छत्रपती संभाजीनगर येथे सव्वा ३ लाख ग्राहकांची वीज कायमस्वरूपी तोडली !
पुन्हा जोडणी घेण्यासाठी घेता येणार ‘अभय योजने’चा लाभ !
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर आणि जालना या २ जिल्ह्यांतील एकूण सव्वातीन लाख घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक आदी वीज ग्राहकांनी वीजदेयक भरलेले नाही. यामुळे त्यांची वीज कायमस्वरूपी तोडण्यात आली आहे. राज्यातही अशाच प्रकारे कारवाई करण्यात आली आहे. हे ग्राहक विजेपासून वंचित राहू नये, यासाठी सरकारने ‘अभय योजना २०२४’ लागू केली आहे. थकबाकीदार ग्राहकांनी मूळ ५७१ कोटी ६३ लाख रुपयांचा भरणा केला, तर त्यांचे १७५ कोटी २३ लाख व्याज आणि ७ कोटी २३ लाख रुपये विलंब शुल्काची रक्कम माफ होईल.
३१ मार्च २०२४ पर्यंत थकित बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या महावितरणच्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. थकित बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही. योजनेचा कालावधी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ आहे. ३१ मार्च २०२४ पूर्वी थकबाकीमुळे कायमस्वरूपी खंडित झालेले छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील ३ लाख २३ सहस्र ५५५ ग्राहक या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. या ग्राहकांकडून महावितरणला मूळ देयकांची ५७१ कोटी ६३ लाख रुपयांची रक्कम, तसेच १७५ कोटी २३ लाख रुपये व्याज आणि ७ कोटी २३ लाख रुपये विलंब आकार येणे आहे. मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरूपातील दंड माफ करण्यात येईल.