सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कृपाछत्र असतांना साधकांनी तणावविरहित, सकारात्मक आणि आनंदी राहून साधना करणे आवश्यक !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात मला अनेक साधकांचा सत्संग मिळतो आणि त्यांच्याकडून साधनेसंदर्भात पुष्कळ शिकता येते. गुरुकृपेने माझ्याकडून काही साधक आणि संत यांची मला शिकायला मिळालेली गुणवैशिष्ट्ये लिहून देण्याची सेवा होते. साधकांकडून शिकण्यासाठी मी आश्रमातील काही साधकांना विचारले, ‘‘तुम्ही २ मिनिटे विचार करून एका वाक्यात तुमच्यातील ५ गुण मला सांगू शकाल का ?’’ तेव्हा जवळ जवळ ८० टक्के साधकांना त्यांच्यातील एकही गुण लगेच सांगता आला नाही. शेष २० टक्के साधकांनी पुष्कळ विचार करून त्यांच्यातील १ – २ गुण सांगितले; मात्र आश्चर्य, म्हणजे मी त्यांना त्यांच्यातील ५ स्वभावदोष सांगायला सांगितल्यावर त्यांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्यातील अनेक स्वभावदोष आणि अहंचे पैलू लगेच सांगितले. याविषयी सहसाधकांशी बोलतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला पुढील सूत्रे सुचवली.
१. आपल्या मनात येणारा पहिला विचार सकारात्मक कि नकारात्मक आहे ?, यावर आपल्या मनाची स्थिती अवलंबून असणे
‘सहसाधक किंवा समाजातील इतर व्यक्ती आपल्याला भेटल्यानंतर आपल्याला त्यांच्यातील आणि आपल्यातील प्रथम स्वभावदोष दिसतात कि गुण दिसतात ?’, याचा आपण विचार करू शकतो. आपल्या मनात येणारा पहिला विचार सकारात्मक आहे कि नकारात्मक आहे ?, यावर आपल्या मनाची स्थिती अवलंबून राहील आणि त्याप्रमाणे आपले आचरण होऊ शकेल.
२. आपण स्वतःतील आणि इतरांमधील गुण पाहून सकारात्मक अन् आनंदी रहाणे आवश्यक असणे
आपली साधना म्हणून आपल्यातील काही गुण आणि आपल्यावर होत असलेली गुरुकृपा यांमुळे आपण नामस्मरण, सत्संग, सत्सेवा, भावजागृती इत्यादी प्रयत्न करू शकतो. त्या वेळी आपण भगवंत किंवा गुरुदेव यांच्या अनुसंधानात असल्यामुळे अथवा सत्सेवेच्या विचारांत असल्यामुळे आपल्याला शक्ती, चैतन्य आणि आनंद मिळतो. आपण स्वभावदोष आणि नकारात्मक गोष्टी यांचा विचार करत असलो, म्हणजे त्यांच्या अनुसंधानात असलो, तर आपल्याला दुःख, निराशा आणि अनिष्ट शक्तींचे त्रास होतात. त्यासाठी आपण स्वतःमधील आणि इतरांमधील गुण पाहून सकारात्मक अन् आनंदी रहाण्याचा प्रयत्न करू शकतो.
३. गुरुकृपायोगानुसार साधना करतांना साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासह गुणसंवर्धन करणेही महत्त्वाचे असणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या गुरुकृपायोग साधनामार्गानुसार स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण सर्व साधक त्यानुसार प्रयत्न करून प्रगतीही करत आहोत; परंतु हे करत असतांना ‘आपल्यातील गुण पहाणे आणि गुणसंवर्धन करणे, तसेच इतर साधकांमधील गुण पाहून ते शिकून घेणे अन् त्यानुसार प्रयत्न करणे, हेही तेवढेच आवश्यक असते. यांमुळे आपल्यामध्ये सकारात्मकता आणि सहजता येऊन आपण सदैव आनंदी राहू शकतो, तसेच आपण ईश्वरप्राप्तीचे ध्येय ताण न घेता सहजतेने गाठू शकतो’, असे मला वाटते.
४. सकारात्मक बोलणारी व्यक्ती सर्वांना आवडणे, तर नकारात्मक बोलणारी व्यक्ती न आवडणे
सकारात्मक बोलणार्या व्यक्तीचे अस्तित्व सर्वांनाच आपलेपणाचे वाटून तिचा सत्संग हवाहवासा वाटतो, तर नकारात्मक बोलणारी व्यक्ती आपल्याला नकोशी होते; कारण नकारात्मक बोलण्यामुळे रज-तम वाढून वातावरण दूषित होते. आपण सतत स्वतःचे आणि इतरांचे स्वभावदोष पहात राहिलो, तर ते कुणालाच, अगदी भगवंतालाही आवडणार नाही. त्यासाठी आपण प्रत्येक गोष्ट आणि व्यक्ती यांच्यामध्ये असलेले गुण पाहून त्यांच्याशी वागलो, तर आपली साधना होऊन सर्वांना आनंद मिळू शकतो.
५. सकारात्मक व्यक्तीला प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसत असल्याने साधकांनी सकारात्मक आणि आनंदी रहाणे आवश्यक असणे
‘नकारात्मक व्यक्तीला प्रत्येक संधीमध्ये अडचण दिसते, तर सकारात्मक व्यक्तीला प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसते’, असे म्हणतात. त्याचप्रमाणे अहंकारी व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वभावदोष दिसतात, तर गुणी साधकाला प्रत्येक व्यक्तीतील ईश्वरी गुण बघण्याचा आणि शिकण्याचा संस्कार असतो. त्यासाठी आपण नेहमी सकारात्मक राहून प्रत्येक व्यक्तीतील ईश्वरी गुण अंगीकारून आनंदी रहाण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
६. ‘जीवनात येणार्या अडचणी यासुद्धा ईश्वरेच्छा आहेत’, असे समजून साधकाने साधना केली, तर साधकाला अडचणींच्या वेळीही आनंद मिळतो !
प्रत्येकामध्ये अल्पाधिक प्रमाणात स्वभावदोष आणि अहंचे पैलू असतात. त्यांवर मात करणे आणि स्वतःतील गुणांची वृद्धी करणे, ही साधना आहे. जीवन जगतांना स्वतःचे प्रारब्ध आणि चुका यांमुळे प्रसंग घडतात. परिणामी आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास होतो. ‘जीवनात येणार्या अडचणीसुद्धा ईश्वरेच्छेने आणि ईश्वरी नियोजनानुसार येत असतात’, हे उमजून साधकाने साधना केली, तर साधकाला अडचणींच्या वेळीही आनंद मिळतो.
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना पर्वताएवढा आनंद देणे
‘सुख पाहतां जवापाडें (लहान कणाएवढे) आणि दुःख पर्वताएवढें ।’ असे संत तुकाराम महाराज यांनी सांगितले आहे. ते प्रत्येक साधकाने व्यवहारी जीवनात अनुभवले आहे; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हा साधकांना ‘दुःख जवापाडें आणि आनंद पर्वताएवढा’ देत आहेत. असे जगद्गुरु अन् मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आम्हाला गुरु म्हणून लाभले आहेत. त्यासाठी आपण तणावविरहित, सकारात्मक आणि आनंदी राहून सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या चरणी सदैव कृतज्ञ राहूया.’
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१२.२०२३)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |