महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या इचलकरंजी विभागात १३ कोटी रुपयांचा अपहार
निलंबित साहाय्यक साठा अधीक्षक महंमद शाबुद्दीन पेंढारीसह ११ जणांना अटक !
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या इचलकरंजी विभागात १३ कोटी ४१ लाख ७१ सहस्र ८६६ रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोल्हापूर विभागाच्या अतिरिक्त व्यवस्थापक तृप्ती हणमंत कोळेकर यांनी गावभाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी १८ जणांवर गुन्हा नोंद झाला असून निलंबित साहाय्यक साठा अधीक्षक तथा केंद्रप्रमुख महंमद शाबुद्दीन पेंढारी यांच्यासह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना ४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या प्रकरणी चंद्रकांत मगर, पोपट पाटील, श्रेयस माने, कुमार जाधव, ज्ञानेश्वर पेठकर, आनंदा जाधव, प्रल्हाद जाधव, यश जाधव, जयंत व्यास, सुशांत कोळेकर, कृष्णात फार्णे यांना अटक झाली असून इरफान तय्यब मोठलीन, रज्जाक नूरमहंमद मोठलानी, तय्यब रज्जाक मोठलानी, तब्बसूम तय्यब मोठलानी, मयूर भोसले, तानाजी मराळे, साहेबराव आडके हे पसार आहेत.
महंमद शाबुद्दीन पेंढारी याने इतर १८ जणांसह संगनमत करून खोट्या वखार पावत्या सिद्ध केल्या आणि त्याच्या नोंदी केल्या. या खोट्या पावत्या विविध अधिकोषांमध्ये तारण ठेवून कर्ज घेतले. याचसमवेत विमा आस्थापनाकडे विम्याची रक्कम भरली नाही, तसेच वखार महामंडळाचे भाडेही बुडवले. वखार महामंडळाच्या कोल्हापूर विभागात १८ वखार केंद्रे आणि १०५ गोदामे आहेत. यातील वडगाव बाजार समिती येथे असणार्या इचलकरंजी वखार केंद्रातील वार्षिक पडताळणी कालावधीत दप्तर नोंदी, कागदपत्रे, गोदामातील धान्यसाठा यांत मोठा फरक आढळून आला. हा अहवाल महामंडळाच्या पुणे व्यवस्थापक संचालक यांच्याकडे पाठवण्यात आला. यानंतर पेंढारी यांना तात्काळ निलंबित करण्यात येऊन सर्व संशयितांवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्यात आले.
पेंढारी याने २१२ वखार पावत्यांवरील सुमारे सव्वा सहा लाख रुपये वखार भाडे भरलेच नाही. खोटा ‘यूटीआय’ क्रमांक देऊन महामंडळाच्या अधिकोषात पैसे जमा झाल्याची माहिती दिली.