Engineer Rashid : काश्मीरमधील जिहादी आतंकवादी खासदार इंजिनीयर रशीद कारागृहातून बाहेर !
श्रीनगर – काश्मीरच्या बारामुल्ला मतदारसंघाचा खासदार आणि जिहादी आतंकवादी शेख अब्दुल रशीद (इंजिनीयर रशीद) ११ सप्टेंबर २०२४ या दिवशी तिहार कारागृहामधून बाहेर आले. १० सप्टेंबर या दिवशी देहली न्यायालयाने त्याला २ ऑक्टोबरपर्यंत अंतरीम जामीन संमत केला होता.
कारागृहातून बाहेर आल्यानंतर रशीद म्हणाला, ‘‘नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेल्या ‘नया काश्मीर’च्या कथानकाच्या विरोधात मी लढणार आहे. ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी मोदी यांनी काश्मीरला लागू करण्यात आलेले ३७० कलम हटवण्याचा घेतलेला निर्णय काश्मिरी लोकांनी नाकारला आहे. मला काश्मीरमध्ये कायमची शांतता प्रस्थापित करायची आहे आणि काश्मिरी लोक दगडफेक करणारे नाहीत, हे सिद्ध करायचे आहे.’’
रशीद याला वर्ष २०१६ मध्ये ‘अवैध कारवाया (प्रतिबंधक) कायद्या’च्या अंतर्गत आतंकवाद्यांना आर्थिक साहाय्य केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. वर्ष २०१९ पासून तो तिहार कारागृहात बंद आहे. तो कारागृहात असतांना त्याने वर्ष २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकली होती.