श्री गणेशचतुर्थीनिमित्त अध्यात्मप्रचार आणि श्री गणेशपूजन करतांना साधकाला आलेल्या अनुभूती
१. प्रवचनाच्या आधी नकारात्मक विचार येणे, श्री गणेशाला प्रार्थना केल्यावर नकारात्मक विचार उणावून प्रचार करता येणे आणि प्रवचनाच्या ठिकाणी श्री गणेशाचे अस्तित्व जाणवणे
‘एकदा आम्ही श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या एका वाचकाच्या घरी प्रवचन घेण्याचे नियोजन केले होते. वाचक आणि त्यांची आई यांना परिसरातील व्यक्तींना निमंत्रण देण्यास सांगितले होते. प्रवचनाच्या आधी एक घंटा मी तेथे जाऊन प्रसार करणार होतो. प्रवचनाच्या दिवशी माझ्या मनात ‘मी एकटा कसा प्रसार करणार ? मला प्रसार करणे शक्य होणार नाही’, असे नकारात्मक विचार येऊ लागले. त्या दिवशी पुष्कळ पाऊस पडत असल्याने माझ्यावरील ताण वाढला. मी गुरुमाऊली आणि श्री गणेश यांना, ‘माझी सेवा चैतन्याच्या स्तरावर होऊ दे. मला तुमचे अस्तित्व जाणवू दे’, अशी प्रार्थना केली. त्यानंतर मी तेथील वाचकांच्या समवेत प्रसार केला. प्रवचनाला ११ जण उपस्थित होते. त्यांनी मला सांगितले, ‘‘पुढील प्रवचनासाठी येथे पुन्हा जमूया.’’ तेव्हा मला श्री गणेशाचे अस्तित्व जाणवले आणि माझी भावजागृती झाली.
२. भावपूर्ण गणेशपूजन करता येणे
श्री गणेशचतुर्थीच्या आधी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात गणेशोत्सव भावपूर्ण साजरा करण्याविषयी सांगितले होते. त्यानुसार मी प्रयत्न करायचे ठरवले. आमच्या घरी श्री गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्या दिवशी मी श्री गणेशाला प्रार्थना केली, ‘मला भावपूर्ण पूजा करता येऊ दे. मला तुझे अस्तित्व अनुभवता येऊ दे.’ पूजा करतांना मी भ्रमणभाषवर अथर्वशीर्ष लावले होते. मी नामजप करत पूजा करतांना ‘पुढची कृती कुठली करायची ?’, हे देव मला सुचवत होता. त्या वेळी माझी भावजागृती झाली आणि माझी ही भावस्थिती पुष्कळ वेळ टिकून राहिली.
‘माझ्यासारख्या एका सामान्य जिवाला श्री गणेशतत्त्व आणि गुरुकृपा यांची अनुभूती आली’, त्याबद्दल मी श्री गुरु आणि श्री गणेश यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. राजाराम कृष्णा परब, कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) (१८.१०.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |