वर्ष १९६२ च्या युद्धात वीरगतीप्राप्त सेकंड लेफ्टनंट विष्णु आठल्ये (ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांचे मावस भाऊ) यांची शौर्यगाथा !
भारतीय सैनिकांचा पराक्रम उलगडणारे ‘शूरा मी वंदिले’ पुस्तक !
‘शूरा मी वंदिले’ हे पुस्तक वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धातील वीरगतीप्राप्त सेकंड लेफ्टनंट विष्णु आठल्ये यांची शौर्यगाथा आहे. या पुस्तकाची संकल्पना विष्णु आठल्ये यांच्या भगिनी सौ. सुधाताई आठल्ये (नाटेकर) यांची आहे. सौ. सुधाताईंना अत्यंत महत्त्वाचा पाठिंबा दिला, तो त्यांचे पती डॉ. श्रीनिवास नाटेकर यांनी ! या पुस्तकाचे संकलन आणि लेखन श्री. सतीश अंभईकर यांनी केले आहे.
वर्ष १९६२ मध्ये भारतीय सैन्याने २० सहस्रांहून अधिक चिनी सैनिकांना ३७ किलोमीटर लांब किबितु – वालोंग या लोहित नदीच्या खोर्यामध्ये २२ दिवस रोखून ठेवले होते. नंतर वालोंगपासून मागे सैन्याचा संपर्क तुटला. त्यामुळे सैन्याला तोफखाना, अन्न, पाणी, दारूगोळा, हिवाळ्यामधील कपडे, बूट यांची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. असे असतांनासुद्धा भारतीय सैन्य अत्यंत शूरपणे लढले होते. याच स्थळी सेकंड लेफ्टनंट विष्णु आठल्ये हे चिनी सैन्याशी झालेल्या लढाईमध्ये पराक्रमाची असीम शर्थ आणि सर्वोच्च त्याग करत धारातीर्थी पडले.
१. विष्णु आठल्ये यांच्या सैनिकी कर्तृत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न
‘शूरा मी वंदिले’ या पुस्तकाचे लेखक श्री. सतीश अंभईकर हे दीर्घकाळ अकोल्याचे रहिवासी होते. अकोल्यातील जठार पेठ भागात जिथे सेकंड लेफ्टनंट विष्णु आठल्ये राहिले होते, त्या घराजवळच श्री. अंभईकर यांचे वास्तव्य होते. ‘केवळ २१ वर्षांचे अल्पजीवन लाभलेल्या सेकंड लेफ्टनंट विष्णु आठल्ये या वीर पुरुषाचा इतिहास पुढील पिढीला कळावा’, अशी इच्छा श्री. सतीश अंभईकर, नाटेकर आणि आठल्ये कुटुंबीय यांना वाटू लागली. गेले ६२ वर्षे विस्मृतीत गेलेल्या शूर योद्ध्याविषयी माहिती संकलन करतांना श्री. सतीश अंभईकर यांनी प्रचंड प्रयत्न केले. लढाईमध्ये जे घडले त्याची अधिकाधिक माहिती पुराव्यानिशी गोळा करतांना त्यांनी जिवाचे रान केले. आठल्ये आणि नाटेकर कुटुंबियांकडील सैन्यामध्ये कार्यरत असलेल्या अन् निवृत्त झालेल्या सैनिकी अधिकार्यांकडून त्यांना माहिती प्राप्त झाली. म्हणूनच ६ दशकानंतर हे पुस्तक प्रकाशित करता आले आहे.
२. विष्णु आठल्ये यांचे जीवन तरुणांच्या मनात शौर्य आणि अत्युच्च त्यागाची जोपासना करणारे !
भगवद्गीतेवर श्रद्धा ठेवून विष्णु आठल्ये यांनी रणक्षेत्रावर आपल्या कर्तव्याचे पालन केले. लढाईत त्यांना वीरगती प्राप्त झाली, तेव्हा ते २१ वर्षांचे होते. विष्णुसारखा एक योद्धा अल्पायुष्यात स्वतःच्या शौर्याचा आदर्श मागे ठेवून गेला. सेकंड लेफ्टनंट विष्णु आठल्ये यांनी राष्ट्ररक्षणासाठी अर्पण केलेले जीवन प्रत्येक सुजाण भारतीय नागरिकांच्या मनात तसे आयुष्यात शौर्य आणि अत्युच्च त्यागाची जोपासना करण्याकरता समर्थ ठरेल .
