जिल्ह्यात ११२ हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेतली ! – विश्वजीत भोसले, वीज वितरण आस्थापन
कोल्हापूर, ११ सप्टेंबर (वार्ता.) – गणेशोत्सव मंडळांनी त्यांचे देखावे करतांना, तसेच अन्य विद्युत् रोषणाईसाठी वीज वितरण आस्थापनाकडून अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले होते. अशी वीजजोडणी ही भाविकांसाठी सुरक्षित आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ११२ हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेतली आहे. आस्थापन मंडळांना ४ रुपये ७१ पैसे अशा अल्प दराने वीज उपलब्ध करून देते, अशी माहिती वीज वितरण आस्थापनाचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले यांनी दिली.
१. या जोडणीसाठी आम्ही वीज भारानुसार ३ ते ७ सहस्र रुपये इतके परत देण्यात येणारी ठेव (डिपॉझिट) घेतो. मंडळांचा जेवढा वीज वापर होईल, तेवढी आकारणी आम्ही करतो. यासाठी मंडळांना आम्ही तात्पुरते वीजमीटर उपलब्ध करून देतो. याच्या जोडणीसाठी मंडळांनी संबंधित शाखा कार्यालयात संपर्क साधावा. ही जोडणी त्यांना तात्काळ करून देण्यात येईल.
२. गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गावरील वीज वाहिन्यांचा अडथळा येणार नाही, तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी वीज वितरणची मोठी यंत्रणा कार्यरत आहे.
३. गणेशोत्सव कालावधीत पाऊस, वारा, तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे विजेचा अपघात होऊ नये; म्हणून वीज वहन करणार्या तारांमध्ये ‘स्पेसर्स’ बसवण्यात आले असून जिल्ह्यात तारांमध्ये ४० लाखांहून अधिक ‘स्पेसर्स’ बसवण्यात येणार आहेत.