दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : काँग्रेसचे २ मुखवटे ! – अशोक चव्हाण; भारताचे नाव खराब करत आहेत राहुल गांधी ! – गिरीश महाजन
काँग्रेसचे २ मुखवटे ! – अशोक चव्हाण
नांदेड – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपकडून नांदेडमध्ये आंदोलन करण्यात आले. पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले माजी मुख्यमंत्री आणि सध्या भाजपमध्ये असलेले अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. चव्हाण या वेळी राहुल गांधी यांना उद्देशून म्हणाले, ‘‘आरक्षणाच्या विरोधात बोलणे हे काँग्रेसची भविष्यातील रणनीती आहे. देशात एक बोलायचे आणि विदेशात दुसरे, हे दोन मुखवटे समोर आले आहेत.’’
भारताचे नाव खराब करत आहेत राहुल गांधी ! – गिरीश महाजन
नाशिक – राहुल गांधी यांना आता भान राहिलेले नाही. प्रत्येक वेळी परदेशात गेले की, ते विचित्र बोलत असतात. भारताबाहेर जाऊन भारताचे नाव खराब करण्याचे काम राहुल गांधी हे वारंवार करत आहेत. परवा त्यांनी थेट ‘आरक्षणाची गरज काय ?’, हे वक्तव्य करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला आव्हान दिले आहे. ‘देव त्यांना सद्बुद्धी देवो’, असे भाजपचे नेते गिरीश महाजन म्हणाले. येथील राहुल गांधी यांच्या विरोधातील आंदोलनात ते बोलत होते.
राहुल गांधी यांच्या विरोधात धुळ्यात निदर्शने !
धुळे – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या दौर्यावर एका मुलाखतीत ‘काँग्रेस सत्तेवर आल्यावर भारतातील आरक्षण आणि संविधान संपवणार’, या केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज धुळे येथे भाजपच्या वतीने जोरदार घोषणा देत आंदोलन करण्यात आले. ‘काँग्रेस हटाव.. देश बचाव.., महाविकास आघाडी हटाव.. महाराष्ट्र बचाव.., राहुल गांधी मुर्दाबात..’, अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला.
‘हिट अँड रन’प्रकरणी दोषींवर कारवाई करा ! – चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई – ‘हिट अँड रन’ प्रकरणात मी प्रामाणिकपणे पोलिसांना संपर्क केलेला नाही. माझ्या वक्तव्याने पोलिसांवर दबाव येणार नाही, तर आपण केंद्रीय गृहमंत्र्यांसमवेत होतो; त्यांनाही काही बोललो नाही; म्हणून या प्रकरणात जो दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. नागपूर येथे झालेल्या अपघातात बावनकुळे यांचा मुलगा मद्य पिऊन गाडी चालवत असल्याचा आरोप होत आहे.
माजी नगरसेवकाचा हॉटेलमध्ये गोळीबार !
पिंपरी चिंचवड – शहरातील काळेवाडी परिसरात एका हॉटेलमध्ये बसलेल्या दोघांनी टेबलवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका माजी नगरसेवकाचा समावेश असून दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सचिन दत्तू नढे, विनोद जयवंत नढे अशी अटक केलेल्या माजी नगरसेवकांची नावे आहेत.