कागवाड येथील श्री गणेश मंदिरात ‘श्री गणेश सहस्रनाम अभिषेक’ कार्यक्रम उत्साहात पार पडला
कागवाड (जिल्हा बेळगाव), १२ सप्टेंबर (वार्ता.) – येथील संस्थान श्री गणेश मंदिरात ‘श्री गणेश सहस्रनाम अभिषेक’ कार्यक्रम पार पडला. २०० वर्षांपूर्वी तत्कालीन पटवर्धन सरकार यांनी बांधलेल्या पुरातन अशा श्री गणेश मंदिरात सध्याचे संस्थानिक पटवर्धन सरकार, अधिवक्ता समीर पटवर्धन आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या वतीने ४ सप्टेंबर या दिवशी भाद्रपद शु. प्रतिपदेपासून चालू होणार्या गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘श्री गणेश सहस्रनाम अभिषेक’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या मंदिरातील गणेशमूर्ती ही स्वयंभू असून अत्यंत जागृत आणि नवसाला पावते, अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे. भाद्रपद शुक्ल प्रतिपदेला मंदार गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना, श्री गणेशचतुर्थीला दीड दिवसाच्या उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना आणि ९ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम असा येथे प्रतिवर्षी उत्सव साजरा केला जातो, असे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी सांगितले. श्री प्रदीप जोशी, श्री. संदीप जोशी आणि अन्य गुरुजी यांनी या कार्यक्रमाचे पौरोहित्य केले.