उमांग मळज आणि सद्यःस्थिती !
हिंदु धर्मामध्ये असंख्य व्रते, सण आणि उत्सव सांगितले आहेत. त्यातील भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एक मोठा उत्सव हिंदु मोठ्या प्रमाणात साजरा करतात. ‘हिंदु’ हा ‘रिलीजन’ नसून एक धर्म आहे. धर्म म्हणजे व्यवस्थित, सुसंस्कृत वैज्ञानिक पद्धतीवर जीवनक्रमण करण्याची पद्धत ! भगवान श्रीकृष्णाच्या आधीही हा धर्म होता आणि नंतरही गेली काही सहस्रो वर्षे अबाधितपणे चालू आहे. सनातन हिंदु धर्मामध्ये ३३ कोटी देवता सांगितल्या जातात. कुणीही कोणत्याही देवतांची उपासना करावी; पण श्रद्धेने करावी. श्रीमद्भगवद्गीतेतील १२ व्या अध्यायात श्लोक क्र. २ मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
‘श्रीभगवानुवाच – मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धा परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ।।
अर्थ : भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन, ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुणरूप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यांमधील अतीउत्तम योगी वाटतात.
१. उमापुत्र म्हणजे शिवशक्तीची लीला !
भगवंताच्या प्राप्तीसाठी सातत्य आणि श्रद्धा ही फार महत्त्वाची ! आद्यशकंराचार्यांनी ‘पंचायतन पद्धत’ रूढ करून दिली. त्यात ५ देव म्हणजे सूर्य, विष्णु, देवी, शंकर आणि गणपति. गणपति हे निराकार ब्रह्म आहे. नादब्रह्म ॐ नंतर अक्षरब्रह्म आणि साकार स्वरूप. आपण जो आता विचार करत आहोत तो शिवपार्वती पुत्र गजाननाचा ! जेव्हा आपण गाणपत्य संप्रदायाचा विचार करतो, तेव्हा ही भगवान गणेश प्रभूंची लिहिला आहे; पण जेव्हा सामान्य माणूस विचार करतो, तेव्हा उमापुत्र म्हणजे शिवशक्तीची लीला आहे, हे जाणवते.
२. श्री गणेशाविषयीची प्रचलित कथा
‘गणेश जयंती’विषयीची एक प्रचलित कथा आपल्याला नेहमी ऐकायला मिळते. ती अशी की, पार्वतीला स्नानाची इच्छा झाली; म्हणून तिने नंदीला आज्ञा केली की, ‘मी स्नानास बसत आहे. तू अंतरगृहात कुणालाही सोडू नकोस’; पण तेवढ्यात भगवान शंकर तिथे येतात, मग शिवशंकरांना का अडवायचे; म्हणून त्यांना प्रवेश मिळतो. परिणामी पार्वतीला राग येतो आणि ती आपल्या सखीशी चर्चा करते. त्यावर असे ठरते, ‘नंदी हा शिवगण आहे. त्या कारणाने तो आपले काही ऐकणार नाही. त्यामुळे आपल्यालाच काहीतरी करायला हवे.’ म्हणून पार्वती स्वतःचा गण निर्माण करण्याचा विचार करते. पुन्हा पार्वती देह शुद्धीस बसते आणि अंगाचा मळ काढून एक पुतळा सिद्ध करते. त्यात ती प्राण फुंकते आणि त्याला द्वार रक्षणास बसवते (गाणपत्य संप्रदायाप्रमाणे ही कथा कार्तिक शुद्ध चतुर्थीची आहे; पण ती आता भाद्रपद आणि माघी चतुर्थीलाही जोडली गेली आहे.) त्याला सांगते, ‘कुणीही आले तरी माझ्या आज्ञेविना आत सोडू नकोस.’ पुन्हा भगवान शंकराचे आगमन होते आणि त्यांना हा बालक अडवतो. ‘माझ्याच गृहात मला अडवणारा तू कोण ?’, असे म्हणून त्या दोघांमध्ये मग युद्ध चालू होते. सूर्यदेव तर साक्षीला होतेच; पण भगवान विष्णूंना पाचारण केले जाते. भगवान विष्णुही या युद्धात सहभागी होतात. दोन्ही पक्ष तुल्यबळाने शक्तीचे असतात; पण त्या बालकाचे विष्णूशी युद्ध चालू असतांना भगवान शिव बाळाच्या डोळा चुकवून पाठीमागून स्वतःकडील त्रिशूळ फेकून मारतात. त्याबरोबर बालकाचे डोके देहापासून वेगळे होऊन त्रिभुवनात दिसेनासे होते.
