कोरोना महामारी आणि त्यानंतरच्या कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन संस्थेच्या धर्मकार्याने विहंगम गतीने घेतलेली गरुडझेप !
कोरोना महामारीचा आपत्काळ आणि त्यानंतरचा काळ, म्हणजे सनातन संस्थेच्या ईश्वरी कार्यासाठीचा समृद्धीचा काळ !‘कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या दळणवळण बंदीने लोकांचे जीवनमान पालटले आणि प्रत्यक्ष कामाची पद्धत ‘ऑनलाईन’ झाली होती. आजही ती पद्धत ‘वर्क फ्रॉम होम (घरी राहून काम करणे)’, अशी झाली आहे. प्रत्यक्ष कराव्या लागणार्या गोष्टी आता ‘ऑनलाईन’ सहजतेने होत आहेत. या दळणवळण बंदीमुळे व्यवहारातील अनेक गोष्टी ‘ऑनलाईन’ झाल्या, तसेच सनातनचेही अनेक उपक्रम ‘ऑनलाईन’ चालू झाले होते. त्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोक या उपक्रमात जोडले गेले. या माध्यमातून मार्गदर्शन मिळवून ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि विज्ञापनदाते, तसेच सनातनचे हितचिंतक साधना करू लागले. एकंदरीतच कोरोनाचा किंवा त्यानंतरचा काळ साधकांच्या साधनेसाठी, तसेच सनातनच्या कार्यवृद्धीसाठी पर्वणीच ठरला आहे. कोरोनाची आपत्ती आली, तेव्हा सनातनचे सर्व कार्य ‘ऑनलाईन’ चालू होते. वर्ष २०२२ मध्ये महाशिवरात्रीपासून सनातनच्या साधकांनी कार्य पुन्हा प्रत्यक्षात रूपांतरित करण्याचे प्रयत्न केले आणि साधनावृद्धीचे ध्येय घेतले. वर्ष २०२३ मध्ये नवसाधक-निर्मितीचे ध्येय ठेवून उपक्रम राबवण्यात आले. याचा सुपरिणाम होऊन वर्षभरात सहस्रो नवीन साधक साधनेला प्रवृत्त झाले; म्हणूनच वर्ष २०२४ मध्ये नवीन साधकांच्या क्षमतांना न्याय देऊन सनातनच्या कार्याची घडी बसवण्यासाठी संघटनात्मक बांधणीचे नियोजन करण्यात आले आहे. ‘वर्ष २०२०, म्हणजे कोरोनाच्या आपत्तीपासून वर्ष २०२४ मधील गुरुपौर्णिमेपर्यंत सनातनच्या कार्याने घेतलेली गरुडझेप’, ही केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा आहे. ‘सनातनच्या धर्मकार्याची वृद्धी कशी झाली ?’, याची माहिती लेखातून जाणून घेऊया. |
१. कोरोनाच्या काळात साधकांना व्यष्टी साधनेची घडी बसवता येणे आणि व्यष्टी साधना चांगली झाल्यामुळे सतत वाढत असलेल्या गुरुकार्याचे दायित्व घेणे साधकांना सुलभ होणे
कोरोना महामारीची आपत्ती ही साधकांच्या व्यष्टी साधनेची घडी बसवण्याच्या दृष्टीने इष्टापत्ती ठरली. समष्टी साधना करणार्या अनेक साधकांना व्यष्टी अन् समष्टी साधना यांची सांगड घालता येत नव्हती. कोरोना काळात दळणवळण बंदी लागू झाल्याने समष्टी सेवा, तसेच कार्यालयीन कामकाज यांसाठी प्रथम ३ मास बाहेर पडायचे नसल्याने सर्व साधक घरीच होते. या काळात सनातनच्या सर्व धर्मप्रचारक संतांनी घरी असलेल्या प्रत्येक साधकाचे आढावे प्रतिदिन होतील आणि त्यांच्या साधनेची घडी बसेल, अशी व्यवस्था निर्माण केली. परिणामी साधकांना शांतपणे व्यष्टी साधनेची घडी बसवण्याची संधी मिळाली. ‘प्रासंगिक सेवा करणार्या साधकांपासून क्रियाशील साधकांपर्यंत सर्वांना ‘अंतर्मुख होणे आणि आध्यात्मिक बळ वाढवणे, तसेच अनुसंधानात रहाणे’, यांसाठी वेळ मिळाला. अनेक साधकांना याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. या काळात साधनेचा आढावा देण्याचा संस्कारही साधकांच्या मनावर बिंबला. वेळ पुष्कळ असल्याने साधनेचा आढावा दिल्याने आणि त्यात सातत्य राहिल्याने आजही साधकांना त्याचा लाभ होत आहे. त्यानंतर अनेक साधकांची आध्यात्मिक उन्नती झाली. व्यष्टी साधनेची घडी बसल्याने आता सतत वाढत असलेल्या गुरुकार्याचे दायित्व घेणे साधकांना सुलभ झाले आहे.
