मौनाचे महत्त्व आणि प्रकार अन् श्री. निषाद देशमुख यांना स्वप्नात स्वतःच्या साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करणारी शक्ती यांविषयी सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान !
श्री. निषाद देशमुख यांना स्वप्नात ‘सध्या होत असलेले अनिष्ट शक्तींचे त्रास दूर होण्यासाठी आणि त्यांची चित्तशुद्धी होण्यासाठी त्यांनी श्री गुरूंना विचारून या वर्षीची आषाढ अमावास्या (४.८.२०२४) ते श्रावण अमावास्या (३.९.२०२४) या कालावधीत ‘मौन’ पाळावे. या कालावधीत गुरूंनी सांगितलेला नामजप अधिकाधिक करावा. त्यामुळे त्यांची आत्मोन्नती होण्यास साहाय्य होईल.’, असे ऐकू आले. याविषयी त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना विचारले. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांना, ‘त्या कालावधीत नामजप अधिकाधिक करावा’, हे योग्य आहे; पण तेव्हा मौन पाळण्यापेक्षा अंतर्मुख व्हावे. भक्तीमार्गानुसार ‘भगवंताच्या चिंतनामध्ये गुंतल्याने बोलण्याचे भान न रहाणे’, हे खरे मौन’, असे सांगितले. याविषयी आपण १३.९.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात पाहिले. आज सनातनच्या सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान येथे देत आहोत.
१. ‘मौन आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व !
१ अ. मौन : ‘मौन पाळणे’, ही केवळ बाह्य कृती नसून ‘न बोलण्याची’ महत्त्वपूर्ण कृती आहे. जेव्हा मनातील विचार न्यून होतात किंवा थांबतात, तेव्हा आपले बोलणे उणावते. त्यामुळे सूक्ष्मातील मनातील विचारांवर नियंत्रण मिळवल्यास न बोलण्याच्या बाह्य कृतीवर नियंत्रण मिळवता येते.
१ आ. मनातील विचारांचे प्रमाण न्यून होण्यासाठी करायची उपाययोजना
१. मनातील अनावश्यक विचारांवर स्वयंसूचना देणे
२. मनातील विचार न्यून होण्यासाठी मन सतत नामजप किंवा सेवा यांमध्ये व्यस्त ठेवणे
३. ‘निर्विचार’ हा नामजप करणे
१ इ. ‘खरे मौन’ कशाला म्हणायचे ? : अजिबात न बोलणे ही कृती बाह्यदृष्ट्या मौन पाळण्याची वाटते; परंतु खरे मौन निराळेच आहे. ‘आवश्यक तितकेच बोलणे’ हेसुद्धा एक प्रकारचे मौन आहे.
१ ई. व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या दृष्टीने पाळायचे मौन
१ ई १. व्यष्टी साधनेच्या अंतर्गत पाळायचे मौन : जे साधक केवळ व्यष्टी साधना करतात, त्यांनी काहीही न बोलता मौन पाळावे. त्यामुळे त्यांचे मन मायेतील बाह्य विचारांमध्ये न जाता अंतर्मुख होण्यास साहाय्य होते आणि अंतर्मुखता साधल्यामुळे भगवंताशी सूक्ष्मातून अनुसंधान वाढण्यास साहाय्य होते. अशा प्रकारे व्यष्टी साधना करणार्या साधकाने मौन पाळले, तरी त्याची चित्तशुद्धी होऊ शकते.
१ ई २. समष्टी साधनेच्या अंतर्गत पाळायचे मौन : जे साधक समष्टी साधना करतात, त्यांचा अनेक साधकांशी किंवा समाजातील व्यक्तींशी संपर्क येतो. त्यामुळे ते पूर्णपणे मौन न पाळता समष्टी साधनेच्या दृष्टीने आवश्यक तितकेच बोलले, तरीही मौन पाळण्यासारखे आहे. या साधकांनी समष्टीशी आवश्यक तितका संपर्क ठेवावा आणि अन्य वेळी अनावश्यक न बोलता भगवंताचे नामस्मरण करावे किंवा ध्यान लावावे. अशा प्रकारे समष्टी साधना करणार्या साधकाने मौन पाळले, तरी त्याची चित्तशुद्धी होऊ शकते.
२. श्री. निषाद देशमुख यांना स्वप्नात स्वतःच्या साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करणार्या शक्तीविषयी सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान !
श्री. निषाद देशमुख यांना स्वप्नदृष्टांताद्वारे साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करणारा भुवलोकात अडकलेला एक साधना करणारा पुण्यात्मा आहे. स्वतःच्या साधनेचा अहंकार झाल्यामुळे तो भुवलोकात अडकलेला आहे; परंतु त्याच्यामध्ये इतरांना साहाय्य करण्याचा गुण असल्यामुळे तो साधना करणार्या सात्त्विक जिवांना स्वप्नदृष्टांत देऊन त्यांना साधनेत साहाय्य करण्याचा प्रयत्न करत असतो. या पुण्यात्म्याने अनेक जन्म केवळ व्यष्टी साधना केल्यामुळे त्याला ‘स्थुलातून न बोलता मौन पाळणे हेच केवळ महत्त्वाचे आहे’, असे वाटते. या पुण्यात्म्याची वाटचाल कर्मकांडाकडून उपासनाकांडाने झाल्याने त्याने अनेक वर्षे मनुष्ययोनीत असतांना चातुर्मासात कर्मकांडादी कृती अल्प प्रमाणात आणि ‘मौन पाळून नामजप करून वृत्ती अंतर्मुख करणे’, ही साधना केली होती. त्याने कधीही समष्टी साधना केली नाही. त्याला समष्टी साधनेचे महत्त्व ठाऊक नसल्यामुळे त्याला वाटते की, केवळ स्थुलातील मौन पाळले, तरच चित्तशुद्धी होते. त्यामुळे त्या पुण्यात्म्याने श्री. निषाद देशमुख यांना स्थुलातून मौन पाळण्याविषयी मार्गदर्शन केले. प्रत्यक्षात श्री. निषाद देशमुख यांची प्रकृती समष्टी-व्यष्टी असल्यामुळे त्यांनी स्थुलातून मौन पाळण्याची आवश्यकता नसून वरील परिच्छेदात उल्लेख केल्याप्रमाणे समष्टी साधनेच्या अंतर्गत मौन पाळावे. त्यामुळे श्री. निषाद यांच्या समष्टी साधनेत खंड न पडता ती एकीकडे चालू राहील आणि दुसरीकडे वृत्ती अंतर्मुख झाल्यामुळे त्यांच्या चित्ताच्या शुद्धीकरणाचीही प्रक्रिया चालू राहील.
३. कृतज्ञता
‘श्री गुरूंच्या कृपेमुळे व्यष्टी आणि समष्टी स्तरांवरील मौनाचे प्रकार अन् त्यांचे महत्त्व सूक्ष्मातील ज्ञानातून उमजले’, यासाठी हे दिव्य ज्ञान देणार्या ज्ञानगुरु असणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी मी लक्ष लक्ष वेळा कृतज्ञ आहे.’
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक आणि वेळ ६.८.२०२४ दुपारी १२ ते १२.१५)
|