व्यायामाचे परिणाम दिसण्यासाठी व्यायामशाळेत प्रतिदिन घंटोन्घंटे कसरत करावी लागते का
सध्याच्या आधुनिकीकरणात उद्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. सध्या होत असलेल्या अनेक शारीरिक समस्यांवर औषधोपचारासह अनेक पर्याय निवडले जातात; पण व्यायामाविना या सर्व उपाययोजना अपूर्ण ठरतात. या सदरातून आपण व्यायाम करण्याची आवश्यकता आणि महत्त्व जाणून घेणार आहोत, तसेच व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन करणार आहोत.
‘व्यायामशाळेत किती घंटे कसरत करायची ?’, हे पूर्णपणे तुमच्या उद्दिष्टांवर अवलंबून असते. ‘एखाद्या स्पर्धेत जिंकणे किंवा शरिराला आकार देणे’, हे ध्येय नसल्यास व्यायामशाळेत घंटोन्घंटे घालवण्याची आवश्यकता नसते. सर्वसाधारण व्यक्तीसाठी ‘वजन न्यून करणे, शरिराची लवचिकता वाढवून सांधे मोकळे करणे, अवजड कामे करण्यासाठी शरिराला सक्षम बनवणे’, येथपासून ‘दैनंदिन कृतींमध्ये उत्साह किंवा गती आणणे, हलकेपणा अनुभवत निरोगी जीवन जगणे’, हे उद्देश अधिक महत्त्वाचे आहेत. हे उद्देश साध्य करण्यासाठी ‘प्रतिदिन ३० ते ४५ मिनिटे नियमितपणे करणे आणि योग्य आहार घेणे’, एवढे पुरेसे आहे. (भाग ९)
या व्यायामामध्ये पुढील व्यायाम प्रकारांचा समावेश असू शकतो
१. हृदय आणि फुफ्फुस यांची क्षमता वाढवणारे प्रकार, उदा. गतीने चालणे, धावणे, सायकल चालवणे, दोरीवरील उड्या मारणे इत्यादी.
२. शक्ती वाढवणारे प्रकार, उदा. दंड, बैठका इत्यादी.
३. लवचिकता वाढवणारे प्रकार, उदा. स्ट्रेचिंग आणि काही योगासने.
घंटोन्घंटे कसरत न करता प्रतिदिन थोडा वेळ व्यायाम केला, तरी चांगले परिणाम मिळू शकतात, केवळ त्यात सातत्य आणि गुणवत्ता असणे महत्त्वाचे आहे.’
– सौ. अक्षता रूपेश रेडकर, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (११.८.२०२४)
निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा