ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात अधिवक्ता राहुल पाटकर यांची वाशी पोलीस ठाण्यात तक्रार !
मुंबई – नवी मुंबईमधील वाशी येथे संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात ‘धोब्याचे ऐकून स्वतःच्या पत्नीला घराबाहेर काढणार्या श्रीराम तुमचा कसा आदर्श असू शकतो ?’ असे म्हणणार्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात अधिवक्ता राहुल पाटकर यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
यामध्ये अधिवक्ता राहुल पाटकर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ज्ञानेश महाराव यांनी जाणीवपूर्वक वरील देशातील समस्त श्रद्धाळू हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत. प्रभु श्रीराम हिंदूंचे आराध्य दैवत असूनही त्यांच्याविषयी, तसेच माता सीता, लक्ष्मण, लक्ष्मणाची पत्नी उर्मिला यांच्याविषयीही ज्ञानेश महाराव यांनी चारित्र्यहनन करणारी अश्लाघ्य टीका केली आहे. असे वक्तव्य करून ज्ञानेश महाराव यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावल्या आहेत. श्रीराम आणि लक्ष्मण यांचा त्याग आणि अन्य सद्गुण यांमुळे लाखो वर्षांनंतरही ते हिंदूंसाठी आदरणीय आहेत. हिंदु धर्मानुसार श्रीरामांना भगवान श्रीविष्णु, तर लक्ष्मणाला शेषनागाचा अवतार मानले जाते. त्यामुळे त्यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यामुळे हिंदूंमध्ये क्षोभ आहे. शांतताप्रिय, सहिष्णु हिंदु समाजाच्या भावना ज्ञानेश महाराव यांनी जाणीवपूर्वक दुखावल्या आहेत. यामुळे समाजात कोणती अप्रिय घटना घडू नये, यासाठी ज्ञानेश महाराव यांच्यावर ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ चे कलम २९९, ३०२ नुसार गुन्हा नोंदवण्यात यावा.