गणेशोत्सवाचे अयोग्य रूप पालटा !
गणेशोत्सव विशेष…
लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात चालू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या उद्देशाशी आजच्या गणेशोत्सव मंडळांनी तुलना करून पहायला हवी. इंग्रज समाजातील लोकांना जातीजातींत वाटून, तसेच प्रत्येकाला वेगवेगळे शिकवून एकमेकांमध्ये भांडणे लावत होते आणि त्याचा लाभ त्यांना राज्य करण्यासाठी होत होता. हे टाळता यावे, इंग्रजांविरुद्ध समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन इंग्रजांना तोंड द्यावे, समाज जागृत व्हावा, या उद्देशाने हा उत्सव चालू झाला.
उत्सव चालू करतांना त्यांनी जी तत्त्वे सांगितली, त्यामधील काही तत्त्वे पुढीलप्रमाणे होती.
अ. लोकांनी उत्सव काळात १० दिवस एकत्र जमावे. संघभाव वाढवावा. एकत्रित काम करण्याचा उत्साह वाढवून एकमेकांना साहाय्य करण्याची वृत्ती वाढवावी.
आ. गणपतीची पूजा करावी.
इ. एकमेकांशी प्रेमभावाने बोलावे.
ई. उत्सव काळात महापुरुषांची व्याख्याने, भजन-कीर्तने, समाज प्रबोधनाचे सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम व्हावेत.
उ. भक्तीगीते, नाट्यगीते, दशावतार आणि इतर अनेक कथाकथनाचे कार्यक्रम अन् समाजप्रबोधनावर आधारित नाटके ठेवून समाजाचे प्रबोधन व्हावे, असे कार्यक्रम करावेत.
याचा परिणाम असा झाला की, गणपतीची प्रतिष्ठापना आणि विसर्जन करतांना जी मिरवणूक काढली जायची, त्यामुळे लोक संघटित व्हायचे. लोक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांच्यामध्ये एकमेकांविषयी प्रेमभाव निर्माण होत होता. संघभावना निर्माण होत होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये फूट पाडणे इंग्रजांना शक्य होत नव्हते. त्यामुळे संघटित झालेल्या युवकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला आणि भारताला स्वातंत्र्य मिळण्यास साहाय्य झाले. लोकमान्य टिळक यांचा उद्देश तर साध्य झाला; स्वातंत्र्यानंतर मात्र उद्देश सफल झाल्याने आताच्या स्थितीत उत्सवातील तेजच लोप पावले.
उत्सवाच्या काळात नाचगाणे, जुगार खेळणे, मिरवणुकांमध्ये दारू पिणे चालू झाले. कर्णकर्कश आवाजात वाजणारे ‘डीजे’ ध्वनीक्षेपक कानठळ्या बसवू लागले. परिणामी कानाचे आजार निर्माण झाले. उत्सवाला हे विकृत स्वरूप आल्यामुळे संघटनाचा, राष्ट्र-धर्म कार्याचा मूळ उद्देश बाजूला राहिला. त्यामुळे आता गणेशोत्सव साजरा करणे, त्यामध्ये सहभागी होणे, हे अनेकांना नकोसे वाटते. सरकारने उत्सवातील सर्व अयोग्य कुप्रथा आणि कार्यक्रम बंद करायला हवेत. सरकारने डीजे वाजवण्यावर बंदी आणायला हवी, तसेच उत्सवातील पावित्र्य भंग करणारे अपप्रकार बंद करण्यासाठी आता गणेशोत्सव मंडळे, धर्मप्रेमी आणि सरकार या सर्वांनी मिळून पावले उचलणे आवश्यक आहे !
– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.