संपादकीय : क्रिकेट हवे कि हिंदूंचा विश्वास ?
१९ सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये क्रिकेटची कसोटी मालिका चालू होत आहे. प्रारंभी कसोटीचे सामने आणि त्यानंतर उभय देशांमध्ये ‘टी-२०’ सामने होणार आहेत. भारतात राष्ट्रीय खेळ हॉकी किंवा अन्य खेळांपेक्षा क्रिकेटचे वेड सर्वाधिक आहे. त्यामुळे भारतात क्रिकेटच्या सामन्यांना नेहमीच मोठा प्रेक्षकवर्ग लाभतो. प्रचंड लोकसंख्या लक्षात घेता अन्य देशांच्या तुलनेत भारतात भरलेल्या सामन्यांमुळे अन्य देशांच्या तुलनेत अधिक आर्थिक लाभ साधला जातो; परंतु प्रश्न जेव्हा राष्ट्रप्रेमाचा असतो, तेव्हा तो पैशापेक्षा निश्चितच मोठा असतो. याविषयी कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही.
यापूर्वी भारताने राष्ट्रप्रेमामुळेच पाकिस्तानशी क्रिकेटच्या सामन्यांत काडीमोड घेतले होते. पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशाने भारताच्या विरोधातील शत्रूत्व उघडपणे दाखवलेले नाही. त्यामुळे लाखो बांगलादेशींनी भारतात घुसखोरी करून अनेक समाजविघातक कृत्ये केली असली, तरी पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशासमवेत क्रिकेटचे सामने न खेळण्याची मागणी भारतियांनी कधीही केलेली नाही; परंतु काही दिवसांपूर्वी बांगलादेशमधील मुसलमानांनी केलेला हिंदूंचा नरसंहार भयावह होता. बांगलादेशातील ६४ पैकी किमान ५० जिल्ह्यांमध्ये हिंदूंचा नरसंहार करण्यात आला. हिंदु महिला, युवती, बालिका यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आले. त्यांचे गळे चिरण्यात आले. कोवळ्या वयाच्या बालकांचे गळे आवळून त्यांना झाडांना टांगण्यात आले. हिंदूंची घरे जाळण्यात आली. मंदिरे तोडून मूर्तींचा विध्वंस करण्यात आला. थोडीतरी मानवता शिल्लक असलेले इतका अमानवी आणि क्रूर अत्याचार करायला धजावणार नाहीत. ‘राक्षसी कृत्य’ हे शब्दही मान टाकतील, अशी ही निर्दयता आहे; परंतु अन्य देशांत शांती निर्माण होण्यासाठी मध्यस्थी करणार्या भारताला बांगलादेशातील हिंदु बांधवांची शांती अबाधित रहावी, असे वाटले नाही, ही गोष्ट हिंदूंसाठी दुर्दैवी आहे. भारतामधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवणारे काँग्रेस, डावे, पुरोगामी हेच काय, तर पाकिस्तान आणि बांगलादेश हे देशही आहेत; परंतु बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांच्या विरोधात भाजप तरी भूमिका घेईल, ही हिंदूंची आशा निष्फळ ठरली.
बांगलादेशातील हिंदूंवरील अनन्वित अत्याचाराचे दुःख भारतातील हिंदूंना निश्चितच आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि केंद्र सरकार यांच्या हे लक्षात यायला हवे होते; परंतु इथे भारतातील बहुसंख्य हिंदूंनी बांगलादेशासमवेत क्रिकेटचे सामने रहित करण्याची मागणी करूनही त्याविषयीची भूमिका स्पष्ट करण्याचे सौजन्यही केंद्र सरकार किंवा केंद्रीय क्रिकेट नियामक मंडळ यांनी दाखवले नाही. काँग्रेस आणि देशातील मुसलमान यांनी भारतातील सरकार हिंदुधार्जिणे असल्याची टीका करावी अन् सरकारने हिंदूंच्या नरसंहाराकडे दुर्लक्ष करावे, केवढी ही हिंदूंची शोकांतिका ! सत्तेत आल्यावर भाजपने हिंदूंच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत, असे नाही. केंद्र सरकार हिंदूंच्या हिताचा विचार करते, याविषयी हिंदूंच्या मनात विश्वास आहे; परंतु हा विश्वास सार्थ ठरवण्यात याप्रसंगी केंद्र सरकार न्यून पडले आहे. केंद्रात भाजपचे सरकार असतांना बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविषयी क्रिकेट नियामक मंडळाने हिंदूंच्या मागणीला धूपही घातला नाही, असे का ? याची सल हिंदूंमध्ये निश्चितच आहे. ‘क्रिकेटच्या सामन्यांमागील अर्थकारण’, हेच यामागील मूळ कारण आहे.
किक्रेटने कमवाल; पण हिंदूंचा विश्वास गमवाल !
क्रिकेटचे सामने ज्या देशात आयोजित केले जातात, त्या देशासाठी ते अधिक आर्थिक लाभाचे ठरतात. क्रिकेटच्या सामन्यांसाठी विविध आस्थापनांनी केलेल्या गुंतवणुकीतून सामन्यांच्या आयोजकांना अब्जावधींचा आर्थिक लाभ होतो, तसेच देशाच्या तिजोरीतही मोठा कर जमा होतो. बांगलादेशासमवेत होणारे सामने भारतामध्ये होत असल्यामुळे या सामन्यांचा आर्थिक लाभ बांगलादेशापेक्षा भारतालाच अधिक होणार आहे. हेच सामने जर बांगलादेशात असते आणि भारतीय क्रिकेट मंडळाने बहिष्कार घातला असता, तर त्याचा बांगलादेशाला फटका बसला असता; मात्र हे सामने भारतात होत असल्यामुळे ते रहित झाल्यास त्याचा आर्थिक फटका भारताला अधिक होणार आहे. बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार काही दिवसांपूर्वीच झाला असला, तरी हे क्रिकेटचे सामने कितीतरी महिन्यांपूर्वी नियोजित आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि भारत सरकार यांच्या चिडीचूपपणामागे ही सर्व कारणे आहेत; परंतु निकष काय केवळ अर्थकारणापुरता मर्यादित असतो का ? बांगलादेशात निर्दयीपणे मारले गेलेले हिंदू आणि त्यांच्या नावाने शोक करणारे त्यांचे कुटुंबीय यांच्या भावनांचे काहीच मोल नाही का ? भारतात एखादा मुसलमान ‘मॉब लिंचिंग’मध्ये मारला गेला, तर भारतात डावे, पुरोगामी, काँग्रेस उर बडवतात. हेच काय, तर पाकिस्तान आणि बांगलादेश येथील वृत्तवाहिन्या यावरून भारतविरोधी गरळओक करतात; पण बांगलादेशात बळी पडलेल्या हिंदूंना आधार कुणाचा ? तेथील हिंदूंच्या अत्याचारांचे मोजमाप केवळ पैशांवरून होत असेल, तर केवळ बांगलादेशातीलच नव्हे, तर भारतातीलही हिंदू हे कदापि विसरणार नाहीत, हे भारत सरकार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांनी लक्षात ठेवावे. क्रिकेटचे सामने रहित केल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला काही कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागेलही; परंतु हिंदूंचे निर्घृण हत्याकांड करणार्या बांगलादेशासमवेत क्रिकेटचे सामने खेळले गेले, तर केंद्रशासन हिंदूंचा जो विश्वास गमावेल, तो कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांनीही भरून निघणारा नाही.
क्रिकेट या खेळाकडे आम्ही खिलाडू वृत्तीनेच पहातो; परंतु आमच्या बांधवांच्या क्रूर हत्या, भगिनींवरील बलात्कार आणि त्यांच्या अश्रूंचे मूल्य आम्हाला खेळापेक्षा अधिक वाटते. भारतीय राज्यकर्ते शिवरायांचा आदर्श सांगतात; परंतु त्यांच्या जीवनातील प्रसंग त्यांच्यासाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल. पुरंदरच्या तहानंतर मिर्झा राजे जयसिंह यांच्यासमवेत शिवरायांवर औरंगजेबाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त देहली येथे त्याच्या दरबारात जाण्याची वेळ आली. तेथे महाराजांना जाणीवपूर्वक मागील रांगेत उभे केल्यावर जेथे औरंगजेबाच्या नजरेत बघण्याचेही कुणाचे धारिष्ट्य नव्हते, तेथे सह्याद्रीच्या नरसिंहाने गर्जना केली आणि ते दरबारातून तडक निघून गेले. या वेळी तहात गेलेले किल्ले, स्वत:समवेत असलेला छोटा संभाजी, दोघांना अटक झाली, तर यांपेक्षाही महाराजांना महाराष्ट्राचा स्वाभिमान महत्त्वाचा वाटला. त्यामुळेच शिवरायांचे स्थान हिंदूंच्या हृदयात अढळ आहे. त्यामुळे किती आर्थिक तोटा होईल, अन्य देश काय म्हणतील ? यांपेक्षा बांगलादेशातील हिंदूंचा स्वाभिमान आम्हाला महत्त्वाचा आहे, हे भारत सरकारने दाखवून दिले असते, तर हिंदूंच्या मनात त्यांची हिंदुत्वाची प्रतिमा झळाळली असती; परंतु आर्थिक गोळाबेरीज करतांना केंद्र सरकारने ही संधी गमावली. तुम्ही पैशांची बेरीज केलीत; पण हिंदूंचा विश्वास गमावलात त्याचे काय ? याविषयी अवश्य चिंतन करावे !
क्रिकेटमधून कोट्यवधी रुपये मिळतील; परंतु त्याद्वारे हिंदूंचा विश्वास मिळवता येईल का ? याचा केंद्रशासनाने विचार करावा ! |