छत्रपती संभाजीनगर येथे भाजप आणि शिवसेना यांच्या वतीने टाळ मृदंग वाजवत आंदोलन !
छत्रपती संभाजीनगर – ‘रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे’ यांसह अनेक भजने म्हणत भाजप आणि शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या विरोधात घोषणा देत टाळ मृदंग वाजवत आंदोलन केले. भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नेतृत्वाखाली १२ सप्टेंबरला क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात आले आहे. हिंदुद्रोही आणि धर्मद्रोही पत्रकार ज्ञानेश महाराव यांच्या तोंडी हिंदु देवतांची संहिता (स्क्रिप्ट) तुमचीच आहे का ? असा प्रश्न शिरीष बोराळकर यांनी केला. या वेळी शरद पवार यांच्या विरोधाचे विविध फलकही या आंदोलनात लावले होते.
शिवसेनेच्या वतीनेही आंदोलन !
येथील क्रांती चौक येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या वतीनेही आंदोलन केले. हिंदु देवतांचा अवमान होत असतांनाही शरद पवार शांत होते. त्यामुळे केवळ एका समाजाची मते मिळवण्यासाठी हा प्रकार चालू होता, अशी टीका जंजाळ यांनी केली. शरद पवार यांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या.