थोरल्या पवारांपासून हिंदु धर्माला धोका ! – भाजपचा गंभीर आरोप
नाशिकमध्ये भाजपकडून आंदोलन !
नाशिक – पाकिस्तान जसे आतंकवादी पोसतात, तसे शरद पवार हिंदुविरोधी विचार पोसत आहेत. इसीस, पी.एफ्.आय.सारख्या संघटनांकडून हिंदु धर्माला धोका आहे. तसाच शरद पवारांपासून हिंदु धर्माला धोका आहे. हिंदुविरोधी विचार करण्याचे आणि त्याला बळ देण्याचे कार्य पवार करतात, असे प्रतिपादन भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केले. नाशिकमध्ये काळाराम मंदिरासमोर शरद पवारांच्या विरोधात भाजप आणि हिंदु संघटना यांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी प्रभु रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थ यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. शरद पवारांनी सर्व विधानांना पाठिंबा दिल्याचा आरोप करत भाजप आणि हिंदु संघटना यांनी याचा निषेध केला. या वेळी साधू-महंत यांची उपस्थिती होती.
जो जो माणूस हिंदु धर्माचा अपमान करतो, तो तो माणूस शरद पवारांचाच माणूस असतो. हिंदुविरोधी वक्तव्य करणारा प्रत्येक माणूस शरद पवारांशीच कसा संबंधित असतो ? असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला.
लालबागच्या गणपतीला जाणार्या पवार यांची ढोंगी श्रद्धा जनतेला दिसत आहे ! – प्रवीण दरेकर, भाजप नेते
ज्ञानेश महाराव यांनी शरद पवार यांच्यासमोर प्रभु रामचंद्र, विठुराया आणि हिंदुत्व यांचा अपमान केला. त्यावर काहीही न बोलता शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले. महाराष्ट्राच्या जनतेला ही ढोंगी श्रद्धा दिसून येत आहे, असे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले आहे.