२. राष्ट्रीय स्तरावर प्रतिदिन ‘ऑनलाईन’ चालू झालेले सत्संग
कोरोना महामारीपूर्वी केलेल्या धर्मप्रसारातून अनेक जिज्ञासू सनातनशी जोडले गेले होते. अकस्मात् कोरोना महामारी आल्याने ‘त्यांना पुढचे मार्गदर्शन मिळावे’, या हेतूने सनातन संस्थेने राष्ट्रीय स्तरावरच नामसत्संग, भाववृद्धी सत्संग आणि लहान मुलांसाठी बालसंस्कारवर्ग चालू केले. ऑनलाईन सत्संगांमुळे कोरोनापूर्वी जे लोक जोडले होते, त्यांना या सत्संगांच्या माध्यमातून जोडून ठेवणे सोपे झाले. हे सर्व सत्संग ‘यू ट्यूब’वर असल्याने लोक उपलब्ध वेळेनुसार ते पाहू शकत होते. या सत्संगांचा परिणाम, म्हणजे जिज्ञासू साधक बनले आणि अध्यात्माचा जगभर प्रसार झाला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या ऑनलाईन सत्संगांच्या माध्यमातून अध्यात्माचा प्रसार करावा लागला नाही, तर तो आपोआप आणि सहजतेने झाला.
२ अ. भाववृद्धी सत्संग : ज्या काळात आजूबाजूचे वातावरण ताणतणावाचे आणि काळजीचे होते, त्या वेळी केवळ साधकांनाच नव्हे, तर समाजातील अनेकांना देवाने या भाववृद्धी सत्संगांच्या माध्यमातून अखंड चैतन्यातच ठेवले होते. ‘साधक आनंदी फूल बनून ईश्वरचरणी लीन कसे होतील ?’, यासाठी हा चैतन्याचा झराच होता. ‘भावासहित सेवा कशी करावी ? शरणागतभावाने प्रार्थना, कृतज्ञता, ईश्वराची मानसपूजा, आत्मनिवेदन केले असेल आणि भोळा भाव असेल, तर देवाची कृपा होते’, हे अनुभवता आले. त्यामुळे साधकांनी गतीने प्रयत्न चालू केल्यावर त्यांची कृतीशीलताही वाढली.
२ आ. नामसत्संग : नामसत्संगाने सर्वांत मोठे केलेले कार्य, म्हणजे या सत्संगाने लोकांना ‘संकटाच्या वेळी नामजप कसा करावा ?’, हे शिकवले. त्यामुळे समाजाला आध्यात्मिक आधार मिळाला. अनेकांच्या मनात नामजपाची गोडी निर्माण होऊन त्यांना व्यावहारिक आणि कौटुंबिक अडचणींवर मात करता आली अन् दुःखद प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी बळ मिळाले. या नामसत्संगातून जोडलेल्या शेकडो जिज्ञासूंचे जीवन आज आनंदी झाले आहे. अनेक जण सक्रीय साधक बनून गुरुसेवा करत आहेत.
२ इ. ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग : कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे शाळेत जाता येत नसल्यामुळे मुले घरीच होती. ऑनलाईन बालसंस्कारवर्गांच्या माध्यमातून सनातनशी जोडलेल्या कुटुंबियांना मुलांवर सुसंस्कार करायची संधी उपलब्ध झाली. समाजातील काही पालकांनी या संधीचा पुरेपूर लाभ करून घेत त्यांच्या मुलांना बालसंस्कारवर्गाशी जोडले. त्यामुळे याचा मुलांना पुष्कळ लाभ झाला. काही मुलांचे ‘उद्धट बोलणे आणि वडीलधार्यांना उलट उत्तरे देणे’, हे स्वभावदोष न्यून झाले. ‘काही मुले आपल्या वस्तू व्यवस्थित ठेवू लागली, तर काही मुलांना स्वतःकडून चूक झाल्यावर त्याची जाणीव होऊन ती क्षमा मागू लागली. काहींची मुले मुद्रा करून श्री गणेशाचा नामजप करू लागली. काही पालकांनी सांगितले, ‘‘या काळात काय करावे ?’, हे आम्हाला सुचत नव्हते; परंतु हा वर्ग आमच्यासाठी वरदान ठरला. या बालसंस्कारवर्गामुळे आमच्या मुलांमध्ये पुष्कळ पालट झाला.’ या बालसंस्कार वर्गामुळे त्यांच्या पालकांचाही सहभाग वाढून ते नंतर सनातनच्या नियमित सत्संगाला येऊ लागले.
३. प्रत्येक जिल्ह्यात चालू झालेले ‘ऑनलाईन साधना सत्संग’
३ अ. दळणवळण बंदीच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ‘ऑनलाईन’ सत्संग चालू होणे : दळणवळण बंदी या कालावधीत सर्व व्यवहार अन् दैनंदिन जीवन ठप्प झाले होते. लोक घाबरले होते. त्यांना मानसिक आधाराची आवश्यकता होती. राष्ट्रीय स्तरावर ‘यू टयूब’च्या माध्यमातून होणारे सत्संग हे हिंदी भाषेत असल्याने आणि संवादाची सुविधा नसल्याने काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक साधकांनी स्थानिक भाषेत ‘ऑनलाईन’ सत्संग चालू केले. पश्चिम महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांत सर्वप्रथम हा उपक्रम राबवण्यात आला. या जिल्ह्यांत या उपक्रमाला मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहून अन्यत्रही वाचक, विज्ञापनदाते आणि हितचिंतक यांच्यासाठी असे ‘ऑनलाईन’ सत्संग चालू करण्यात आले.
३ आ. ‘कुटुंब सत्संगा’ची संकल्पना राबवल्यावर साधनेचे महत्त्व साधकांच्या नातेवाइकांच्याही लक्षात येणे : जिल्ह्याजिल्ह्यात ‘ऑनलाईन’ सत्संगाचा होत असलेला लाभ लक्षात घेऊन पश्चिम महाराष्ट्रात सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘कुटुंब सत्संगा’ची संकल्पना राबवली. साधकांनी स्वतःच्या दूर दूर रहाणार्या; पण साधनेची आवड असलेल्या नातेवाइकांसाठी सत्संग चालू केले. त्यामुळे साधनेचे महत्त्व साधकांच्या नातेवाइकांच्या लक्षात येऊन अनेकांनी साधनेला आरंभ केला. या सत्संगांमुळे अनेकांचे सनातनविषयीचे अपसमज दूर झाले. ‘ऑनलाईन’ सत्संग असल्याने भारतभरात कुठेही असलेल्या नातेवाईकाला जोडता येत होते. आता प्रत्यक्ष कार्य चालू झाल्यावर त्यांना त्यांच्या भागातील कार्यात जोडून दिले आहे. तेही आता व्यापक स्तरावर कार्य करत आहेत. ‘हे केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संकल्पाने होऊ शकते’, हे अनुभवता आले.
४. श्रेणीनिहाय साधना सत्संग
४ अ. ऑक्टोबर २०२० पासून चालू झालेली ही सत्संग मालिका म्हणजे साधक-निर्मितीचा मुख्य स्रोत ! : ‘काही जिल्ह्यांत चालू झालेले ‘ऑनलाईन’ सत्संग आणि ‘कुटुंब सत्संग’ यांना विशेष प्रतिसाद मिळत असल्याने हा उपक्रम राष्ट्रीय पातळीवर अन् सर्व भाषांत आणि सर्व जिल्ह्यांत राबवायला हवा’, असे ठरले. त्यासाठी ‘या सत्संगात शिकवल्या जाणार्या विषयांचे सामायिकीकरण करणे, तसेच साधक घडवण्याच्या प्रक्रियेचा सर्वांना सुलभ असा अभ्यासक्रम निश्चित करणे’, यासाठी संस्था स्तरावर नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात आले. शीघ्र आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने ‘पातळीनुसार साधना’ हा सिद्धांत असल्याने सत्संगात येणार्या साधकांच्या श्रेणीनुसार (त्यांनी शिकून कृतीत आणलेल्या विषयांनुसार) सत्संगांचा अभ्यासक्रम सिद्ध करण्यात आला. ऑक्टोबर २०२० पासून चालू झालेली ही सत्संग मालिका साधक-निर्मितीचा मुख्य स्रोत बनली.
पुढील सारणीवरून ४.८.२०२४ पर्यंत चालू असलेल्या श्रेणीनिहाय सत्संगांची कल्पना येईल.
टीप : या व्यतिरिक्त गेल्या ४ वर्षांत १ सहस्रांहून अधिक साधक चतुर्थ श्रेणी सत्संगातील अभ्यासक्रम पूर्ण करून क्रियाशील साधक बनले आहेत. ते आता सत्संगात न येता केंद्राच्या बैठकीत जात आहेत किंवा केंद्रात दायित्व घेऊन समष्टी साधना करत आहेत.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक उत्तराधिकारी)