण येते.
३. नागेशीच्या तळीत मूर्तीविसर्जन !
नागेश महारुद्र म्हणजे शंकर ! त्याच्या देवळासमोर उभे राहून कर्पुरारती होते. नागेशाची तळी इतर देवालयाच्या तुलनेत मोठी ! गणेशमूर्ती विसर्जनापूर्वी तळीच्या चौफेर लोक जमलेले असतात. श्रींची मिरवणूक नागेश देवालयांसमोरून तळीत उतरून काठाकाठाने तळी पार करत दुसर्या बाजूला नगारखान्याच्या खाली नेतात. पुन्हा एकदा आरत्या होतात. १-२ उत्साही मंडळी श्रींची मूर्ती डोक्यावर घेऊन तळीत मध्यभागी येतात. ‘गणपति बाप्पा मोरया’, असा गजर चारही बाजूंनी होतो आणि पहाता पहाता गणपतीची मूर्ती पाण्यात खाली जाते. असे हे एकंदर गणपति विसर्जनाचे स्वरूप ! (शहरी भागातील गणपतीचे स्वरूप पुण्या-मुंबईतील गणपतीचे अनुकरण वाटावे, असेच असते.) विसर्जन झाले, तरी मनातील गणपतीची मूर्ती डोळ्यांपुढून हालत नाही आणि १० दिवसांचा उत्सव काही केल्या स्मरणातून जात नाही. अगदी पुढच्या गणशोत्सवापर्यंत !
– श्री. मधुसूदन जोशी, मेरशी, गोवा.