स्वामीभक्तांच्या धार्मिक भावना दुखावणारे ज्ञानेश महाराव यांना अटक न केल्यास त्यांना चोप देणार ! – अक्कलकोट येथे स्वामीभक्तांची चेतावणी
अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – संभाजी बिग्रेडच्या मुंबई येथील अधिवेशनात २ वर्षांपूर्वी बंद पडलेल्या साप्ताहिक ‘चित्रलेखा’चे माजी संपादक ज्ञानेश महाराव यांनी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे स्वामीभक्तांच्या धार्मिक भावना दुखावणार्या ज्ञानेश महाराव यांना तात्काळ अटक करा; अन्यथा स्वामीभक्त त्यांना चोपून काढतील, अशी चेतावणी अक्कलकोट येथे पोलीस ठाण्यात जमलेल्या स्वामीभक्तांनी दिली. ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात अक्कलकोट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्या वेळी ही चेतावणी देण्यात आली.
या प्रसंगी अक्कलकोटचे भाजप आमदार श्री. सचिन कल्लाणशेट्टी, ‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा’चे संस्थापक अध्यक्ष श्री. जन्मजेयराजे भोसले, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी (चौळप्पा महाराजांचे वंशज) श्री. आण्णु महाराज, श्री. मंदार महाराज पुजारी, श्री. धनंजय महाराज पुजारी, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. संजय देशमुख यांसह संत, पुजारी, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी ज्ञानेश महाराव यांनी तोडलेले अकलेचे तारे !
संभाजी ब्रिगेडने आयेजित केलेल्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव म्हणाले होते, ‘सायंकाळी चालणार्या मालिकेत काय चालते, तर ‘स्वामी-स्वामी’ ! प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांची बायको म्हणते की, ‘वरून उडी मारली तरी स्वामी वाचवतील’, मग अशांनाच ऑलिंंपिकमध्ये पाठवले पाहिजे. सगळे जर स्वामींमुळे होत असले, तर शरद पवार यांनी गेली ५० वर्षांत राजकारण असेच केले का ? काही योजना राबवल्या नाहीत का ? शाळा उभ्या केल्या नाहीत ? अधिकोष उभे केले नाहीत ?’