अंबरनाथच्या मोरिवली भागात रासायनिक आस्थापनातून वायूगळती
ठाणे – अंबरनाथच्या मोरिवली औद्योगिक वसाहतीतील (एम्.आय.डी.सी.) रासायनिक आस्थापनातून १२ सप्टेंबरच्या रात्री वायूगळती झाली. त्यामुळे संपूर्ण शहरात रासायनिक धूर पसरला. रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत अंबरनाथ शहरात हा धूर पसरला होता. अंबरनाथ पूर्व भागातील बी केबिन रस्ता, मध्य रेल्वेचे रेल्वेरूळ येथे या धुरामुळे दृश्यमानताही न्यून झाली. नागरिकांना त्रास जाणवू लागल्यावर अग्नीशमनदलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलीस, एम्.आय.डी.सी., अग्नीशमनदल आणि वायूप्रदूषण मंडळाचे कर्मचारी यांच्या प्रयत्नांनंतर परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली. तरी नागरिकांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण आहे. मोरिवली एम्.आय.डी.सी.च्या परिसरात उग्र वास येऊ लागला. ‘एम्.आय.डी.सी.तील कोणत्याही आस्थापनातून वायू सोडण्यात आला नाही’, असे सांगण्यात आले.