हा सर्व वृत्तांत एका सखीच्या माध्यमातून पार्वतीला कळतो. त्या वेळी ती क्रोधित होते आणि आपल्या देहातून अनेक मातृका योगिनी सिद्ध करते अन् शिव, विष्णु यांच्या गणांवर चाल करते. या वेळी नारदमुनी मध्यस्थी करतात आणि शेवटी भगवान शिव विष्णूला सांगतात, ‘उत्तरेला तोंड करून झोपलेल्या पहिल्या प्राण्याचे मस्तक घेऊन या.’ भगवान विष्णूंना एक हत्ती या स्थितीत दिसतो. ते त्याचे मस्तक घेऊन येतात आणि ते मस्तक त्या बालकाच्या धडास जोडले जाते अन् तो बालक जिवंत होतो.
येथे आपल्या बुद्धीला ताण देऊन थोडा विचार करूया. अनेक प्रश्न उपस्थित होतात. भगवान शंकराचे आपल्या पुत्रांस न ओळखणे, त्यांचे त्या बालकाशी युद्ध, भगवान विष्णूंना पाचारण केले जाणे, त्या बालकाचा शिरच्छेद केल्यानंतर ते शीर कुठे गेले कुणास ठाऊक नाही ? बर्फाच्छादित हिमालयात घनदाट जंगल कसे ? असे अनेक प्रश्न उभे रहातात. एखाद्या गावातील बायका जमल्यावर त्यांच्या अंगाचा घासून सर्व मळ काढला आणि तो एकत्र केला, तरी पुतळा बनू शकत नाही, हे त्रिवार सत्य. मग पार्वती जर त्रिपुरसंदरी आहे, तर मग तिच्या अंगाला एवढा मळ ? ती प्रतिदिन अंघोळ करत नव्हती का ? एवढी अमंगल रहायची का ? तर या सर्वांचे उत्तर ‘नाही’, असेच आहे.
३. गणेशजन्म कथेचा बौद्धीकदृष्ट्या घ्यावयाचा अर्थ
गणपतीला वाहिलेल्या ‘मुद्गल पुराणा’त एक श्लोक आढळतो, ‘अगजाननं पद्मार्कं गजाननं अहर्निशम् । अनेकदंतं भक्तानां एकदन्तं उपास्महे ।।’ या श्लोकाचा साधा अर्थ ‘कमलमुखी देवी पार्वतीची किरणे जशी आपल्या मुलाच्या चेहर्यावर असतात, त्याचप्रमाणे भगवान गजाननाची कृपा त्यांच्या भक्तांवर सदैव असते, जे एकदंताची पूजा करतात त्यांच्या अनेक प्रार्थना करतात.’
लहान वयात ही गोष्ट म्हणून ठीक आहे; पण जेव्हा ‘गणेश पुराण’, ‘गणेश विजय’ ‘मुद्गल पुराण’ वाचतो, तेव्हा आपण या ब्रह्मतत्त्वज्ञानाचा विचार बौद्धीकदृष्ट्या घ्यावयास हवा.
‘उमादेवी ही अखंड ब्रह्मांडाला मोहून टाकणारी शक्ती आहे’, हे विज्ञानाने सिद्ध झालेले आहे. जिथे हे विज्ञान थांबते, तेथे अध्यात्म चालू होते. आपण चर्मचक्षूंनी विज्ञानाने बाह्य जग पाहू शकतो; पण बुद्धीने, ज्ञान अंतर्चक्षूंनी पहायची गोष्ट आहे; म्हणून त्याच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. बुद्धीची शुद्धी, बुद्धीचे जडत्व वा मंदत्व वा अज्ञान दूर करणे, पारदर्शकता वा शुभ्रता, स्वच्छता प्राप्त करण्यासाठीच स्नानाची आवश्यकता भासते. म्हणूनच
श्री सरस्वतीदेवीचा ध्यान श्लोक बरेच काही सांगतो.
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ।।
अर्थ : जी कुंदाचे फूल, चंद्र, हिमतुषार किंवा मोत्यांचा हार यांप्रमाणे गौरवर्णी आहे; जिने शुभ्रवस्त्र धारण केले आहे; जिचे हात उत्तम वीणेमुळे शोभत आहेत; जी शुभ्र कमळांच्या आसनावर विराजमान झालेली आहे; ब्रह्मा, विष्णु, महेश इत्यादी देवता जिची निरंतर स्तुती करतात; जी सर्व प्रकारची जडता (अज्ञान) दूर करते, अशी ती भगवती, श्री सरस्वतीदेवी माझे रक्षण करो.
