भोर (पुणे) येथे १०० टक्के मूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन !
निरा-देवघर धरणातून अतिरिक्त पाणी निरा नदीत सोडल्याने गणेशभक्तांना समाधान !
भोर (जिल्हा पुणे) – शहरापासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या बसरापूर गावाचा नदी घाट यावर्षीही श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी सज्ज झाला आहे. या नदीघाटावर या गावासह आजूबाजूच्या अनेक गावांतून परिसरातून, तसेच भोलावडे, भोर शहरातून अनेक श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी येत असतात. या श्री गणेशमूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन व्हावे, तसेच नदी घाट परिसर कसा स्वच्छ राहील ? याकडे पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन आणि या गावाचे स्वच्छतादूत पोलीस मित्र केशव साळुंके यांनी योग्य प्रकारे काळजी घेतली आहे. हे सर्वजण मागील १५ वर्षांपासून येथे आपली सेवा बजावत आहेत. त्यामुळे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही १०० टक्के मूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यात आले. (श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन होण्यासाठी प्रयत्न करणार्यांचे अभिनंदन ! संपादक)
नदीकिनारी जागोजागी ‘स्वच्छता राखा’, ‘निर्माल्य कोठे टाकावे ?’, ‘पाण्यात कचरा टाकू नका’, ‘मूर्तीची विटंबना होणार नाही’, ‘कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी सर्वांनी घ्या’, अशा प्रकारचे फलक या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत.
बोटींमधून नदीच्या पाण्यात खोलवर मूर्ती सोडण्याचे नियोजन !
प्रतिवर्षी नदीकाठी मोठ्या प्रमाणात मूर्तींचा साठा होतो, याकरता यावर्षी ग्रामपंचायतीने मत्स्यपालनासाठी असणार्या छोट्या तराफा बोटी उपलब्ध करून याद्वारे या बोटींमधून नदीच्या पाण्यात खोलवर मूर्ती सोडण्याचे नियोजन केले आहे, असे या गावाचे विद्यमान सरपंच नीलम संतोष झांजले यांच्याकडून सांगण्यात आले आहे.