संपादकीय : ऑपरेशन भेडिया !
उत्तरप्रदेशमधील बहराईच जिल्ह्यात लांडग्यांच्या आक्रमणांमुळे ५० गावांमध्ये दहशत पसरली आहे. ही आक्रमणे साधारण मार्च महिन्यामध्ये चालू झाली; मात्र जुलै महिन्यापासून या आक्रमणांमध्ये वाढ झाली आहे. या लांडग्यांच्या टोळीला पकडण्यासाठी ‘ऑपरेशन भेडिया’ ही मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. लांडग्यांच्या आक्रमणामध्ये आतापर्यंत ८ जणांनी जीव गमावला आहे, तर ३४ हून अधिक जण गंभीर घायाळ झाले आहेत. या टोळीतील ५ लांडग्यांना आतापर्यंत पकडण्यात यश आले आहे; मात्र सर्वांत हिंसक असणारा लांडगा अजूनही मोकाट आहे. त्यामुळे मानवी वस्त्यांवरील आक्रमणांच्या घटना वाढू शकतात. लांडग्यांचे हे आक्रमण केवळ बहराईच पुरतेच मर्यादित नाही, ते आता अन्य राज्यांमध्ये पोचले आहे. मध्यप्रदेशातील खांडवा येथे लांडग्याने केलेल्या आक्रमणात ५ जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे. भारतात आतापर्यंत मानवी वस्त्यांमध्ये वाघांनी आक्रमण करणे, हत्तींनी शेती आणि घरे यांची हानी करणे, मगरींनी मानवी वस्त्यांमध्ये फिरणे, माकडांनी हैदोस घालणे यांसारखे प्रकार आपण ऐकले होते. यांमध्ये आता लांडग्यांचाही समावेश झाला आहे. भारतात मानव आणि लांडगे यांच्यातील संघर्ष जुना आहे. भारतात साधारणतः उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश आणि बंगाल या राज्यांमध्ये लांडगे आढळतात. वर्ष १९८५-८६ या कालावधीमध्ये मध्यप्रदेशातील अस्था येथे लांडग्यांनी १७ मुलांना ठार मारले. वर्ष १९९३ ते १९९५ या कालावधीमध्ये बिहारमधील हजारीबाग येथे लांडग्यांनी ६० मुलांची हत्या केली होती. अलीकडेच म्हणजे फेब्रुवारी ते ऑगस्ट २०१३ मध्ये म्हणजे ११ वर्षांपूर्वी बहराईच जिल्ह्याच्या जवळ असलेल्या बलरामपूर जिल्ह्यामध्ये लांडग्यांनी १० मुलांची हत्या केली होती. बहराईचमध्ये प्रशासन, वन विभाग आणि पोलीस प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. त्यामुळे लांडग्यांची आक्रमणे रोखली जातील; मात्र तरीही ‘भविष्यात अशी आक्रमणे परत होणार नाहीत’, अशी हमी ना प्रशासन देऊ शकते ना वन विभाग. त्याही पुढे जाऊन जनमानसात पसरलेली भीती, आक्रोश आणि लांडग्यांवर सूड उगवण्याच्या मानसिकतेचे काय करायचे ? कारण ज्याला संपवण्याची भाषा लोक करत आहेत, त्या लांगड्यांची भारतातील संख्या केवळ ३ सहस्र उरली आहे. भारतात ही लुप्त होत चाललेली प्रजाती म्हणून घोषित करण्यात आले आहे. या लांडग्यांना मारून समस्या संपणार का ? ‘ऑपरेशन भेडिया’ आणखी काही दिवसांनी संपेल; मात्र भारतात विविध प्राणी मानवावर करत असलेली आक्रमणे पहाता भविष्यात ‘ऑपरेशन हाती’, ‘ऑपरेशन बंदर’, ‘ऑपरेशन मगरमच्छ’, अशी ‘ऑपरेशन’ राबवण्याची नामुष्की आपल्यावर येईल. हे थांबवायचे असेल, तर ‘ऑपरेशन मानव’ म्हणजे मानवाचा उत्कर्ष साधण्यासाठी मोहीम हाती घेणे आवश्यक आहे.
चूक लोकांची कि लांडग्यांची ?
लांडग्यांच्या या आक्रमणांनंतर अनेक तज्ञांची मते पुढे आली आहेत. वर्ष १९९६ मध्ये लांडग्यांनी ७६ मुलांवर आक्रमण केले होते. त्या वेळी ‘भारतीय वन्यजीव संस्थे’चे संशोधक व्ही.वाय. झाला आणि डी.के. शर्मा यांनी या घटनांचा अभ्यास करून काही निष्कर्ष मांडले. त्यानुसार जंगलात शिकारीसाठी प्राणी न मिळणे, हे लांडग्यांचे मानवावरील आक्रमणांमागील एक प्रमुख कारण होते. मार्च ते मे हा काळ लांडग्यांमधील प्रजननाचा कालावधी असतो. या काळात त्यांना अधिक मांस लागते. जर याच काळात मानवाकडून शिकारीच्या नावाखाली जंगलातील अनेक शाकाहारी प्राण्यांची शिकार केली गेल्यास लांगड्यांना खाद्य मिळत नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे ते शिकार मिळण्यासाठी मानवी वस्त्यांमध्ये शिरतात. या अभ्यासामध्ये अनेक लोकांनी ‘लांडग्यांनी मुलांवर आक्रमणे केली’, अशा खोट्या तक्रारी केल्या होत्या, असेही पुढे आले होते. कुठल्याही प्राण्यांनी आक्रमण केल्यावर सरकारकडून हानीभरपाई दिली जाते. ते पैसे लाटण्यासाठी लोकांकडून असले ‘उद्योग’ केल्याचे समोर आले. काही तज्ञांच्या मते लांडगे हे तसे शांततेत जगणारे प्राणी आहेत; मात्र त्यांच्यावर कधीतरी लोकांनी आक्रमण केले असेल किंवा त्यांच्या पिल्लांना इजा केली असेल, तर ते सूड उगवण्यासाठी मानवी वस्त्यांवर आक्रमण करतात. ‘बहराईचमध्ये लांडग्यांना डिवचल्यामुळे ते हिंसक झाले आहेत का ?’, याचाही शोध घेतला जात आहे. थोडक्यात आज लांडग्यांना ‘खलनायक’ म्हणून रंगवले जात आहे; मात्र खरे खलनायक कोण आहेत ? हे शोधण्याची ही वेळ आहे.
मानवाचे दायित्व मोठे !
सर्व प्राण्यांमध्ये मानव हा बुद्धीवान प्राणी आहे. त्यामुळे निसर्गाच्या रक्षणाचे दायित्व, हे अन्य प्राण्यांपेक्षा त्याच्यावर अधिक आहे. हे दायित्व ओळखून त्याने कृती केली, तर त्याचा लाभ मानवाला होईलच, त्यासह अन्य प्राणीमात्रांचेही रक्षण होईल. हे दायित्व चोखपणे पार पाडण्यासाठी मानवाने प्रथम निसर्ग ओरबाडण्याचे काम थांबवायला हवे. फार पूर्वी निसर्ग आणि मानव यांच्यात सुंदर असे नाते होते. हिंदूंमधील अनेक धर्मग्रंथांमध्ये ऋषिमुनींचे निसर्गाच्या सान्निध्यात असलेले आश्रम आणि परिसरात मुक्तपणे वावरणारे प्राणी यांची अनेक वर्णने आपण वाचली आहेत. या प्राण्यांमध्ये हिंस्र श्वापदांचाही समावेश असे. त्यानंतर हे चित्र पालटले. निसर्गावर विजय मिळवण्याची अहमहमिका मानवामध्ये निर्माण झाली. निसर्गाशी समरस होऊन त्याच्यासमोर लीन झाल्यास तो आपल्यावर भरभरून कृपा करील, हे मानव विसरला. मानव त्याचे दायित्व विसरल्यामुळेच निसर्गाचा प्रकोप तर होत आहेच; मात्र त्याही पुढे जाऊन प्राण्यांचाही प्रकोप दिसून येत आहे. एका आकडेवारीनुसार भारतात वेगवेगळ्या कारणांवरून वर्ष १८४७ ते १९१६ या कालावधीत १ लाख लांडग्यांची हत्या झाली आहे. त्यामुळे ही प्रजाती संकटात आहे. इकोसिस्टममध्ये (परिसंस्थेमध्ये) लांडगे महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यामुळे त्यांचा र्हास झाल्यास निसर्गचक्र कोलमडू शकते. याचे परिणाम मानवालाही भोगावे लागू शकतात.
प्राण्यांनी मानवी समुहावर आक्रमण केल्यावर त्यांच्यावर प्रतिआक्रमण करण्याची मानवाची वृत्ती दिसून येते. ही स्वाभाविक मनोवृत्ती आहे; मात्र याने समस्या सुटणार का ?, याचाही अभ्यास व्हायला हवा. बेसुमार जंगलतोड केल्याने प्राणी बेघर झाले, तर ते कुठे जाणार ? बहराईच येथील लांडग्यांच्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेले विधान सर्वांनाच विचार करायला लावणारे आहे. ‘मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष हा जंगलतोडीमुळे होत आहे’, असे ते म्हणाले होते. लांडग्यांच्या मानवी वस्त्यांवरील आक्रमणांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावरील उपाययोजना मानवानेच काढायला हवी. तसे न केल्यास मानवाचा र्हास अटळ आहे.
मानवाने निसर्गावर विजय मिळवण्याऐवजी तो निसर्गासमोर लीन झाल्यास निसर्ग त्याच्यावर भरभरून कृपा करेल ! |