उमीदेवीच्या अंगाचा मळ आणि स्नान, म्हणजे चंदन, उटणे, तेल, असे काहीच नाही, तर ‘मी’त्व, ‘मी’ बरोबर येणारा अहंकार, लोभ, मोह, असे सर्वरिपू काढणे आणि त्याचा गण सिद्ध करणे. या अवगुणांमध्ये प्राण फुंकले की, तो वाढतो. या अवगुण आणि गुण यांतून निर्माण झाला, तो तिचा गण, तिच्या मनासारखा चालणारा तो गण, म्हणजेच गणपति, तोच विघ्नहर्ता झाला. तो अनेकांना त्रास देऊ लागला. तेथे ध्यानस्थ होऊन शिवाने त्याच्या डोक्यात भरलेली हवा त्रिशूळाने काढली आणि शिरच्छेद केला. बुद्धीमान हत्तीचे मस्तक बसवले. सर्व देवांनी त्यास भेटवस्तू दिल्या, कुणी गुण दिले, कुणी दुर्वा वाहिल्या आणि नंतर त्याला विघ्नहर्ता पद प्राप्त झाले. ही गोष्ट आपल्या सर्वांना लागू होते. आपल्यातील अवगुण काढावेत आणि त्याचे विसर्जन करावे.
४. गणेश उत्सवातून काय शिकावे ?
गणेश अवताराचे हे व्रत आता महोत्सव झाला आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. लाखो लोकांना काम मिळते. मी आता चित्रकार म्हणून विचार मांडत नसून एक गणेशभक्त आणि एक जन्मतः हिंदू म्हणून हा लेखप्रपंच केला. प्रत्येक उत्पादनावर अगदी खाण्याच्या पदार्थांपासून औषधांपर्यंत सगळ्यांवर उत्पादन केल्याची अन् ते कालबाह्य होण्याचा दिनांक (एक्सपायरी डेट) असते, तसेच कोणताही जीव जन्मास आला की, त्याचा मृत्यू अटळ आहे. फरक केवळ एवढाच की, जन्मदिनांक ठाऊक असते; पण मृत्यूची नाही. गणपति उत्सवातून आपण काय शिकतो, तर या जन्मात निर्माण होणारे ‘मी’पण आणि षडरिपू काढावेत. आपली कर्मे संपवून सद्सद्विवेकबुद्धी जागृत करायची आहे अन् मोक्ष प्राप्त करायचा आहे.
५. देवतांची आयुधरूपांसह पूजा करतांना हिंदूंनी स्वसंरक्षणाची सिद्धता करणे महत्त्वाचे !
८४ लक्ष योनीतून प्रवास करून हा मानव जन्म प्राप्त झाला आहे. त्याचा सद्उपयोग करून नित्यकर्मे करायची आहेत. फळाची वाट पहायची नाही. आपली सर्व दैवते आयुधधारी आहेत. देवी ४, ६, ८ हातांनी आयुधे उचलते. भगवान शंकर तर ध्यानस्थ दाखवले जातात; पण वेळप्रसंगी ते तिसरा डोळा उघडतात. गणपति बाप्पाचे रूप किती गोंडस आहे. त्याला सर्व पूजेत सर्वांत आधी पूजण्याचा असा मान आहे. तो १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती आहे. तो ही आयुधधारी आहे. गणपति अथर्वशीर्ष ‘एकदन्तञ् चतुर्हस्तम् पाशमङ्कुशधारिणम्’… असे ध्यान केले आहे, म्हणजे आयुधे ही मूळ शोभेची वस्तू नाहीच. हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आणि तत्कालीन महान राष्ट्रसंत समर्थ रामदासस्वामी यांना घडलेल्या गणपती दर्शनावरून ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची…’ही आरती लिहिली की, जी आज कोट्यवधी घरांतून म्हटली जाते. तेही हेच सांगतात, ‘बुळबुळीत धोरण काही कामाचे नाही. ठकास व्हावे असावे ठक उद्धटसी उद्धट ।’ आपण देवतांना आवाहन करतांना आयुधांसहित करतो. कर्ममार्गानुसार ईश्वरी अधिष्ठानाचा मोठा मार्ग अर्जुनाला दाखवतांना भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूः मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ४७
अर्थ : भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ‘‘हे अर्जुना, तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्यांच्या फळाविषयी कधीही नाही. म्हणून तू कर्मांच्या फळांची इच्छा करू नकोस; तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस.
यानुसार जशी आपली आंतरिक आध्यात्मिक सिद्धता चालू आहे, तशीच या देहाची परिस्थितीच्या अनुषंगाने स्वसंरक्षणाची सिद्धता करायला हवी आणि म्हणूनच लाठीकाठीसह नेमबाजीसारखे मैदानी खेळही शिकायला हवेत.
आपण यातून बरेच काही शिकून त्या विघ्नहर्तास प्रार्थना करूया, ‘हे श्री शिवसुता संकट नाशी ।’, अशा मंगलमूर्तीची आमच्यावर कृपा असू द्या आणि आमच्यावर येणार्या संकटांना सामोरे जाण्यासाठी हे श्री गणेशा, विद्या, शक्ती, बुद्धी अन् सिद्धी दे.’
– श्री. दत्ताराम बाळकृष्ण काणेकर, विरार, जिल्हा पालघर. (११.९.२०२४)