विष्णु आठल्ये यांनी शालेय शिक्षण अकोल्यात पूर्ण केले आणि पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असतांना ते खडकवासला येथील ‘नॅशनल डिफेन्स अकॅडमी’ (एन्.डी.ए. – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी)ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पहिल्याच प्रयत्नामध्ये ते ‘एन्.डी.ए.’ची कठीण परीक्षा उत्तीर्ण करू शकले, यावरून ते किती हुशार होते, हे कळते. वर्ष १९५७ मध्ये त्यांनी ते ‘एन्.डी.ए.’मध्ये प्रवेश केला आणि पुढील ३ वर्षे त्यांनी ‘एन्.डी.ए.’मध्ये कठोर प्रशिक्षण घेतले. त्यानंतर एक वर्षाकरता ते ‘इंडियन मिलिटरी अकॅडमी’ (आय.एम्.ए. – भारतीय सैन्य अकादमी) डेहराडून येथे गेले. वर्ष १९६१ मध्ये ‘आय.एम्.ए., डेहराडून’मधून उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी भारतीय सैन्याच्या तोफखाना विभागामध्ये रुजू झाले. ‘एन्.डी.ए.’ आणि ‘आय.एम्.ए.’ या दोन्हींमध्ये त्यांची कामगिरी उत्कृष्ट दर्जाची होती. पुढे ‘यंग ऑफिसर्स कोर्स’ करण्याकरता ते ‘स्कूल ऑफ आर्टिलरी, देवळाली’ (नाशिक) येथे गेले. येथे तोफखाना विभागाचे प्रशिक्षण दिले जाते. स्कूल ऑफ आर्टिलरी, देवळाली येथे तोफखाना प्रशिक्षणासाठी ‘सर्वोत्कृष्ट तरुण अधिकार्या’ला देण्यात येणारी ‘सिल्व्हर गन’ त्यांना प्रदान करण्यात आली. यावरून त्यांच्या युद्ध कौशल्याची कल्पना यावी.
३. गोवा मुक्ती संग्राम लढाईत सहभाग आणि पुढे हवाई छत्रीधारी सैनिकाचे प्रशिक्षण
नोव्हेंबर १९६१ मध्ये भारतीय सैन्याला ‘गोवा मुक्ती संग्राम’ या मोहिमेवर पाठवण्यात आले. भारतीय सैन्याने केलेल्या ‘ऑपरेशन विजय’मध्ये ४ दिवसांत गोवा भारताचा भाग बनला. या लढाईत विष्णु आठल्ये यांचा सहभाग होता. भारताच्या बाजूने एकूण ३४ सैनिकांनी प्राणाचे बलीदान केले आणि ५१ घायाळ झाले. ४ सहस्र ६६९ सैनिकांच्या आत्मसमर्पणाखेरीज पोर्तुगिजांच्या बाजूने ३१ सैनिक ठार आणि ५७ घायाळ झाले.
गोवा मुक्ती संग्रामानंतर ते ‘पॅराट्रेनिंग’, म्हणजे हवाई छत्रीधारी सैनिकाचे प्रशिक्षण घेण्याकरता आगरा (उत्तरप्रदेश) येथे गेले. विमानातून सैनिक शत्रूच्या प्रदेशावर उडी मारतात आणि लढतात. हे अत्यंत कठीण प्रशिक्षण होते. त्यांची नेमणूक ‘१७ पॅराफिल्ड रेजिमेंट’मध्ये करण्यात आली. वर्ष १९६२ च्या युद्धामध्ये ‘१७ पॅराफिल्ड रेजिमेंट’ला अरुणाचल प्रदेशमध्ये आणण्यात आले. त्यानंतर चालू झाली ती वालोंगची लढाई !
४. वालोंग : वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धातील भारतीय लष्कराच्या शौर्याचे प्रतीक !
