सांगली येथील पंचायतन संस्थानच्या श्री गणेशमूर्तीचे उत्साहात विसर्जन !
सांगली, १३ सप्टेंबर (वार्ता.) – सांगलीचे आराध्यदैवत आणि पंचायतन संस्थानच्या श्री गणेशमूर्तीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणपति संस्थानचा रथोत्सव सोहळा पहाण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. ३ घंटे ३० मिनिटे चाललेल्या या विसर्जन मिरवणुकीच्या रथात विराजमान झालेल्या श्री गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. कृष्णातीरावर सहस्रों भाविकांच्या साक्षीने श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ५ दिवस चालू असलेल्या दरबार सभागृहातील उत्सवाची सांगता झाली. गणपति पेठ येथील अनेक व्यापारी आणि उद्योजक यांनी प्रसादाचे वाटप केले. सिंधी समाजाच्या वतीने मिरवणूक मार्गाच्या प्रारंभीच उभारलेल्या अन्नछत्राचा दिवसभर सहस्रों भाविकांनी लाभ घेतला. अनेक मंडळांनी पाणी, सरबत, शिरा, पेढे, लाडू, चिरमुरे, फुटाणे अशा प्रसादाचे वाटप केले. मिरवणुकीसाठी उपनगरासह ग्रामीण भागातून आलेल्या गणेशभक्तांची सोय झाली.