भारतीय इतिहासातील गोंधळ !
पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘हिंदु संस्कृतीत असणारे गायीचे अनन्यसाधारण महत्त्व’, याविषयी वाचले. आज या मालिकेतील पुढचा भाग येथे देत आहोत.
(लेखांक ५०)
प्रकरण ९
१. भारतीय स्वातंत्र्याचा सत्य इतिहास प्रकाशित न होणे आणि त्यामागील कारणांचा मागोवा
‘भारत’ हा एक देश आहे की, ज्याला स्वातंत्र्य मिळून वर्ष २०२४ मध्ये ७७ वर्षे झाली, तरी त्याच्या स्वातंत्र्याचा इतिहास अधिकृतपणे आणि सत्य स्वरूपात अजून कुणीही प्रकाशित केला नाही.
कदाचित् याचे कारण असेही असेल की, सशस्त्र क्रांतीकारक ‘वासुदेव बळवंत फडके’, ‘चापेकर बंधू’, ‘भगतसिंग’, ‘कान्हेरे’ आणि ‘उधमसिंग’ इत्यादींचे मार्ग काँग्रेसला पटत नव्हते. सशस्त्र क्रांतीला म. गांधींचा विरोध होता. सहस्रो निःशस्त्र सत्याग्रही गांधींच्या मार्गाने घोड्यांच्या टापांखाली, पोलिसांच्या दंडुक्यांखाली आणि बंदुकांच्या गोळ्यांनी धारातिर्थी पडले. तरीही आम्हाला असेच शिकवले जाते की, रक्ताचा थेंब न सांडता स्वातंत्र्य मिळाले !
इंग्रजांशी भारताने सशस्त्र लढाई केली नाही, हे खरे आहे; पण इंग्रजांना भारतभूमीवर राज्य करणे क्रांतीकारक आणि स्वातंत्र्यसैनिक यांनी अशक्य करून सोडले होते, हे खोटे आहे का ? शेकडो इंग्रज अधिकारी आणि सैनिक यांचा येथील क्रांतीकारकांनी संहार केला आहे. शेकडो क्रांतीवीर स्वतः फासावर लटकले आहेत.
दुसर्या महायुद्धात इंग्रजांची झालेली प्रचंड हानी आणि राज्य चालवण्यासाठी आवश्यक त्या आर्थिक पुरवठ्याची उणीव, क्रांतीविरांचे अकस्मात् होणारे उठाव, आरमारातील १९४६चे बंड या सर्व गोष्टींनी त्रस्त होऊन इंग्रजांनी स्वातंत्र्य दिले. ते देतांनाही त्यांनी या देशाचे २ तुकडे करून एक पाकिस्तान आमच्या उरावर बसवले. लॉर्ड माऊंटबॅटन हे ब्रिटीश राजघराण्याचे एक नातेवाईक भारताचे ‘गव्हर्नर जनरल’ म्हणून येथे बसवले. फाळणी होतांना विचारपूर्वक प्रजेची अदलाबदल न केल्यामुळे येथील मुसलमान येथेच राहिले आणि पाकिस्तानातून हिंदू ठार किंवा हद्दपार झाले. जुन्या मुसलमानी परंपरेप्रमाणे मंदिरे फोडली गेली, स्त्रियांवर अत्याचार झाले, लोकांच्या कत्तली झाल्या. नौखालीमध्ये हिंदु स्त्रियांना नग्न करून त्यांची मिरवणूक काढून विटंबना करण्यात आली.
२. आर्य कोण आणि कुठले ?
अनुमाने ५ सहस्र वर्षांपूर्वी आर्य लोकांच्या टोळ्या हिमालयाच्या रांगा ओलांडून भारतात आल्या. हे आर्य लोक मूळ उत्तरध्रुव किंवा मध्य आशिया भागातील होते. भारतात त्या वेळी श्याम वर्णाचे द्रविड लोक रहात होते. त्यातील काहींना ‘दस्यूह’ म्हणत. हे लोक मागासलेल्या स्थितीत होते. आर्यही काही पुष्कळ सुधारलेले नव्हते; पण यांच्या मानाने ते गौरवर्ण म्हणून देखणे, अंगाने धष्टपुष्ट, बलवान, शस्त्रांचा वापर करणारे आणि अन्न शिजवून खाणारे अशा प्रकारे प्रगत होते. ऋग्वेदात ‘दाशराह-युद्ध’ म्हणून जे आले आहे, ते या आर्य आणि अनार्य उपाख्य दस्यू यांच्यात झालेले युद्ध होय.
अनार्य हे मूळ भारतीय लोक लिंगपूजा करत असत. ते शिवपूजक होते. गणपति हीसुद्धा त्यांची देवता होती, तसेच नाग, वृक्ष इत्यादींना ते देव मानत. आर्य अग्निपूजक असून ते यज्ञ करत. आर्यांनी भारतावर उत्तरेकडून येऊन आक्रमणे केली. अनार्यांना पराभूत केले आणि भारताच्या दक्षिण भागाकडे पिटाळून लावले. पुढे शेकडो वर्षांच्या सान्निध्याने द्रविड, दस्यू इत्यादी वर्ग आणि आर्य यांच्यात मिलाप झाला अन् त्यांनी एकमेकांचे उपासनामार्ग स्वीकारले. आताचे हिंदू हे असे आर्य आणि अनार्य यांच्या एकत्रिकरणाने झाले आहेत. त्यांतील मूळ आर्य आता ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या ३ वर्गात आहेत. अनार्य हे आजचे शूद्र आणि अतिशूद्र आहेत.
हा आमच्या इतिहासातील खोटेपणा आहे. मॅक्समुल्लरने भाषाशास्त्राला हाती धरून अशी समजूत प्रसृत केली की, संस्कृत, ग्रीक, लॅटिन इत्यादी भाषांत जी पुष्कळशी सरूपता दिसते, त्याचे मूळ कारण हे सारे लोक एकवंशी असून पूर्वी केव्हा तरी एके ठिकाणी रहात असावेत. या वंशाला ‘आर्यन वंश’ असे नाव मिळाले.
(क्रमशः)
– भारताचार्य अन् धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
संपादकीय भूमिकादेशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे होऊनही त्याचा इतिहास अधिकृतपणे आणि सत्य स्वरूपात लिहिला न जाणे, हे भारतियांना लज्जास्पद ! |
भाग ५१ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/833655.html