अरुणाचल प्रदेशातील लोहित खोर्यातील लोहित नदीच्या काठावर वसलेले वालोंग हे भारतातील सर्वांत पूर्वेकडील शहर आहे. वालोंग हे वर्ष १९६२ च्या युद्धातील सर्वांत भीषण संघर्षाचे ठिकाण बनले. येथे भारतीय लष्कराच्या ११व्या पायदळ ब्रिगेडला चिनी सैन्याचा सामना करावा लागला. लेफ्टनंट विष्णू आठल्ये यांच्या तुकडीने युद्धाच्या वेळी महत्त्वपूर्ण तोफखाना साहाय्य केले. २० सहस्र चिनी सैन्य एका मागून एक आक्रमण करत असतांनाही भारतीय सैनिक विलक्षण धैर्याने लढले. निकृष्ट उपकरणे, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यांची तीव्र टंचाई असूनही ते धैर्याने उभे राहिले. या लढाईत ६४२ भारतीय सैनिक आणि ७५२ चिनी सैनिक मारले गेले. तथापि भारतीय सैन्याने केलेल्या प्रतिकारामुळे चिनी सैन्याला अनुमाने २० दिवस उशीर झाला, ज्यामुळे आसामच्या मैदानी प्रदेशाकडे जाण्याच्या त्यांच्या योजनांना खीळ बसली.
५. भारतीय सैनिकांच्या शौर्याची स्वीकृती
वालोंग येथे भारतीय सैनिकांनी त्यांचे राष्ट्र, लष्कर आणि त्यांची रेजिमेंट यांचा सन्मान राखला. वर्ष १९६२ युद्धानंतर लिहिल्या गेलेल्या चिनी सैन्याच्या युद्ध इतिहासामध्ये भारतीय सैनिकांच्या शौर्याची स्वीकृती दिली आहे. जानेवारी १९६३ मध्ये अमेरिकेच्या ‘टाइम’ मासिकाने ‘वालोंग येथे लढलेल्या भारतीय सैन्याला श्रद्धांजली वाहिली’, असे म्हटले. त्यासह असेही म्हटले, ‘वालोंग येथे भारतीय सैन्याकडे सर्व गोष्टींची कमतरता होती; मात्र त्यांच्याकडे शौर्य, धैर्य, धाडस, लढाऊ वृत्ती यांची अजिबात कमी नव्हती, ज्यामुळे त्यांनी चिनी सैन्याचा मुकाबला केला. या लढाईतील हुतात्म्यांचे स्मरण केले पाहिजे आणि त्यांच्या सर्वोच्च बलीदानाचा सन्मान केला पाहिजे.’
६. तरुण पिढीला नक्कीच प्रोत्साहन मिळेल !
वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धामध्ये आपल्या शौर्याने आणि मातृभूमीच्या रक्षणार्थ दिलेल्या बलीदानाने अकोल्याचे अन् भारतमातेचा सुपुत्र सेकंड लेफ्टनंट विष्णु आठल्ये यांनी ‘नेफा आघाडी’वर वालोंग क्षेत्रात भीषण रणसंग्रामात स्वतःचे नाव भारताच्या युद्ध इतिहासात कायमचे कोरून ठेवले आहे; परंतु पुढील ६२ वर्षे ते विस्मृतीत गेले होते. श्री सतीश अंभईकर यांनी विष्णु आठल्ये यांच्या सैनिकी कर्तृत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. याविषयीची अप्रकाशित, विखुरलेली माहिती संकलित करून, हे लेखन त्यांनी केले. वाचकांना हे पुस्तक स्फूर्तीदायी वाटावे, हीच अंभईकर, नाटेकर, आठल्ये कुटुंबीय आणि इतर नातेवाईक यांची इच्छा आहे.
तरुण पिढीला वर्ष १९६२ च्या युद्धामधील महापराक्रम कळावा आणि त्यापासून प्रोत्साहन घेऊन त्यांनी सैन्यात सामील व्हावे किंवा देशभक्त नागरिक म्हणून इतर क्षेत्रांमध्ये काम करावे, हीच यामागची इच्छा आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक शाळा-महाविद्यालयांना हे पुस्तक नाटेकर आणि आठल्ये कुटुंबियांकडून विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. आशा करूया की, यामुळे तरुण पिढीला नक्कीच प्रोत्साहन मिळेल आणि ते देशभक्त नागरिक बनण्याचा प्रयत्न करतील. सेकंड लेफ्टनंट विष्णु आठल्ये यांचे नाव ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक, नवी देहली’; ‘युद्ध स्मारक, पुणे’; ‘तवांग आणि वालोंग, अरुणाचल प्रदेश’ येथील युद्ध स्मारकामध्ये कोरण्यात आले आहे.
मातृभूमीच्या रक्षणार्थ शौर्याने लढून तिच्या चरणी प्राणाचे बलीदान करणार्या भारतीय सैन्य दलातील शूरवीर योद्ध्यांना हे पुस्तक कृतज्ञतापूर्वक समर्पित करण्यात आलेले आहे. या वीर सैनिकांना ईश्वर सद्गती प्रदान करो !
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.