मिरज येथे लोकवर्गणीतून उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ५२ वर्षांनंतरही अभेद्यच !
मालवण येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याविषयी घडलेल्या घटनेच्या निमित्ताने…
मालवण (सिंधुदुर्ग) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ८ मासांतच कोसळला. ते पाहून मिरज येथील छत्रपती शिवरायांच्या अभेद्य पुतळ्याच्या आठवणी जागृत होतात. ५२ वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांची देखरेख आणि प्रसिद्ध मूर्तीकार दादा ओतारी यांची हस्तकला यांतून साकारलेला पुतळा उत्कृष्ट कलेचा नमुनाच होय ! त्या पुतळ्याकडे पाहिल्यावर क्षात्रतेज जागृत होऊन शिवराय प्रत्यक्ष घोड्यावर स्वार होऊन युद्धाला जात असल्याचे शिवभक्तांना जाणवते. छत्रपतींच्या या उत्कृष्ट स्मारकाविषयी जाणून घेऊया.
संकलन – श्री. सचिन कौलकर, मिरज
१. पुतळ्याच्या निधीसाठी शिवप्रेमींचा नगरपालिकेवर मोर्चा !
मिरज येथील मंगळवार पेठेतील परिसर पूर्वी ‘कात्री गल्ली’ नावाने ओळखला जात असे. वर्ष १९७२ मध्ये श्री. शरद अवसरे यांनी ‘छत्रपती शिवरायांचा अर्धाकृती पुतळा बसवावा’, अशी इच्छा व्यक्त केली. सांगली येथील श्री. भाई ताराचंद शहा यांनी ‘पूर्णाकृती पुतळा उभा करूया’, असे सांगितले. नारायण बोंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘शिवस्मारक समिती’ स्थापन करण्यात आली. सर्वश्री शरद अवसरे, भाई ताराचंद शहा, नारायण बोंगाळे, विश्वनाथ पिसे, विठ्ठल माळवदे, वसंत गवंडी, दत्तात्रय रानभरे यांनी निधी संकलन करून पुतळा उभारण्यासाठी परिश्रम घेतले. या संकल्पनेला माजी आमदार दिवंगत मोहनराव शिंदे, बॅ. जी.डी. पाटील यांनीही साथ दिली. नगरपालिकेकडे १० सहस्र रुपयांच्या निधीची मागणी केली. माजी नगराध्यक्ष दस्तगीर बारगीर यांनी निधीसाठी मान्यता दिली; पण १० सहस्र रुपयांऐवजी ५ सहस्र रुपयेच मिळाल्याने शिवप्रेमींनी नगरपालिकेवर मोर्चा काढला होता.
२. लोकवर्गणीतून १ सहस्र ९०० किलोच्या ब्राँझच्या पुतळ्याला आकार प्राप्त !
शिवप्रेमींनी लोकवर्गणीतून आणि स्वव्ययाने पुतळा उभारण्याचा निर्धार केला. प्रारंभी घरोघरी वर्गणी मागण्यात आली. भाजीपाला विक्रेते, रिक्शाचालक, कामगार यांनीही त्यांच्या कुवतीनुसार वर्गणी दिली. पुतळ्यासाठी घरोघरी जाऊन तांबे, पितळ, लोखंड, ॲल्युमिनियम या धातूंची भांडी संकलित केली. यातून अनुमाने १ सहस्र ९०० किलो वजनाचे विविध धातू संकलित झाले. त्यातून ब्राँझचा पुतळा निर्माण झाला. निधीच्या रकमेतून अनुमाने २० तोळे सोने खरेदी केले. त्याचा वापर महाराजांच्या चेहर्यासाठी करण्यात आला.
३. २ वर्षांच्या परिश्रमानंतर पुतळ्याची स्थापना !
भव्यदिव्य, करारीस्वरूपी शिवमूर्ती बनवण्याचे दायित्व चित्रतपस्वी भालजी पेंढारकर आणि प्रसिद्ध मूर्तीकार (दिवंगत) दादा ओतारी यांच्याकडे होते. उद्योजक गोविंदराव मराठे यांनी त्यांच्या कारखान्यातील यंत्रणा आणि कामगार उपलब्ध करून दिले. समितीचे कार्यकर्ते, कामगार, भाजीविक्रेते यांनीही मूर्ती घडवण्यात साहाय्य केले. २ वर्षांनी म्हणजे १५ मे १९७२ या दिवशी पुतळा स्थापन करण्यात आला. १ सहस्र ९०० किलो वजनाच्या पुतळ्यासाठी ५९ सहस्र रुपये व्यय झाला होता. त्यासाठी मिरज येथील नागरिकांनीही हातभार लावला.
४. गेली ५२ वर्षे पुतळ्याची नित्य पूजा चालू !
दिवंगत शिवभक्त पांडुरंग अवसरे पुतळ्याची नित्य पूजा करत. त्यांच्या पश्चातही इतकी वर्षे नित्यपूजा चालू आहे. काही वर्षांपासून शिवतीर्थ समितीचे अध्यक्ष श्री. सुधीर अवसरे आणि मिरज शहरातील ५ – ६ मंडळांतील शिवभक्त पूजा करत आहेत.
देवाप्रमाणे महाराजांच्या पुतळ्याची पूजा करतो ! – अमित सूर्यवंशी, शिवप्रेमी
पुतळ्याची मिरज येथील मंडळांकडून वारानुसार पूजा केली जाते. प्रतिशुक्रवारी पूजा करणारे शिवप्रेमी श्री. अमित सूर्यवंशी म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला प्रेरणास्थानी आहेत. आम्ही देवाप्रमाणे पुतळ्याची पूजा करतो. आम्हाला हिंदु धर्माच्या कार्यासाठी आयुष्य खर्ची घालावेसे वाटते. कोणताही खंड पडू न देता आम्ही शेवटपर्यंत ही पूजा करू. यातून आम्हाला आनंद मिळतो. गेल्या ५ वर्षांपासून आम्ही पूजा करत आहोत. आम्ही स्वव्ययाने फुले आणि हार आणतो.’’ या वेळी बाल शिवप्रेमी कु. सोहम नाईक, कु. सार्थक जाधव, कु. आकाश नाईक, कु. समर्थ चव्हाण, कु. अनिरुद्ध नाईक उपस्थित होते.
शिवप्रेमी श्री. सुधीर अवसरे म्हणाले, ‘‘भालजी पेंढारकर आणि दादा ओतारी यांनी शिवमूर्तीत जीव ओतण्याचा प्रयत्न केला. शिवरायांचे हास्य वदन, करारी बाणा, भव्य अश्व आणि लढण्याच्या मोहिमेवर जाणारे शिवराय मूर्तीतून साकारले. पेंढारकर यांनी चेहरा परिपूर्ण होण्यासाठी ३ वेळा कारागिरांना त्यात पालट करण्यास सांगितले.’’
शासकीय निधीविना साकारलेला पुतळा आजही भक्कम ! – सुधीर अवसरे, शिवप्रेमी
हा पुतळा शिवभक्तांच्या प्रेमाचे प्रतीक आहे. निस्सीम शिवभक्तांनी झोकून देऊन काम केले. शासकीय निधीविना साकारलेला हा पुतळा आजही भक्कम आहे. मालवणमधील पुतळा कोसळणे वेदनादायी आहे. शिवप्रेमींची अस्मिता दुखावली गेली आहे. संबंधित कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.