दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ट्रक आणि बोलेरो यांचा भीषण अपघात; विद्युत् तारेच्या स्पर्शाने ४ जणांचा मृत्यू !…
ट्रक आणि बोलेरो यांचा भीषण अपघात
३ ठार आणि ४ जण घायाळ
कोल्हापूर – येथील निपाणी-देवगड राज्यमार्गावर १० सप्टेंबरला मध्यरात्री भरधाव ट्रकची बोलेरो गाडीला धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील सोळांकूर येथील ३ तरुणांचा मृत्यू झाला आणि अन्य ४ जण गंभीर घायाळ झाले आहेत. अपघातानंतर पळून गेलेला ट्रकचालक गड्याप्पा परशुराम राठोड याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
विद्युत् तारेच्या स्पर्शाने ४ जणांचा मृत्यू !
चंद्रपूर – येथील ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर गावात जिवंत विद्युत् तारेच्या स्पर्शाने ४ जणांचा मृत्यू झाला. मागील २ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने पिके पाण्यात बुडली होती. २ दिवस कुणी बांधावर गेले नव्हते. नानाजी राऊत, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे आणि पुंडलिक मानकर हे शेताच्या बांधावर गेले असता तेथील जिवंत विद्युत् तारेच्या स्पर्शाने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रक्त उपलब्धतेची माहिती न दिल्याने दंडात्मक कारवाई !
मुंबई – राज्यातील प्रत्येक रुग्णाला रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्ताच्या उपलब्धतेची माहिती संकेतस्थळावर प्रतिदिन सुधारित माहिती प्रसारित करण्याचे निर्देश रक्तपेढ्यांना दिले आहेत. या नियमांचे पालन न करणार्या मुंबईतील ३१ रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. डिसेंबर २०२२ ते मे २०२४ या कालावधीमध्ये ही माहिती न दिल्यामुळे या रक्तपेढ्यांना १ लाख १६ सहस्र रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ही दंडवसुली अद्याप पूर्ण झालेली नाही.
पूरपरिस्थितीत हेलिकॉप्टरने रक्ताची पिशवी पोचवली !
गडचिरोली – ८ सप्टेंबरला पुरातून वाट काढत एका महिलेची वैद्यकीय अधिकार्याने प्रसूती केली होती; मात्र या मातेला रक्ताची आवश्यकता होती. पुरामुळे सगळ्या वाटा अडलेल्या होत्या. अशा परिस्थितीत ११ सप्टेंबरला पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सकाळी हेलिकॉप्टरने रक्ताची पिशवी पोचवण्यात आली. यासाठी पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलाचे हेलिकॉप्टर विनाविलंब उपलब्ध करून दिले.
चाकूचा धाक दाखवून कामगाराला लुटले !
डोंबिवली – ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावरील खंबाळपाडा भागात एका कामगाराला २ जणांनी अडवले. त्याला शिवीगाळ करत पुष्कळ मारहाण केली. त्याच्या मानेवर चाकू ठेवून त्याला ठार मारण्याची धमकी दिली. त्याच्या जवळील मजुरीतून मिळवलेले १५ सहस्र रुपये लुटून नेले. (गुन्हेगारांना पोलिसांचे भय उरले नसल्याचे उदाहरण ! – संपादक)